करकायदा : सुगम आयटीआर-४

आयटीआर-४ फॉर्म प्राप्तिकर कायद्याच्या ‘कलम ४४ एडी’, ‘कलम ४४एडी’ आणि ‘कलम ४४एई’ नुसार गृहीत उत्पन्न योजनेचा पर्याय निवडलेल्या करदात्यांसाठी आहे.
Tax Law
Tax LawSakal
Updated on

आयटीआर-४ फॉर्म प्राप्तिकर कायद्याच्या ‘कलम ४४ एडी’, ‘कलम ४४एडी’ आणि ‘कलम ४४एई’ नुसार गृहीत उत्पन्न योजनेचा पर्याय निवडलेल्या करदात्यांसाठी आहे. तथापि, व्यावसायिक उलाढाल दोन कोटींपेक्षा अधिक व बौद्धिकी व्यवसायाची उलाढाल पन्नास लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास करदात्यास ‘आयटीआर-३’ दाखल करावे लागेल. यंदाच्या अर्थसंकल्पात या दोन्ही मर्यादा, ९५ टक्के उत्पन्न व खर्च बँकेमार्फत नोंदीत झाल्यास, अनुक्रमे रुपये तीन कोटी व रुपये पंचाहत्तर लाखांर्पयंत वाढविण्यात आल्या आहेत. मात्र, ही तरतूद पुढील वर्षासाठी (आकारणी वर्ष २०२४-२५) लागू होणार आहे. चालू वर्षाच्या प्राप्तिकर मर्यादेत बदल नाही.

हे विवरणपत्र कोणाला भरता येणार नाही?

करदात्यांचे शेतीपासून मिळणारे करमुक्त उत्पन्न पाच हजार रुपयांपेक्षा अधिक असेल (इतर करमुक्त उत्पन्नास अट नाही) किंवा लॉटरी वा घोड्यांच्या शर्यतीत उत्पन्न मिळविले असेल किंवा भांडवली नफा किंवा व्यवसायातून उत्पन्न मिळविले असेल किंवा परदेशात काही मालमत्ता असल्यास, किंवा विदेशी कर सवलत मिळणार असेल, किंवा काही उत्पन्न परदेशातून आले असेल किंवा उर्वरीत स्त्रोतातून मिळणारे उणे उत्पन्न असेल किंवा व्यक्ती कंपनीमध्ये संचालक असेल किंवा शेअर बाजारात नोंद नसणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली असल्यास किंवा घरापासून मिळणाऱ्या उत्पन्नाऐवजी नुकसान होत असेल व ते पुढील वर्षासाठी ओढायचे असेल तर किंवा करदाता ‘निवासी व सामान्य निवासी नसेल किंवा अनिवासी’ असेल, तर हे विवरणपत्र भरता येणार नाही.

कलम ४४ एडीए

‘आयटीआर ४’मध्ये डॉक्टर, इंजिनीअर, वकील, माहिती तंत्रज्ञान व्यावसायिक अशी कोणतीही व्यक्ती व्यावसायिक क्षमतेत सामील आहे, अशांना ‘कलम ४४एडीए’ अंतर्गत मिळालेल्या सेवाशुल्काच्या पन्नास टक्के रक्कम उत्पन्न गृहीत धरण्याची सुसंधी या आयटीआरमध्ये उपलब्ध करून देण्यात आली असल्याने मोठ्या प्रमाणावर प्राप्तिकर वाचणार आहे.

याखेरीज कारकुनी काम वाचल्याने या व्यावसायिकांना ‘अच्छे दिन’ आले आहेत, असे म्हणायला हरकत नाही. पगारदार वर्गाला जशी खर्चासाठी प्रमाणित वजावट दिली जाते, तशी नसली तरी त्यासारखी खर्चाची तरतूद गृहीत उत्पन्नाच्या निकषाद्वारे मिळत आहे, हे महत्त्वाचे! पूर्वी काही व्यावसायिक न केलेले खर्च दाखवून ताळेबंद लिहित असत व खरे उत्पन्न लपवत असत, त्यावर ‘सीबीडीटी’ने हा तोडगा काढला आहे.

हे विवरणपत्र भरण्यास अतिशय सुलभ व अतिशय फायदेशीर आहे. याची छाननी होण्याची शक्यता कमी असल्याने ते लोकप्रिय आहे. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे या व्यावसायिकांना पूर्वी आवश्यक असणारी कोणतीही लेखापुस्तके ठेवावी लागणार नाहीत, तर मिळालेल्या सेवाशुल्काच्या संदर्भात एक नोंदवही ठेवावी लागेल.

उत्पन्न गृहीत धरले जाणार असल्याने कोणताही खर्च वजावटीसाठी पात्र ठरणार नाही, हे महत्त्वाचे! तथापि ‘कलम ८०’ अंतर्गत मिळणाऱ्या सर्व वजावटी पात्र ठरणार आहेत, ही याची विशेषता आहे. ‘सुगम आयटीआर-४’ ऑनलाइन वा ऑफलाइन भरता येतात. मात्र, उत्पन्न ५० टक्क्यांपेक्षा कमी दाखविल्यास लेखापरीक्षण करावेच लागेल.

कलम ४४ एई

जे लोक मालवाहू वाहने चालविण्याच्या, भाडे कराराने देण्याच्या धंद्यात आहेत व आर्थिक वर्षात कधीही मालकाकडे दहापेक्षा जास्त मालवाहू वाहने मालकीचे वा हप्त्याने खरेदी केलेली नसेल, तर त्यांना हे विवरणपत्र भरता येईल. व्यक्ती, एचयूएफ, कंपनी किंवा भागीदारी फर्म ही सुविधा घेऊ शकतात.

कलम ४४ एडी

जेव्हा करदाता एखादा छोटासा व्यवसाय चालवीत असेल तेव्हा त्याच्याकडे योग्य हिशेबपुस्तके ठेवून नफा किंवा तोटा काढण्यासाठी आवश्यक असणारी संसाधने असू शकत नाहीत. त्यामुळे व्यवसायातील उत्पन्नाचा आणि करांचा मागोवा ठेवणे अवघड होते. ही अडचण लक्षात घेऊन, प्राप्तिकर विभागाने काही सोप्या तरतुदी केल्या आहेत.

‘कलम ४४ एडी’ अंतर्गत करदात्याचे उत्पन्न व्यवसायाच्या एकूण मिळणाऱ्या ढोबळ जमा उत्पन्न रक्कमेच्या आधारित गृहित धरले जाते, वास्तवात तसे असले वा नसले तरी. या पद्धतीत टक्केवारीच्या आधारे अंदाजित उत्पन्नावर कर आकारला जातो. देशात सेवा पुरवणारे, रंगकाम करणारे कंत्राटदार, अशा सव्वा तीनशे व्यवसायांची व ‘इतर’ मथळ्याखाली असे अनेक व्यवसाय करणाऱ्याची सूची या प्राप्तिकर विवरणपत्रात उपलब्ध करून दिली असल्याने लाखो लोकांनी या पद्धतीचा स्वीकार केला आहे.

ठळक बाबी

1) रहिवासी करदात्याच्या निव्वळ उत्पन्नाचा अंदाज त्याच्या व्यवसायाच्या एकूण ढोबळ आवक उत्पन्न रक्कमेच्या आठ टक्के, तर डिजिटल पेमेंटद्वारे ढोबळ रक्कम प्राप्त झाल्यास अशा उत्पन्नावर सहा टक्के गृहीत धरला जातो.

2) व्यवसायासाठी १५ मार्चपर्यंत १०० टक्के आगाऊ कर भरावा लागतो.

3) ढोबळ जमा उत्पन्न किंवा उलाढाल दोन कोटी रुपयांपेक्षा कमी असावी.

(लेखक चार्टर्ड अकाउंटंट-सीए आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.