Darjeeling Tea Dry spell impact: भारतात तुम्ही कुठेही जाल, तिथे तुम्हाला चहाची दुकाने दिसतील. चीन वगळता जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा भारत हा चहा पिण्यासाठी आणि उत्पादनासाठी ओळखला जातो. आपल्या आयुष्यात चहाचा इतका प्रभाव आहे की लोकांची सकाळची सुरुवात अनेकदा चहाने होते. असे बरेच लोक आहेत ज्यांना संध्याकाळी किंवा रात्री चहा पिणे आवडते. लोक त्यांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारचे चहा पितात. चहाच्या या लोकप्रियतेमुळे जगभरात दरवर्षी 15 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिन साजरा केला जातो.
उत्कृष्ट चवीसाठी प्रसिद्ध असलेला दार्जिलिंग चहा जगभरात प्रसिद्ध आहे. स्थानिक माती आणि हिमालयीन हवेत उगवलेला हा चहा त्याच्या चांगल्या दर्जासाठी ओळखला जातो. लहान पानांपासून बनवलेला दार्जिलिंग चहा काळ्या, हिरव्या आणि पांढऱ्या रंगात उपलब्ध आहे. विशेष म्हणजे दार्जिलिंग हे देशातील पहिले राज्य आहे जिथे दार्जिलिंगच्या विशेष चहाचे उत्पादन होते. याला जीआय मानांकनही मिळाले आहे. दार्जिलिंग चहा केवळ लठ्ठपणा रोखण्यासाठीच नाही तर पोटाच्या अल्सरवर उपचार करण्यासाठी देखील फायदेशीर आहे असा दावा दार्जिलिंगचे उत्पादक करतात.
पण याच दार्जिलिंगच्या चहावर आता संकट ओढवले आहे. दार्जिलिंग चहाला गेल्या काही काळापासून निसर्गाच्या कोपाचा सामना करावा लागत आहे. 2022 मध्ये दार्जीलिंग चहाचे उत्पादन 6.93 दशलक्ष किलो होते. 2023 मध्ये ते 6.18 दशलक्ष किलोपर्यंत घसरले आहे. उत्पादन कमी झाल्यामुळे चहाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. चहाच्या किमती या हंगामात सहा महिन्यांच्या कालावधीत 10-15% वाढल्या आहेत.
2017 मधील टेकड्यांमधील हिंसक आंदोलने आणि सध्या सुरू असलेल्या निवडणुकांपूर्वी गोरखालँडची मागणी यामुळे देखील बागांवर आणि त्यांच्या नफ्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. तसेच, परदेशी खरेदीदार दार्जिलिंगपेक्षा नेपाळच्या चहाला प्राधान्य देत आहेत. कारण नेपाळचा चहा खूपच स्वस्त आहे आणि दार्जिलिंगच्या चहा सारखीच चव त्याला आहे. (Know why is Darjeeling tea in crisis?)
दार्जिलिंगसाठी अनियमित पाऊस काही नवीन नाही पण गेल्या वर्षी दोन दशकांतील सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. पण सध्या, चहा पिकवणाऱ्या भागात, हवामान चांगले नसल्यामुळे त्याचा परिणाम उत्पादनावर आहे.
उत्तर बंगालमधील दार्जिलिंगपासून सुमारे 100 किमी अंतरावर असलेल्या डुअर्समध्ये परिस्थिती चांगली आहे. उत्तर भारतात प्रामुख्याने पश्चिम बंगाल आणि आसाम यांचा समावेश होतो, ज्याचा एकूण चहा उत्पादनापैकी 83 टक्के वाटा आहे. आसाममधील वरच्या भागात पिकांची स्थिती खूपच चांगली मानली जाते.
मात्र, आगामी काळात एल निनोचा प्रभाव राहिल्यास आणि पाऊस कमी झाल्यास परिस्थिती बदलू शकते. हवामानामुळे दक्षिण भारतात उत्पादनावर परिणाम झाला आहे. मुन्नारसारख्या दक्षिण भारतातील काही भागात फेब्रुवारी महिन्यात सुमारे 550-600 हेक्टर क्षेत्र थंडीने प्रभावित झाले होते.
इंडियन टी असोसिएशनने (ITA) अडचणीत सापडलेल्या दार्जिलिंग चहा उद्योगाला पाठिंबा देण्यासाठी केंद्राकडून आर्थिक मदत मागितली आहे. उत्पादनात घट झाल्यामुळे दार्जिलिंगमधील परिस्थिती गंभीर असल्याचे आयटीएने म्हटले आहे. अशा परिस्थितीत आर्थिक पॅकेजशिवाय दार्जिलिंग चहा उद्योगाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
मार्च 2022 मध्ये वाणिज्य संसदीय स्थायी समितीने मंजूर केलेल्या आर्थिक पॅकेजवर विचार करावा आणि त्यावर कार्यवाही करावी असे आवाहन त्यांनी केले आहे. टी बोर्ड डेटाचा हवाला देऊन, ITA ने म्हटले आहे की प्रतिकूल हवामानामुळे आसाम आणि पश्चिम बंगालमधील चहाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे, ज्यामुळे उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे.
ITA ने सांगितले की भारतातून चहाची निर्यात जानेवारी-डिसेंबर 2023 मध्ये 22.79 कोटी किलोग्रॅमवर घसरली, तर 2022 मध्ये 23.10 कोटी किलोग्रॅमची निर्यात झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.