बाजारातून ५६ कंपन्या उभारणार ९० हजार कोटी; ‘सेबी’कडून सात जूनपर्यंत १७ कंपन्यांना IPO, ‘एफपीओ’साठी मंजुरी

बजाज हाउसिंग फायनान्सच्या सात हजार कोटी रुपयांच्या योजनेमध्ये चार कोटी रुपयांपर्यंतचे नवे शेअर आणि तीन हजार कोटी रुपयांपर्यंतचा ऑफर फॉर सेलचा समावेश आहे.
90 thousand crores to raise 56 companies from stock market SEBI approves 17 companies for IPO
90 thousand crores to raise 56 companies from stock market SEBI approves 17 companies for IPOSakal
Updated on

Mumbai News : देशांतर्गत वेगवान अर्थव्यवस्था, उत्साही शेअर बाजार आणि छोट्या गुंतवणूकदारांचा वाढता सहभाग यामुळे देशातील अनेक कंपन्या शेअर बाजारात पदार्पण करण्यासाठी सज्ज असून, सुमारे ५६ कंपन्या प्राथमिक शेअर विक्री योजना (आयपीओ) आणि फॉलो-ऑन पब्लिक ऑफर (एफपीओ) योजनांद्वारे ९० हजार कोटींहून अधिक निधी उभारण्याचा विचार करत आहेत.

यात ह्युंदाई मोटार इंडियाच्या २५ हजार कोटी रुपयांच्या योजनेचाही समावेश आहे. हा देशातील सर्वांत मोठा आयपीओ आहे. यंदाचे वर्ष आतापर्यंतचे सर्वोत्तम आयपीओंचे वर्ष ठरण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

प्राइम डेटाबेसच्या माहितीनुसार, सात जूनपर्यंत सुमारे १७ कंपन्यांच्या सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) ‘आयपीओ’ किंवा ‘एफपीओ’ योजनांना मंजुरी दिली आहे. या कंपन्या ११ हजार कोटी रुपयांहून अधिक निधी उभारण्याचा विचार करत आहेत.

या कंपन्यांमध्ये, आशिर्वाद मायक्रो फायनान्स आणि अलाईड ब्लेंडर्स अँड डिस्टिलर्स प्रत्येकी १५०० कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहेत. सुमारे ३८ कंपन्यांनी सात जूनपर्यंत ‘सेबी’कडे आयपीओ, एफपीओसाठी प्रस्ताव अर्ज ( ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस -डीआरएचपी) दाखल केला असून, त्याला मंजुरी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

यापैकी काही मोठ्या ‘आयपीओं’मध्ये स्विगीचा आठ हजार कोटी रुपयांचा, बजाज हाउसिंग फायनान्स लि.चा सात हजार कोटी रुपयांचा, ‘अॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर’चा सात हजार कोटी रुपयांचा, ‘ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी’चा ५५०० कोटींचा, तर नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लि. च्या ४५०० कोटी रुपयांच्या योजनेचा समावेश आहे.

बजाज हाउसिंग फायनान्सच्या सात हजार कोटी रुपयांच्या योजनेमध्ये चार कोटी रुपयांपर्यंतचे नवे शेअर आणि तीन हजार कोटी रुपयांपर्यंतचा ऑफर फॉर सेलचा समावेश आहे. गेल्या आठवड्यात, ह्युंदाई मोटारने ‘सेबी’कडे अर्ज दाखल केला असून, प्रत्येकी दहा रुपये दर्शनी मूल्याचे १४ कोटींहून अधिक शेअर विक्री करणार असल्याचे म्हटले आहे.

या वर्षी नव्या आयपीओंची एक दीर्घकालीन वाटचाल पाहायला मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे हे वर्ष आतापर्यंतचे सर्वोत्तम आयपीओ वर्ष असेल. देशातील मजबूत आर्थिकवाढ आणि उत्कृष्ट वाढीची शक्यता यामुळे आयपीओ बाजारासाठी उत्तम पार्श्वभूमी आहे.

देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांसह छोट्या गुंतवणूकदारांचा सहभागही वाढत आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनीही भारतीय शेअर बाजारात दीर्घकालीन संधी असल्याचे ओळखले आहे, त्यामुळे आयपीओंसाठी सकारात्मक वातावरण आहे, असे मत कोटक इन्व्हेस्टमेंट बँकिंगचे व्यवस्थापकीय संचालक व्ही. जयशंकर यांनी व्यक्त केले.

निवडणूक-निकालाच्या काळात राजकीय असुरक्षिततेमुळे शेअर बाजारात भीतीचे वातावरण होते, आता मजबूत आघाडी सरकारच्या अपेक्षेने बाजार बहरला आहे. वाढीवर लक्ष केंद्रित असणारा कार्यक्रम पुढेही कायम राहण्याची अपेक्षा आहे. वाढीव सरकारी खर्चाचा आणि अनुकूल मॉन्सूनचा ग्रामीण अर्थव्यवस्थेला फायदा होईल, असे मत जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.

गेल्या काही तिमाहींमध्ये आयपीओंसाठी त्याच्या आकारापेक्षा अधिक मागणी झाल्याचे आणि नोंदणीनंतर चांगला नफा झाल्याचे दिसून आले आहे. उत्साहवर्धक शेअर बाजार, सक्रिय ग्रे मार्केट, अॅप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाउंट (एएसबीए) सुविधा आणि वाढते गुंतवणूकदार यामुळे आयपीओंना चांगला फायदा होत आहे, असे एचडीएफसी सिक्युरिटीजचे रिटेल रिसर्चचे प्रमुख दीपक जसानी यांनी सांगितले.

कोणत्याही आयपीओचे मूल्यमापन करताना, गुंतवणूकदाराने कंपनीची गुणवत्ता आणि आयपीओमधील शेअरचे मूल्यांकन या दोन बाबींचा विचार करावा. कंपनीच्या गुणवत्तेच्या बाबतीत, प्रवर्तक, कॉर्पोरेट गव्हर्नन्स पद्धती, गेल्या काही वर्षांतील महसूल आणि नफा, भविष्यातील वाढीची रणनीती आणि क्षेत्रीय कामगिरी याकडे लक्ष द्यावे.

मूल्यांकनाच्या आघाडीवर, गुंतवणूकदारांनी मूल्यमापनाची जाणीव होण्यासाठी नोंदणीकृत अन्य कंपन्यांच्या शेअरचा भाव, कमाई,तसेच संस्थात्मक सहभागाचा विचार करावा, असा सल्ला दीपक जसानी यांनी दिला आहे.

‘आयपीओ’ बाजारातील ठळक वैशिष्ट्ये

  • वर्ष २०२२४च्या पहिल्या चार महिन्यांत २४ कंपन्यांनी मुख्य ‘आयपीओं’द्वारे सुमारे १८ हजार कोटींची कमाई

  • कॅलेंडर वर्ष २०२३मध्ये ‘आयपीओं’द्वारे सहा अब्ज डॉलरची उभारणी

  • कॅलेंडर वर्ष २०२४ मध्ये हे प्रमाण १२ अब्ज डॉलरपेक्षा अधिक होण्याची अपेक्षा

  • ‘सेबी’कडे ७ जूनपर्यंत ३८ कंपन्यांचे प्रस्ताव अर्ज दाखल

सरकारच्या वाढीवर आधारीत योजनांमुळे कंपन्यांची कामगिरीही सुधारेल, त्यामुळे ‘आयपीओं’मध्ये गुंतवणूक करण्याची उत्सुकता वाढेल. कॅलेंडर वर्ष २०२४ मध्ये हे प्रमाण १२ अब्ज डॉलरपेक्षा अधिक होण्याची अपेक्षा असून, २०२५ हे वर्ष आणखी चांगले असण्याची शक्यता आहे.

- व्ही. जयशंकर, व्यवस्थापकीय संचालक, कोटक इन्व्हेस्टमेंट बँकिंग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.