मुंबई : देशातील सर्वांत मोठी सॉफ्टवेअर सेवा कंपनी ‘टीसीएस’ने मार्च तिमाहीत निव्वळ नफ्यात ९.१ टक्क्यांनी वाढ नोंदवून १२,४३४ कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत कंपनीला ११,३९२ कोटी रुपयांचा नफा झाला होता.
आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये कंपनीचा निव्वळ नफा नऊ टक्क्यांनी वाढून ४५,९०८ कोटी रुपये झाला आहे. कंपनीने आज तिमाही आर्थिक निकाल जाहीर केले, त्यावेळी ही माहिती देण्यात आली. कंपनीने भागधारकांना प्रति शेअर २८ रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे.
मार्च तिमाहीत कंपनीचा महसूल वार्षिक ३.५ टक्क्यांनी वाढून ६१,२३७ कोटी रुपयांवर गेला आहे. तिमाही आधारावर त्यात १.०७ टक्क्यांनी घट झाली आहे. तिसऱ्या तिमाहीत कंपनीने ६०,५८३ कोटी रुपयांचा महसूल मिळवला होता. कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या ३१ मार्चपर्यंत सहा लाख एक हजार ५४६ होती. यात महिलांचे प्रमाण ३५.६ टक्के असून, १५२ देशांमधील नागरिक कंपनीच्या कर्मचारी वर्गात कार्यरत आहेत, असेही यावेळी सांगण्यात आले.
कंपनीचे कार्यकारी संचालक एन. सुब्रह्मण्यम म्हणाले, ‘‘आमची चौथ्या तिमाहीतील कामगिरी उत्तम आहे. उदयोन्मुख बाजारपेठांतही वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओमुळे व्यवसाय वाढला.’’ मुख्य वित्तीय अधिकारी समीर सेकसारिया म्हणाले, ‘‘आमच्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीमुळे आर्थिक वर्ष २०२४ मध्ये, आम्हाला व्यवसायात चांगली वाढ करणे शक्य झाले.
आव्हानात्मक वातावरणातही कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, संशोधन आणि नवकल्पना यांमधील आमच्या दीर्घकालीन गुंतवणुकीमुळे आम्ही टिकून राहू शकलो. नफ्यासह वाढीच्या संधी मिळवण्यासाठी आम्ही कार्यक्षमता, स्पर्धात्मकता यावर भर देऊ.’’ आर्थिक निकालानंतर ‘टीसीएस’चा शेअर ‘बीएसई’वर ०.४५ टक्क्यांनी वाढून ४००३ रुपयांवर बंद झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.