- किरांग गांधी
भारतासारख्या गतिमान आणि वैविध्यपूर्ण देशात आर्थिक स्वातंत्र्याची कल्पना ही एकाच वेळी, महत्त्वाची आणि भ्रामक अशा दोन्ही प्रकारची वाटू शकते. अनेकदा, प्रत्येकाच्या जीवनाची गोष्ट एका रेषेत असल्यासारखी दिसून येते. उदा. शिक्षण, नोकरी, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि नंतर सेवानिवृत्ती.
मात्र, केवळ बिले व कर्ज न भरता या चक्रातून मुक्त होण्याची इच्छा अनेकांच्या मनात असते. आर्थिक स्वातंत्र्य एखाद्या व्यक्तीला केवळ सुरक्षाच देत नाही, तर स्वातंत्र्यही देते. आपला जन्म फक्त बिले आणि कर्ज भरण्यासाठी नाही; असे वाटत असेल आणि ते साध्य करायचे असेल, तर त्यासाठी आर्थिक स्वातंत्र्याला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. त्यासाठी शिस्त, नियोजन व स्वतःच्या आर्थिक स्थितीचे सखोल आकलन आवश्यक आहे.
नियमित नोकरीवर अवलंबून न राहता तुमचा दैनंदिन खर्च भागवण्यासाठी तुमच्याकडे पुरेसे उत्पन्न असते, तेव्हा आर्थिक स्वातंत्र्य गाठले गेले आहे असे म्हणता येते. यामध्ये, असा एक मार्ग तयार करण्याला प्राधान्य असते, जिथे तुमचे पैसे तुमच्यासाठी काम करतात. यामध्ये बचत करणे, खर्च करताना थोडीशी हुशारी दाखवणे आणि तुमची कमाई क्षमता वाढवणे यांचा समावेश आहे.
आर्थिक स्वातंत्र्याचा पाया म्हणजे प्रभावी आर्थिक व्यवस्थापन होय. यासाठी तुमच्या उत्पन्न आणि खर्च यांचा हिशेब ठेवणे गरजेचे असते. यासाठी तुम्हाला आर्थिक नियोजन करावे लागेल, जे तुम्हाला अशी क्षेत्रे ओळखण्यात मदत करेल;
जिथे तुम्ही खर्च कमी करू शकता आणि बचत वाढवू शकता. त्यासाठी तुमची आर्थिक उद्दिष्टे आणि जबाबदाऱ्यांनुसार आर्थिक नियोजन करून उत्पन्नातील किमान २० ते ४० टक्के रकमेची गुंतवणूक करणे हा एक उत्तम नियम ठरतो.
आर्थिक स्वातंत्र्याचे स्वप्न पाहण्याआधी, आपत्कालीन निधीची तरतूद महत्त्वाची असते. यात किमान सहा महिन्यांच्या खर्चाचा समावेश असावा. या निधीचा उपयोग मोठे आजारपण, नोकरी गमावण्याची स्थिती किंवा इतर आपत्तीत होऊ शकतो. अशा तरतुदीमुळे दीर्घकालीन योजनांवर परिणाम होत नाही.
आर्थिक स्वातंत्र्याचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे लवकरात लवकर कर्जमुक्ती. तुमच्यावर जेव्हा कोणत्याही कर्जाचा बोजा नसतो, तेव्हा तुमचे स्वतःच्या पैशांवर सर्वाधिक नियंत्रण असते. कर्जमुक्तीमुळे भविष्यातील उद्दिष्टांसाठी गुंतवणूक व बचतीचे स्वातंत्र्य आणि आर्थिक स्थिरतेमुळे मिळणारी मनःशांती प्राप्त होते.
आर्थिक स्वातंत्र्यासाठी स्पष्ट, साध्य होण्यासारखीच उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवावी. घरखरेदी, मुलांचे शिक्षण किंवा निवृत्तीचे नियोजन असो, यामध्ये दीर्घकालीन दृष्टिकोन असेल, तर तुम्ही आर्थिक स्वातंत्र्यासाठी प्रेरित होता. आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याचा उत्साह व वचनबद्धता दृढ राहावी, यासाठी तुम्ही साध्य केलेल्या छोट्या-छोट्या उद्दिष्टांचा आनंद जरूर साजरा करा.
आर्थिक स्वातंत्र्याचा मार्ग एका सरळ रेषेत कधीच नसतो. कारण आर्थिक परिस्थिती सतत बदलत असते आणि वैयक्तिक परिस्थिती कायम विकसित होत असते. यासाठी खर्चाच्या बाबतीत लवचिक राहणे व आवश्यकतेनुसार तुमच्या आर्थिक योजनांशी जुळवून घेणे महत्त्वाचे असते.
तुमच्या दीर्घकालीन उद्दिष्टांशी तडजोड न करता आर्थिक उद्दिष्टांची व धोरणांची नियमित उजळणी केल्यास या बदलांना सामावून घेण्यास निश्चित मदत होते. आर्थिक स्वातंत्र्य एका रात्रीत मिळत नाही. त्यासाठी संयम, शिस्त व योग्य दृष्टिकोनाची गरज असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.