केंद्रीय मंत्रिमंडळाने आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा विस्तार करत ७० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक पाच लाख रुपयांपर्यंत आरोग्य विम्याची सुरक्षा प्रदान केली आहे. त्यामुळे आता या ज्येष्ठांना मान्यताप्राप्त रुग्णालयात मोफत वैद्यकीय उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोविडच्या काळात ज्येष्ठांनी अनुभवलेला त्रास, महागाईमुळे वैद्यकीय उपचारांचा वाढलेला खर्च या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा आहे.