ITR : विवरणपत्र दाखल करण्याची शेवटची संधी

३१ डिसेंबर २०२३ पर्यंत विवरणपत्र भरल्यास १० हजार रुपये विलंबशुल्क भरावे लागेल.
ITR
ITRSakal
Updated on

- ॲड. सुकृत देव

आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये (आकारणी वर्ष २०२३-२४) प्राप्तिकर विवरणपत्र विलंब शुल्क न भरता दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस (ता. ३१) आहे. त्यामुळे आज विवरणपत्र दाखल करणे अत्यावश्‍यक आहे.

ज्या प्राप्तिकरदात्यांना ऑडिट करण्याची गरज नाही, त्यांनी प्राप्तिकर विवरणपत्र दाखल केले नसेल, त्यांनी आज त्वरित विवरणपत्र दाखल करावे; अन्यथा त्यांना विलंब शुल्क भरून नंतर विवरणपत्र भरावे लागेल. हा भुर्दंड टाळायचा असेल, तर वेळेत विवरणपत्र दाखल करणे महत्त्वाचे आहे.

विलंबशुल्क आकारणी

वार्षिक एकूण उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा कमी असेल अशा करदात्यांना प्राप्तिकर विवरणपत्र ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत भरल्यास एक हजार रुपये व त्यानंतर पाच हजार रुपये शुल्क असेल. वार्षिक एकूण उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा अधिक असेल, तर ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत विवरणपत्र भरल्यास १० हजार रुपये विलंबशुल्क भरावे लागेल.

आज प्राप्तिकर विभागाकडून प्राप्तिकर प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत, जे नक्कीच स्वागतार्ह आहेत. प्राप्तिकर विभागाकडून आणण्यात आलेले ‘फॉर्म २६ एएस’, वार्षिक माहितीपत्र (एआयएस), ‘टीआयएस’ आदी व वापरण्यात येत असलेले अद्ययावत तंत्रज्ञान (एआय) बघायला मिळत आहे. या बदलामुळे प्राप्तिकरातील पारदर्शकता वाढलेली आहे,

करचुकवेगिरीला आळा बसत आहे. प्राप्तिकरदात्यांच्या सर्व व्यवहारांवर करडी नजर ठेवण्यात येत आहे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. ऑनलाइन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे, प्रत्यक्ष कर संकलन आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी रु. १६.६१ लाख कोटी झाले आहे, जे मागच्या वर्षीच्या तुलनेत १७.६३ टक्के जास्त आहे. प्राप्तिकर विवरणपत्र दाखल होण्याचा आकडा सात कोटींहून अधिक होण्याची अपेक्षा आहे.

विवरणपत्र दाखल करण्याचे लाभ

करपात्र उत्पन्न असलेल्या प्राप्तिकरदात्यांनी शेवटच्या दिवसाची वाट न बघता, विवरणपत्र वेळेत आणि अचूक भरणे आणि उत्पन्नाची संपूर्ण माहिती देणे अपेक्षित असते. वार्षिक माहितीपत्र (एआयएस), ‘टीआयएस’नुसार एखादे उत्पन्न विवरणपत्रात दाखवायचे राहिले असेल, तर करविभागाकडून विचारणा होऊ शकते.

एखादी व्यक्ती किंवा पॅन कार्डधारक ज्याला कोणत्याही प्रकारचे उत्पन्न नाही, त्याचबरोबर ज्यांचे करपात्र उत्पन्न नाही, (वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी) असे प्राप्तिकरदाते आहेत, ते उत्पन्न दाखवून किंवा शून्य विवरणपत्र अथवा ‘नील’ रिटर्न ऐच्छिक भरू शकतात.

शून्य विवरणपत्राचे फायदे

ज्या व्यक्तींना बचत खात्यातील रक्कम, मुदत ठेव व इतर ठेवींवरील मिळणारे वार्षिक व्याज, स्लॅब रेटपेक्षा अधिक आहे आणि ‘फॉर्म १५ जी’ किंवा ‘१५ एच’ भरलेला नसल्याने ‘टीडीएस’ कापला गेला असेल, त्यांनी परताव्यासाठी असे विवरणपत्र दाखल करणे फायद्याचे ठरेल.

अनेकदा आपल्याला बँक खात्यामध्ये जमा झालेले पैसे लक्षात येत नाहीत, त्यामुळे विवरणपत्र भरल्यामुळे आपल्याला व्याजाचा हिशोब लागतो.

पत्नी कमवत नाही, मात्र तिचे सलग दोन ते तीन वर्षांहून अधिक काळ शून्य विवरणपत्र भरले असेल, तर तिच्या नावावर कर्ज घेण्यास नक्कीच मदत होते.

परदेशात फिरायला किंवा कामासाठी जायचे असेल आणि व्हिसा बनवायचा असेल, तर त्यासाठी दाखल केलेले विवरणपत्र पूरक कागदपत्र समजले जाते.

एखादी व्यक्ती कमवत नसली, तरी रिटर्न भरल्याने उद्योगधंद्यासाठी कर्ज मिळण्यास मदत होते.

विवरणपत्र दाखल केल्यावर ३० दिवसांच्या आत ‘ई-व्हेरिफिकेशन’ आवश्यक आहे.

प्राप्तिकर विभागाकडून विवरणपत्र दाखल केल्यावर, त्याची प्रत प्राप्तिकरदात्यांना नोंदणी केलेल्या ‘ई-मेल’वर पाठवण्यात येते, असा ‘ई-मेल’ आला, की नाही? याची शहानिशा होणे आवश्यक आहे, त्याचबरोबर प्राप्तिकरदात्याला नोंदणी केलेल्या त्याच्या अधिकृत मोबाईलवर एक ‘एसएमएस’ (मेसेज) आला आहे का? हे तपासणे गरजचे आहे.

तेव्हा, प्राप्तिकर विवरणपत्र आजच दाखल करा आणि विलंब शुल्क वाचवा !

(लेखक करसल्लागार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.