यश डागा
शिस्तबद्ध आणि पद्धतशीर गुंतवणूक केवळ विविध आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यास मदत करत नाही, तर पैशाशी संबंधित चिंता दूर ठेवण्यासही मदत करते. अशा गुंतवणुकीचा लोकप्रिय मार्ग आहे, तो म्हणजे म्युच्युअल फंडातील ‘एसआयपी’. ‘एसआयपी’मुळे अगदी कमीत कमी रकमेची दरमहा गुंतवणूक करता येते.
‘थेंबे थेंबे तळे साचे’ची प्रचिती ‘एसआयपी’द्वारे होणाऱ्या गुंतवणुकीतून मिळते. याचाच आणखी एक आकर्षक प्रकार म्हणजे ‘फ्रीडम एसआयपी’. हा एक असा पर्याय आहे जो गुंतवणूकदारांना नियमित रोख उत्पन्नाचा प्रवाह उपलब्ध करून देतो. ‘फ्रीडम एसआयपी’ हा ‘एसआयपी’ म्हणजे शिस्तबद्ध नियमित गुंतवणूक आणि ‘एसडब्ल्यूपी’ शिस्तबद्ध नियमित पैसे काढण्याची तरतूद या दोन प्रभावी गुंतवणूक साधनांचे शक्तिशाली मिश्रण आहे.
फायदे
अ) दीर्घकालीन गुंतवणुकीची सवय : अनेकदा गुंतवणूकदारांचा गुंतवणुकीचा दृष्टिकोन अल्पकालीन असतो आणि त्यामुळे मोठ्या संपत्तीनिर्मितीला मुकावे लागते. ‘फ्रीडम एसआयपी’च्या निश्चित कालावधीमुळे गुंतवणूक शिस्तबद्ध आणि दीर्घकाळ होते.
उदाहरणार्थ, शेअर बाजारात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार बाजारात पडझड झाली, अस्थिरता वाढली, की भीतीपोटी गुंतवणूक काढून घेतात, तर बाजारात तेजी असते, तेव्हा गुंतवणूकदार अधिक लाभाच्या मोहाने अधिक गुंतवणूक करण्याचा विचार करतात.
मात्र, या धोरणामुळे अनेकदा त्यांना नुकसान सोसावे लागते. दीर्घकाळ सातत्याने केलेल्या गुंतवणुकीमुळे होणारा लाभ मिळत नाही. ‘एसआयपी’मध्ये हा लाभ मिळतो. ‘फ्रीडम एसआयपी’ गुंतवणूकदारांना बाजारातील चढ-उतारांमध्ये स्थिर कालावधीसह तटस्थ राहण्याची खात्री देते.
त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणुकीची जोखीम घेण्यापेक्षा वेळ एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास शिस्तबद्ध गुंतवणुकीचा सवय लागते आणि जोखीमही कमी होते.
ब) गुंतवणुकीबाबत वर्तनबदल : बाजार चक्राच्या विविध टप्प्यांवर, गुंतवणूकदारांचे गुंतवणुकीबद्दलचे वर्तन बदलते. किंबहुना, गुंतवणुकीचा कार्यकाळ संपत असताना, गुंतवणूकदार एकतर संपूर्ण रक्कम काढून घेतात किंवा ती तशीच ठेवतात. या दोन्ही पद्धती अपेक्षित परिणाम देऊ शकत नाहीत.
पैसे काढून घेतल्यामुळे संपत्ती निर्मितीचा प्रवास थांबतो आणि जमा झालेला निधी बाजाराच्या चक्रातून उद्भवणाऱ्या जोखमीच्या अधीन राहतो. फ्रीडम एसआयपीमुळे जमा केलेली संपत्ती तुलनेने कमी जोखमीच्या योजनेत वर्ग केली जाते आणि तिथून एसडब्ल्यूपी सुरू होते आणि शिल्लक युनिट्सचे मूल्य वाढत राहते.
क) पैसे काढण्यातही शिस्तबद्धता : अचानक संपूर्ण पैसे काढल्यामुळे मोठे नुकसान होते. त्यामुळे शिस्तबद्धपणे पैसे काढणे हा उत्तम मार्ग आहे. ‘एसडब्ल्यूपी’मुळे ही सुविधा मिळते. त्यामुळे आवश्यक तरलतेसह उर्वरित गुंतवणूकही वाढत जाते.
‘फ्रीडम एसआयपी’मुळे गुंतवणूकदारांना नियमितपणे रोख रकमेचा पुरवठा होतो. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सोयीस्कर आहे.
(लेखक मल्टिइन्व्हेस्टमेंट कंपनीचे संचालक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.