‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी बँकिंग क्षेत्र मोलाच - अर्थमंत्री निर्मला सीतारामन

पुण्यात मुख्यालय असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या ९० व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने येथे आयोजित केलेल्या खास कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
Nirmala Sitharaman
Nirmala Sitharaman sakal
Updated on

पुणे : ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी देशातील बँकिंग क्षेत्राला अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (गुरुवारी) येथे केले.

पुण्यात मुख्यालय असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या ९० व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने येथे आयोजित केलेल्या खास कार्यक्रमात त्या बोलत होत्या. केंद्रीय आर्थिक सेवा विभागाचे सचिव एम. नागराजू, महाबँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी निधू सक्सेना व्यासपीठावर उपस्थित होते.

याप्रसंगी बँकेने सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योजकांसाठी आणलेल्या कॅशफ्लो आधारित कर्जसुविधेचे; तसेच बँकेच्या व्हीजन डॉक्युमेंटचे अर्थमंत्र्यांच्या हस्ते औपचारिक सादरीकरण करण्यात आले. बँकेने सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून वन्यजीव, पाळीव प्राणीरक्षण आणि महिला क्रीडा क्षेत्रात हाती घेतलेल्या विविध उपक्रमांतर्गत डॉ. कस्तुरी भडसावळे, डॉ. नूपुर देसाई आणि महिला व्हॉलिबॉल संघातील खेळाडूंचा यथोचित सन्मानही करण्यात आला.

याप्रसंगी सीतारामन यांनी महाबँकेच्या ९० वर्षांच्या देदीप्यमान कामगिरीचा गौरव केला. निव्वळ नफा, थकीत कर्जांचे प्रमाण, एकूण ठेवींचे प्रमाण, कर्जवितरण अशा विविध आर्थिक निकषांवर ही बँक सार्वजनिक क्षेत्रातील अन्य बँकांच्या तुलनेत सरस कामगिरी करीत असल्याचे नमूद करून त्यांनी इतर बँकांनी याचे अनुकरण करायला हवे, असे मत व्यक्त केले.

‘‘आपल्या पंतप्रधानांनी २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न पाहिले आहे आणि ते स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याच्या प्रयत्नात बँकांना अतिशय महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल,’’ असे सांगून त्या म्हणाल्या, की पायाभूत सेवा-सुविधा क्षेत्राच्या विकासाला गती देण्याची गरज असून, त्यादृष्टीने उद्योजकांना गरजेआधारित अर्थसाह्य, अद्याप बँकिंग सेवाक्षेत्रात न आलेल्यांना औपचारिक बँकिंग प्रवाहात आणणे आणि सर्व नागरिकांना विमा संरक्षण पुरविणे यासारख्या गोष्टींना चालना द्यायला हवी.

बँकिंग क्षेत्रात नवनव्या तंत्रज्ञानामुळे क्रांती घडत आहे, असा उल्लेख करून अर्थमंत्री म्हणाल्या, की ग्राहकांना सुरक्षित, विश्‍वासार्ह आणि सहजपणे वापरता येण्यासारखा डिजिटल बँकिंगचा अनुभव देता आला पाहिजे. अशी यंत्रणा सहजपणे कुणालाही ‘हॅक’ करता येणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे, कारण यात ग्राहकांच्या विश्वासाला तडा जाता कामा नये.

आर्थिक सेवा विभागाचे सचिव एम. नागराजू यांनी आपल्या भाषणात बँक ऑफ महाराष्ट्रच्या गौरवपूर्ण वाटचालीवर प्रकाश टाकताना, महाबँकेकडून हाती घेतल्या जात असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.

बँकेचे व्यवस्थापकीय संचालक निधू सक्सेना यांनी प्रास्ताविकात महाबँकेच्या सेवा-सुविधांचा, उपक्रमांचा आढावा घेताना, ग्राहकांना जागतिक दर्जाची बँकिंग सेवा देण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. ग्राहककेंद्रीत नव्या कल्पक सुविधा देण्याकडे बँकेचा कल असून, आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत बँकांच्या शाखांचे जाळेही विस्तारणार असल्याचे त्यांनी सांगितले.

‘यूपीआय’ विस्तार

युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) ही रिअल-टाइम पेमेंट सिस्टीम एप्रिल २०१६ मध्ये सादर करण्यात आली. रिटेल डिजिटल पेमेंट क्षेत्रात या ‘यूपीआय’ने क्रांती घडवून आणली, असा उल्लेख करून अर्थमंत्री म्हणाल्या, की आज एकूण रिअल-टाइम डिजिटल पेमेंट्सपैकी अंदाजे ४५ टक्के व्यवहार भारतात होत आहेत. ‘यूपीआय’चा भूतान, नेपाळ, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती, फ्रान्स, मॉरिशस, सिंगापूर या सात देशांनी स्वीकार केला आहे, ही गौरवास्पद बाब आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.