व्याजदर कपातीचा फंडांना फायदा

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने १८ सप्टेंबर रोजी ५० आधारभूत अंकांनी म्हणजेच अर्धा टक्का व्याजदरकपात केली.
interest rate
interest ratesakal
Updated on

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने १८ सप्टेंबर रोजी ५० आधारभूत अंकांनी म्हणजेच अर्धा टक्का व्याजदरकपात केली. मागच्या चार वर्षांत झालेली अमेरिकेतील ही पहिलीच व्याजदरकपात आहे. फेडरल रिझर्व्हकडून लवकरच व्याजदरकपात चालू होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज होता. मात्र, थेट अर्धा टक्का व्याजदरकपात केल्यामुळे, लोकांना आश्चर्याचा धक्का बसला.

महागाई आटोक्यात आल्यामुळे, ‘फेडरल रिझर्व्ह’ २०२५ पर्यंत आणखी दोन टक्के व्याजदरकपात करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या व्याजदरकपातीचा जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि भांडवली बाजारावर परिणाम होईलच मात्र, या कपातीचा गुंतवणूकदारांना कसा फायदा होऊ शकतो, ते जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

रिझर्व्ह बँकेची भूमिका

मार्च २०२२ ते जुलै २०२३ दरम्यान अमेरिकी ‘फेडरल रिझर्व्ह’ने सलग ११ वेळा व्याजदरवाढ केली. महागाई वाढण्याच्या भीतीने भारतीय रिझर्व्ह बँकेलादेखील व्याजदरवाढ चालू करावी लागली.

एप्रिल २०२२ ते मे २०२३ दरम्यान, रिझर्व्ह बँकेने रेपोदरात २.५ टक्क्यांनी व्याजदरवाढ केली. मागील १६ महिन्यांत रिझर्व्ह बँकेने कोणतीही व्याजदरवाढ केलेली नव्हती. मात्र, आता लवकरच व्याजदरकपात चालू करण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सप्टेंबर २०२३ मध्ये प्रतिबॅरल ९५ डॉलर असणारा कच्च्या तेलाचा भाव सप्टेंबर २०२४ मध्ये ७० डॉलरपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरकपातीची शक्यता आणखी वाढली आहे.

व्याजदर आणि रोख्यांचा संबंध

व्याजदर आणि रोख्यांच्या (बॉँड) किमतींमध्ये थेट संबंध असतो. व्याजदर वाढले, तर रोख्यांच्या किमती कमी होतात आणि व्याजदरकपात झाली, तर त्यांच्या किमती वाढतात. रिझर्व्ह बँकेने व्याजदरकपात केली, तर गुंतवणूकदारांना रोख्यांवर मिळणारे वार्षिक व्याज आणि त्यांच्या किमतीमध्ये होणारी वाढ, असा दुहेरी फायदा मिळतो. रोख्‍यांचा कालावधी जितका जास्त असेल, तेवढा जास्त फायदा गुंतवणूकदारांना मिळतो.

रिझर्व्ह बँकेकडून ज्या ज्या वेळेला व्याजदरकपात झाली आहे, त्यावेळेला दीर्घकालावधीच्या डेट फंडांमध्ये चांगला परतावा मिळतो, असे मागील आकडेवारीतून लक्षात येते. आयसीआयसीआय लॉंग ड्युरेशन फंड सर्वांत जुना दीर्घ मुदतीचा डेट फंड आहे.

या फंडाची कामगिरी आणि रिझर्व्ह बँकेची व्याजदरातील वाढ किंवा कपात यांचा संबंध मागील आकडेवारीवरून लक्षात येईल. रिझर्व्ह बँकेने जुलै २००८ एप्रिल २००९ दरम्यान रेपोदरात ४.२५ टक्के, जानेवारी २०१४ ते ऑगस्ट २०१७ दरम्यान दोन टक्के आणि ऑगस्ट २०१८ ते मे २०२० दरम्यान २.५ टक्के कपात केली होती.

या काळात, या डेट फंडने १२ ते २५ टक्के वार्षिक परतावा दिला. आता पुढील तीन ते पाच वर्षांत फेडरल रिझर्व्हप्रमाणे, रिझर्व्ह बँकेनेदेखील व्याजदरकपात केली, तर विविध म्युच्युअल फंड कंपन्यांच्या दीर्घमुदतीच्या डेट फंडांमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.