Asia Power Index : भारत जगातील तिसरा शक्तिशाली देश,जपानला टाकले मागे; ऑस्ट्रेलियातील संस्थेकडून निर्देशांक जाहीर

Asia Power Index : भारताने आशिया पॉवर इंडेक्समध्ये जपानला मागे टाकत तिसरे स्थान मिळवले आहे. ऑस्ट्रेलियन थिंक टँक लोवी इन्स्टिट्यूटने २७ देशांच्या आर्थिक आणि राजनैतिक स्थितीचा आढावा घेत हा निर्देशांक जाहीर केला आहे.
Asia Power Index
Asia Power Indexsakal
Updated on

नवी दिल्ली : आशियातील शक्तिशाली देशांच्या निर्देशांकात (एशिया पॉवर इंडेक्स) भारताने जपानला मागे टाकत तिसरे स्थान पटकाविले. केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने ही माहिती बुधवारी दिली.

भारताच्या वाढत्या विकास दराबाबत ऑस्ट्रेलियन थिंक टँक लोवी इन्स्टिट्यूट या संस्थेने २७ देशांच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेताना या क्रमवारीमध्ये भारत ही तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असल्याचे वर्णन केले आहे. बाह्य आक्रमणासह सर्वप्रकारची संकटे दूर ठेवण्याची एखाद्या देशाची क्षमता कितपत आहे, या निकषाच्या आधारे एशिया पॉवर इंडेक्समध्ये प्रभावी देशांची क्रमवारी ठरविली जाते.

कोरोनाच्या जागतिक साथीनंतर भारताचा आर्थिक विकास वेगाने झाला. अर्थव्यवस्थेचा विस्तार त्याचप्रमाणे युवकांच्या संख्येत वाढ या कारणांनी भारताची स्थिती मजबूत झाल्याने आशियातील शक्तिशाली देशांच्या निर्देशांकात देशाची कामगिरी सुधारली.

यामुळे जागतिक व्यासपीठावर भारताची भूमिका आगामी काळात आणखी महत्त्वाची होऊ शकते, असेही मानले जात आहे. गेल्यावेळी तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या जपानला भारताने मागे टाकले. या यादीत अमेरिका सर्वोच्च स्थानी असून चीनचा दुसरा क्रमांक आहे.

त्यानंतर भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि रशिया अशी क्रमवारी आहे. दुसरीकडे, भारताची सातत्याने कुरापत काढणाऱ्या पाकिस्तानची स्थिती मात्र या क्रमवारीत आणखी बिकट झाली आहे. १४.४ गुणांसह पाकिस्तान १६ व्या स्थानावर आहे.

निर्देशांकातील देश व भारताबाबत निरीक्षण

  • २७ देश आणि प्रदेशांचा समावेश

  • पश्चिमेला पाकिस्तानपर्यंत, उत्तरेला रशियापर्यंत व प्रशांत विभागातील ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अमेरिकेपर्यंतच्या देशांचा सहभाग

  • आर्थिक वाढ, भविष्यातील संभाव्यता आणि राजनैतिक प्रभाव हे भारताच्या वाढीसाठी महत्त्वाचे घटक

  • कोरोना साथीनंतर भारताने केलेली आर्थिक सुधारणा उल्लेखनीय

  • आर्थिक क्षमतेच्या आधारे निर्देशांकात ४.२ गुणांनी वाढ

  • भारताची प्रचंड लोकसंख्या आणि देशांतर्गत उत्‍पादनातील वाढीमुळे जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनण्यास सक्षम

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता

  • बैठकांमधील सहभाग आणि ‘क्वाड’मधील नेतृत्वामुळे प्रादेशिक सुरक्षेच्या धोरणात महत्त्वपूर्ण भूमिका निभावण्याची संधी

पहिले सहा शक्तिशाली देश आणि गुण (२०२४मधील)

  • ८१.७ अमेरिका

  • ७२.७ चीन

  • ३९.९ भारत

  • ३८.९जपान

  • ३१.९ ऑस्ट्रेलिया

  • ३१.१ रशिया

स्रोत : लोवी इन्स्टिट्यूट, ऑस्ट्रेलिया

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.