छोटा बच्चा समझके मुझको...

भारतीय म्युच्युअल फंड व्यवसायातील सर्वोच्च संस्था ‘ॲम्फी’ने (असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया) नुकतीच ‘सेबी’च्या मार्गदर्शनाखाली शेअर बाजारातील कंपन्यांची नवी वर्गवारी केली आहे.
Small Cap
Small Capsakal
Updated on

भारतीय म्युच्युअल फंड व्यवसायातील सर्वोच्च संस्था ‘ॲम्फी’ने (असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया) नुकतीच ‘सेबी’च्या मार्गदर्शनाखाली शेअर बाजारातील कंपन्यांची नवी वर्गवारी केली आहे. त्यानुसार शेअर बाजारातील सर्वाधिक बाजारमूल्य असलेल्या शंभर कंपन्या लार्ज कॅप म्हणून संबोधल्या जातात, त्यानंतरच्या दीडशे कंपन्या मिड कॅप कंपन्या, तर उर्वरित कंपन्यांना स्मॉल कॅप कंपन्या म्हणतात.

अशा स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडांना स्मॉल कॅप म्युच्युअल फंड म्हणतात. या फंडांच्या एकूण गुंतवणुकीपैकी किमान ६५ टक्के गुंतवणूक स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअरमध्ये असते. अधिक जोखीम घेऊन अधिक परतावा मिळवण्याची अपेक्षा असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी स्मॉल कॅप फंड योग्य ठरतात.

गुंतवणूकदार दूर...

स्मॉल कॅप फंडाच्या गुंतवणुकीच्या वैशिष्ट्यांमुळे काही गुंतवणूकदार त्यापासून लांब राहणे पसंत करतात. याची महत्त्वाची दोन कारणे आहेत. पहिले म्हणजे स्मॉल कॅप शेअरचा बाजारभाव खूप दोलायमान असतो. कंपनीच्या आर्थिक कामगिरीत होणाऱ्या चढ-उतारांचा परिणाम लगेच त्यांच्या बाजारभावावर होतो आणि पर्यायाने फंडाच्या कामगिरीवर होतो. दुसरे कारण म्हणजे स्मॉल कॅप कंपन्यांच्या भांडवलाचा पाया तुलनेने कमी मजबूत असतो.

याउलट लार्ज कॅप शेअरच्या भांडवलाचा पाया खूप विस्तृत आणि मजबूत असल्याने कोणताही एखादा गुंतवणूकदार कंपनीच्या बाजारभावावर परिणाम करू शकत नाही. जेव्हा शेअर बाजार तेजीत असतो आणि सर्वत्र आलबेल असते तेव्हा छोट्या आकाराच्या कंपन्यांच्या शेअरचे भाव मोठ्या कंपन्यांच्या तुलनेत (लार्ज कॅप शेअर) वेगाने वाढतात. मात्र, काही कारणाने बाजार कोसळला, तर छोट्या कंपन्यांचे शेअर मोठ्या कंपन्यांच्या शेअरच्या तुलनेत अधिक वेगाने कोसळतात. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार स्मॉल कॅप फंडांकडे दुर्लक्ष करतात.

सकारात्मक दृष्टिकोन

स्मॉल कॅप फंडांच्या या गुणवैशिष्ट्यांचा सकारात्मक दृष्टिकोनातून विचार केल्यास हे फंड आकर्षक वाटायला लागतात. उत्तम कामगिरी करणाऱ्या स्मॉल कॅप कंपन्यांचे वैशिष्ट्य म्हणजे भविष्यात त्या मिड कॅप म्हणजेच मध्यम आकाराच्या कंपन्या होऊ शकतात आणि दीर्घकाळात त्यांच्या कामगिरीत तसेच सातत्य राहिले, तर त्या लार्ज कॅप कंपनी होण्याची किमयादेखील करू शकतात. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता अशा स्मॉल कॅप फंडांमध्ये नियमितपणे दीर्घकाळासाठी गुंतवणूक करत राहाणे, हे गुंतवणुकीचे उत्तम धोरण ठरते.

कॅलेंडर वर्ष २०२३ मध्ये बहुतेक सर्वच स्मॉल कॅप फंडांनी उत्तम कामगिरी केली. यांपैकी सर्वोत्तम कामगिरी करणारे काही फंड पुढीलप्रमाणे आहेत.

फंडाचे नाव परतावा (टक्के) जाने. ते डिसें.२३

महिंद्रा मॅन्यूलाईफ ५७.१८

बंधन स्मॉल कॅप ५३.६०

फ्रँकलिन इंडिया ५२.१५

आयटीआय ५१.९३

निप्पॉन इंडिया ४८.९२

स्मॉल कॅप कंपन्यांचा समावेश असलेला मुंबई शेअर बाजाराच्या स्मॉल कॅप इंडेक्स या निर्देशांकानेदेखील गेल्या वर्षात जोरदार कामगिरी केली आहे. या निर्देशांकाने दीर्घकाळातदेखील उत्तम कामगिरी केली आहे. मार्च २०२० मध्ये कोरोना महासाथीच्या पहिल्या लाटेदरम्यान, ८६०० अंशांच्या पातळीवर गेलेला हा निर्देशांक अवघ्या चार वर्षांच्या कालावधीत आता ४५,००० अंशाच्या पातळीला पोहोचला आहे.

याचेच प्रतिबिंब स्मॉल कॅप म्युच्युअल फंडांच्या परताव्यातदेखील पडले आहे. म्हणूनच उत्तम कामगिरी करणाऱ्या स्मॉल कॅप कंपन्यांची ताकद ओळखून स्मॉल कॅप फंडांकडे ‘छोटा बच्चा’ म्हणून दुर्लक्ष करू नये. येणाऱ्या काळात अशा फंडांमध्ये दीर्घकाळासाठी ‘एसआयपी’ पद्धतीने गुंतवणूक करत राहाणे व बाजार कोसळेल त्यावेळी शक्य असल्यास मोठी एकरकमी गुंतवणूक करणे, हे धोरण स्वीकारणे योग्य ठरेल, असे वाटते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.