नवी दिल्ली: देशाचे डिजिटल चलन असलेल्या सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (सीबीडीसी) अर्थात ‘ई-रुपी’ने एका दिवसात दहा लाखांहून अधिक व्यवहार करण्याचा विक्रम नोंदविला आहे. २७ डिसेंबर २०२३ रोजी ‘ई-रुपी’ने हा विक्रम केल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले.
भारताने दाखल केलेली यूपीआय प्रणाली आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त सुविधा ठरली आहे, तर ‘ई-रुपी’नेही त्याच्या पावलावर पाऊल ठेवत विक्रमी कामगिरी केली आहे. रिझर्व्ह बँकेने एक डिसेंबर २०२२ रोजी ‘ई-रुपी’ हे देशाचे पहिले डिजिटल चलन दाखल केले.
रिझर्व्ह बँकेने २०२३च्या अखेरीस दहा लाख डिजिटल चलन व्यवहारांचा विक्रम गाठण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर टी. रवी शंकर यांनी जुलै २०२३ मध्ये सांगितले होते.‘ई-रुपी’ व्यवहारासाठी बँक खात्याची आवश्यकता नसते.
रिझर्व्ह बँक प्रत्यक्ष चलनाऐवजी ‘ई-रुपी’ थेट डिजिटल वॉलेटमध्ये हस्तांतर करते. हे डिजिटल वॉलेट बँकेकडून जारी केले जाते. फोन-पे, पेटीएम, गुगल-पे सारख्या इतर पेमेंट सिस्टीममध्ये व्यवहार किमान एका बँकेतून केला जातो, ‘ई-रुपी’ क्यूआर कोड स्कॅन करून थेट हस्तांतर करता येतात.
‘यूपीआय’द्वारे व्यवहार करण्यासाठी बँक खात्यात पैसे असणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला एकतर स्वतः खात्यात रोख पैसे जमा करावे लागतात किंवा इतर बँक खात्यातून खात्यात भरावे लागतात. ‘ई-रुपी’मध्ये प्रत्यक्ष चलन एकदाही खात्यात जमा करावे लागत नाही.
‘ई-रुपी’ म्हणजे काय?
सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (सीबीडीसी) याला ‘ई-रुपी’ म्हणतात. हे कागदी चलनाचे डिजिटल स्वरूप आहे, जे क्रिप्टो चलनासारख्या ब्लॉक-चेन तंत्रज्ञानावर आधारित आहे. त्याचे मूल्य सध्याच्या चलनाच्या बरोबरीचे आहे.
शंभर, दोनशे रुपयांच्या नोटांप्रमाणे ही सरकारची कायदेशीर निविदा आहे, जी स्वीकारण्यास कोणीही नकार देऊ शकत नाही. ‘ई-रुपी’ फक्त मोबाईल वॉलेटमध्ये ठेवता येतात. ते ठेवण्यासाठी बँक खात्याची गरज नाही. सीबीडीसी घाऊक आणि रिटेल अशा दोन प्रकारात वापरण्यास उपलब्ध आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.