हॉटेल बुकिंग करताना सावधान!

इंटरनेटवर हाताशी सर्व माहिती ‘लगेच’ मिळते; पण ती खरी असतेच असे नाही. सायबर गुन्हेगार ‘अधिकृत’ नावांचा वापर करून अधिकृत नसलेल्या वेबसाइट बनवत आहेत.
Cyber Crime
Cyber Crimeesakal
Updated on

- शिरीष देशपांडे, सीए आणि संगणक कंट्रोल, सायबर गुन्हेविषयक अभ्यासक

इंटरनेटवर हाताशी सर्व माहिती ‘लगेच’ मिळते; पण ती खरी असतेच असे नाही. सायबर गुन्हेगार ‘अधिकृत’ नावांचा वापर करून अधिकृत नसलेल्या वेबसाइट बनवत आहेत. प्रसिद्ध हॉटेलच्या नावाने, बनावट फोन नंबर टाकून जाहिरात केली जाते.

त्यामुळे हव्या असलेल्या सेवा शोधताना लोक आयतेच सायबर चोरट्यांच्या या जाळ्यात अडकतात आणि पैसे गमावून बसतात. अशा काही घटना नुकत्याच उघडकीस आल्या आहेत. या घटनांमधून योग्य तो बोध घेऊन सावध राहून आपली फसवणूक टाळणे आवश्‍यक आहे.

एका प्रख्यात डॉक्टरांना आंतरराष्ट्रीय परिसंवादासाठी परदेशी जायचे होते. तातडी असल्याने त्यांनी ऑनलाइन व्हिसा अर्ज भरला आणि घाईघाईत त्याला जोडून आलेल्या पेमेंट ऑप्शनमध्ये जाऊन १६ हजार रुपये शुल्क भरले, नंतर पुढील प्रक्रिया करताना लक्षात आले, की त्या देशाच्या कॉन्सुलेटची हुबेहूब वेबसाइट चोरट्यांनी बनवली होती आणि त्यामुळे भरलेले पैसे वाया गेले. लक्षात आल्यावर त्यांनी ताबडतोब माहिती काढून अधिकृत व्यक्तीमार्फत आवश्‍यक प्रक्रिया पूर्ण केली आणि झालेल्या फसवणुकीची तक्रार दाखल केली.

अशाच प्रकारे एका व्यावसायिकाला महाबळेश्वरमधील एका प्रख्यात हॉटेलचे बुकिंग करताना फटका बसला. त्याने हॉटेलचे नाव देऊन इंटरनेटवर शोध घेतला असता, त्या हॉटेलचे नाव आणि फोन नंबर मिळाला. त्याने फार विचार न करता, त्या नंबरवर फोन केला आणि फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे एका बँक खात्यात १८ हजार रुपये भरले.

पैसे भरल्यानंतर पुन्हा काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यावेळी फोनवरील व्यक्ती सायबर चोर होती आणि पैसे लुबाडल्याचे त्या व्यावसायिकाच्या लक्षात आले. या घटनांवरून व्हिसा फी, हॉटेल बुकिंग या गोष्टी ऑनलाइन करताना अतिशय सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, हे लक्षात घेणे आवश्‍यक आहे.

घ्यावयाची काळजी

  • व्हिसासंबंधित कामे करताना अधिकृत वेबसाईट आहे, याची वारंवार खात्री करावी. आपण वेळ देऊ शकत नसल्यास अधिकृत एजंटमार्फत अर्ज करावा, पैसे भरावेत.

  • ज्या देशाचा व्हिसा पाहिजे आहे त्या देशाच्या अधिकृत साईटवर जाऊन व्हिसा ॲप्लिकेशन साइट तीच आहे ना, हे तपासावे.

  • पैसे भरताना ते कोणत्या खात्यात जातात हे बघावे, त्यात अधिकृत नाव आहे का तपासावे.

  • बुकिंग नामांकित साईटवर करा. हॉटेल बुकिंग करून देणाऱ्या वेबसाइट भरमसाट डिस्काउंट दाखवत असतील, तर हॉटेलच्या स्वतःच्या साइटवर जाऊन, खरा संपर्क नंबर शोधून खातरजमा करावी.

  • हॉटेलचे बुकिंग करताना हॉटेलच्या अधिकृत साइटवरूनच नंबर घेणे गरजेचे आहे. इंटरनेटवर शोधून घेऊ नये. बनावट असण्याची शक्यता जास्त असते.

  • हॉटेल बुकिंगचे पैसे भरण्याआधी त्या हॉटेलमध्ये आपण आधी राहिले असाल, तर त्याच्या बिलावर असलेल्या नंबर, तिथले घेतलेले व्हिझिटिंग कार्डवरील नंबरवर फोन करून अधिकृत पैसे भरण्याचा तपशील तपासावा.

  • शक्यतो क्रेडिट कार्डवर पेमेंट करा. काही गडबड झाल्यास ज्या बँकेचे कार्ड आहे तेथे जाऊन तक्रार करता येते.

चूक घडल्यास...

  • https://cybercrime.gov.in या संकेतस्थळावर, नजीकच्या पोलिस ठाण्यामध्येसुद्धा तक्रार दाखल करा आणि ताबडतोब बँकेत जाऊन तक्रार नोंदवा.

  • त्वरित १९३० या नंबरवर संपर्क साधा या नंबरवरची यंत्रणा तातडीने योग्य ती कार्यवाही करतील.

  • ‘यूपीआय’, जी-पे, पेटीएम, भीम या माध्यमातून पैसे देताना काही गडबड झाल्यास नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ‘यूपीआय’ची मुख्य संस्था यांच्या https://www.npci.org.in/what-we-do/upi/dispute-redressal-mechanism येथे तक्रार नोंदवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.