नवी दिल्ली : भारतात आर्थिक वर्ष २०२४ मध्ये मोठ्या प्रमाणात बहुपयोगी वाहने आणि स्पोर्ट युटिलिटी वाहनांची (एसयूव्ही) खरेदी झाल्यामुळे मूल्यानुसार वाहन उद्योगाने १९ टक्के वाढ नोंदवली आहे. वाहन नोंदणीच्या संख्येच्या आधारावर भारत चीन आणि अमेरिकेनंतर जगातील तिसरी सर्वांत मोठी वाहन बाजारपेठ बनला आहे.
प्रगत अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात वाहनांची सरासरी किंमत कमी आहे. ‘प्राइमस पार्टनर्स’ या सल्लागार कंपनीने प्रसिद्ध केलेल्या ‘इंडिया ऑटोमोबाईल व्हॅल्यू रिपोर्ट’ या अहवालात ही माहिती दिली आहे.
जागतिक वाहन उद्योगाने २०२३ मध्ये विकल्या गेलेल्या वाहनांच्या आधारावर १२ टक्क्यांनी वाढ नोंदवली होती. उच्च श्रेणीतील वाहने, हायब्रिड पॉवरट्रेन, ऑटोमॅटिक गिअर सिस्टीम आणि सनरूफसारख्या वैशिष्ट्यांमुळे ग्राहकांनी बहुपयोगी वाहने (युटिलिटी वाहने) आणि एसयूव्हींना सर्वाधिक पसंती दिली.
त्यामुळे या दोन्ही श्रेणीतील वाहनांच्या खरेदीत संख्येच्या पातळीवर २३ टक्के आणि मूल्यात्मक पातळीवर ३९ टक्के वाढ झाली आहे. या वाढत्या पसंतीमुळे यूव्ही आणि एसयूव्हींच्या सरासरी किमतीत १६ टक्क्यांनी वाढ झाली आहे, असे या अहवालात म्हटले आहे.
प्रवासी वाहनांच्या विभागात विक्रीच्या संख्येत नऊ टक्क्यांनी घट झाली, त्यामुळे किमतीत पाच टक्के वाढ होऊनही, एकूण मूल्य चार टक्क्यांनी घसरले. दुचाकींच्या विक्रीत दहा टक्के वाढ आणि किमतीत तीन टक्के वाढ झाली आहे, ज्यामुळे एकूण मूल्यात १३ टक्के वाढ झाली.
तीनचाकी वाहनांच्या विक्री संख्येमध्ये १६ टक्के वाढ झाली, तर किंमतीमध्ये आठ टक्क्यांनी वाढ झाल्याने मूल्यात लक्षणीय २४ टक्के वाढ झाली आहे. व्यावसायिक वाहनांच्या विभागामध्ये संख्येत तीन टक्के आणि किमतीत चार टक्के वाढ झाली, परिणामी मूल्यात सात टक्के वाढ झाली, असेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
आर्थिक वर्ष २०२४मध्ये भारताने २८ कोटी वाहनांचे उत्पादन केले, ज्यात दुचाकी वाहनांचा वाटा एकूण ७६ टक्के आहे. चारचाकी प्रवासी वाहनांचा मूल्यात सर्वाधिक वाटा असून, उद्योगाच्या १०.२ लाख कोटी रुपये मूल्यांमध्ये या विभागाचे योगदान ६३ टक्के आहे. विशेष म्हणजे युव्हीचे उत्पादन फक्त दहा टक्के असताना, एकूण उद्योग मूल्यामध्ये त्याचे योगदान ४६ टक्के आहे, असेही या अहवालावरून समोर आले आहे.
प्रीमियम फीचर्स आणि उच्च श्रेणीतील वाहनांना ग्राहकांची वाढती पसंती
एसयूव्ही, यूव्हींमधील आतील प्रशस्त भाग, उत्कृष्ट ग्राउंड क्लीअरन्स
‘ईव्ही’ आणि ‘हायब्रीड’बाबतचा बदल कायम राहण्याची शक्यता
ग्राहक उच्च दर्जाच्या आणि उच्च वैशिष्ट्यांच्या वाहनांना प्राधान्य देत असल्याने वाहन संख्येच्या तुलनेत देशातील वाहनउद्योग मूल्यात्मक पातळीवर वेगाने वाढत आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये बहुतांश विभागांमधील विक्रीतील संख्यात्मक वाढ अल्प राहण्याची शक्यता आहे. मात्र, उच्च श्रेणीतील वाहनांना प्राधान्य देत असल्याने किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.
- अनुराग सिंग, व्यवस्थापकीय संचालक, प्राइमस पार्टनर्स
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.