पिडिलाइट इंडस्ट्रीज

‘पिडिलाइट इंडस्ट्रीज’ या कंपनीमार्फत चिकटविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उत्पादनांमध्ये फेव्हिकॉल, डॉक्टर फिक्सिट, एमसील, फेव्हिक्विक, ॲराल्डाइट अशा विविध दर्जेदार उत्पादनांची निर्मिती होते.
pidilite industries production
pidilite industries productionsakal
Updated on

‘पिडिलाइट इंडस्ट्रीज’ या कंपनीमार्फत चिकटविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उत्पादनांमध्ये फेव्हिकॉल, डॉक्टर फिक्सिट, एमसील, फेव्हिक्विक, ॲराल्डाइट अशा विविध दर्जेदार उत्पादनांची निर्मिती होते. सध्या जाहीर झालेल्या तिमाही निकालानुसार, कंपनीचा महसूल ३,१३० कोटी रुपये झाला आहे, तर निव्वळ नफा ५११ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

कंपनीचा तिमाही निव्वळ नफा एका वर्षापूर्वीच्या याच कालावधीच्या तुलनेत सुमारे ६६ टक्क्यांनी वाढला आहे. मागील तीन तिमाही निकालांनुसार, एकूण निव्वळ नफा सुमारे १,४४४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

कंपनीने मजबूत पुरवठा साखळी निर्माण करण्यासाठी आधुनिकीकरण; तसेच नवी उत्पादन सुविधा स्थापन करण्यासाठी गुंतवणूक केली आहे. या तिमाहीत कंपनीने आणखी एक प्रकल्प सुरू केला आहे, ज्यामुळे वर्षभरात सेवेत दाखल झालेल्या प्रकल्पांची संख्या नऊ झाली आहे. सध्या भारतात एकूण सुविधांची संख्या ७० झाली आहे, तर परदेशात आणखी आठ सुविधा कार्यरत आहेत.

व्यवसायवृद्धीसाठी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भरत पुरी यांच्यानुसार, कंपनीचे प्रत्येक विभाग दर सहा ते नऊ महिन्यांनी एक किंवा दोन प्रमुख उत्पादने दाखल करतो. सध्या कंपनीने फेव्हिकॉल हाय-पर स्टार; तसेच सीलंट, वॉटरप्रूफिंगची नवी उत्पादने सादर केली आहेत. वॉटरप्रूफिंगमध्ये, छप्पर सील करण्यासाठी नवे बाह्य वॉटरप्रूफिंग सोल्यूशन ‘रेनकोट निओ’ व ‘रूफसील’ आणले आहे.

व्यवसायवृद्धीसाठी कंपनीने पुरवठादार, वितरक, सुतार आणि चॅनल भागीदार यांच्या व्यापक नेटवर्कवर भर दिला आहे. कंपनी यांच्याशी नियमितपणे संवाद साधते. या भागीदारांना बऱ्याचदा भांडवलाच्या ताणाचा सामना करावा लागतो, यामुळे ते अल्पकालीन निधीची विनंती करतात.

त्यांना आर्थिक साह्य प्रदान करण्यासाठी आणि कार्यक्षमतेने निधी पुनर्प्राप्त करण्यासाठी कंपनी कार्यरत आहे. याकरिता कंपनीने धोरणात्मक दृष्टीने कर्ज देण्याच्या क्षेत्रात उतरण्याची घोषणा केली आहे, याची सुरुवात दक्षिण भारतातील एका शहरातून होण्याची शक्यता आहे. कर्ज आणि भांडवलाचा विचार करता ही कंपनी जवळपास कर्जमुक्त आहे.

गेल्या दहा वर्षांचा विचार करता, कंपनी धंद्यात गुंतविलेल्या भांडवलावर सातत्याने दरवर्षी २० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवत असून, नफ्याची पुन्हा गुंतवणूक करून व्यवसायवृद्धी करत आहे. शेअर बाजारातील चढ-उतार आणि कंपनीच्या कार्यक्षेत्रातील धोका लक्षात घेऊन या कंपनीच्या शेअरमध्ये दीर्घावधीच्या दृष्टीने गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्याचा जरूर विचार करावा.

(या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.