डॉ. वीरेंद्र ताटके
म्युच्युअल फंडांच्या विविध प्रकारांतील फारसा परिचित नसलेला एक प्रकार म्हणजे आर्बिट्राज फंड. इतर फंडांपेक्षा कामकाजाची थोडी वेगळी पद्धत असलेल्या या फंडांकडे गेल्या काही दिवसांत गुंतवणूकदारांचा पुन्हा एकदा ओघ सुरू झाला आहे.
जुलै २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत गुंतवणूकदारांनी सुमारे ३५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक आर्बिट्राज फंडांच्या विविध योजनांमधून काढून घेतली. मात्र, आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये एक एप्रिलपासून या फंडांत तब्बल १४,००० कोटी रुपयांची नवी गुंतवणूक झाली आहे. गुंतवणूकदारांना या फंडांचे अचानक आकर्षण वाटण्याचे कारणही तसेच आहे. ते जाणून घेण्याआधी आर्बिट्राज फंडांच्या कामकाजाची पद्धत समजावून घेऊ या.
कामकाजाची पद्धत
आर्बिट्राज फंड त्यांच्या एकूण मालमत्तेपैकी कमीतकमी ६५ टक्के गुंतवणूक रोखीचा बाजार आणि वायदा बाजार यातील व्यवहारांमध्ये गुंतवतात. अगदी सोप्या शब्दांत सांगायचे, तर असे फंड रोखीच्या बाजारात ज्या कंपन्यांचे शेअर खरेदी करतात, त्याच कंपन्यांचे शेअर वायदा बाजारात विकतात आणि महिनाअखेरीस जेव्हा वायदा बाजारातील व्यवहारांची पूर्तता होते, तेव्हा खरेदी-विक्रीच्या भावातील फरकातून फायदा कमवितात.
कमी प्राप्तिकरामुळे आकर्षण
आर्थिक वर्ष २०२३-२४च्या केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार आर्बिट्राज फंडांतील गुंतवणुकीतून गुंतवणूकदारांना मिळणाऱ्या फायद्यावर कमी दराने प्राप्तिकर द्यावा लागणार आहे. विशेषतः ज्या करदात्यांना अधिक दराने प्राप्तिकर द्यावा लागतो, त्यांना याचा फायदा होणार आहे. या मुख्य कारणामुळे त्यांचा ओढा आर्बिट्राज फंडांकडे वाढला असल्याचे चित्र आहे.
गुंतवणूकदारांनी काय करावे?
अल्पकाळात बाजार जेवढा दोलायमान असेल, तेवढा त्याचा फायदा आर्बिट्राज फंडांना होतो. येणाऱ्या काळात बाजार दोलायमान राहण्याची शक्यता अधिक आहे, ज्याचा फायदा अशा फंडांना होऊ शकतो, असे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत.सामान्य गुंतवणूकदारांनी सर्वप्रथम अशा फंडांची कार्यपद्धती समजून घ्यावी
आणि साधारण सहा महिने किंवा अधिक कालावधी डोळ्यासमोर ठेवून आर्बिट्राज फंडांत गुंतवणूक करण्याचा विचार करावा. अगदीच थोड्या दिवसांसाठी किंवा एखाद्या महिन्यासाठी गुंतवणूक करण्यासाठी
असे फंड टाळावेत. कारण एवढ्या छोट्या कालावधीत आर्बिट्राज फंडांमधील परताव्याच्या अंदाज बांधणे खूप अवघड असते.
उपलब्ध फंड
इन्व्हेस्को इंडिया आर्बिट्राज फंड
एसबीआय आर्बिट्राज ॲपॉर्च्युनिटीज फंड
कोटक इक्विटी आर्बिट्राज फंड
एडलवाईज आर्बिट्राज फंड
एचडीएफसी आर्बिट्राज फंड
(लेखक पुण्यातील इंदिरा ग्लोबल स्कूल ऑफ बिझनेस येथे कार्यरत आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.