इच्छापत्राची दशसूत्री

सुजाण नागरिकहो, इच्छापत्र करणे किती महत्त्वाचे आहे, हे तुम्हाला पटलेले असेल. इच्छापत्र बनविण्यासाठीची पुढील दशसूत्री लक्षात ठेवा आणि त्या आधारे आपले इच्छापत्र लवकरात लवकर तयार करा.
property letter of intent
property letter of intentsakal
Updated on

सुजाण नागरिकहो, इच्छापत्र करणे किती महत्त्वाचे आहे, हे तुम्हाला पटलेले असेल. इच्छापत्र बनविण्यासाठीची पुढील दशसूत्री लक्षात ठेवा आणि त्या आधारे आपले इच्छापत्र लवकरात लवकर तयार करा. आणि हो, ते नोंदणीकृत करा!

ही आहेत दहा सूत्रे...

इच्छापत्र कोणी बनवावे?

  • स्थावर व जंगम संपत्ती स्वतःच्या मालकीची असणारी, १८ वर्षांवरील वयाची, मानसिकदृष्ट्या सक्षम अशी व्यक्ती संयुक्तपणे अथवा एकट्याने इच्छापत्र बनवू शकते.

  • आपल्या पश्चात, आपली स्वकष्टार्जित संपत्ती व स्वतःच्या वाटणीस आलेली वडिलोपार्जित संपत्ती, आपल्या वारसांना वा आपल्या इच्छेनुसार अन्य कोणासही मिळावी, यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन स्वतःच्या इच्छेनुसार इच्छापत्र बनवावे.

नोंदणी करावी का?

  • इच्छापत्राची नोंदणी करणे कायद्याने बंधनकारक नाही; परंतु नोंदणी नसलेल्या इच्छापत्राची सत्यता सिद्ध करावी लागते. म्हणून इच्छापत्राची नोंदणी करणे उत्तम!

  • दुय्यम सहाय्यक निबंधक कचेरीत इच्छापत्राची नोंदणी करावी.

  • हे नोंदणीकृत इच्छापत्र सरकारी कचेऱ्या, बँका, पोस्ट ऑफिस, कंपन्या अशा सर्व ठिकाणी ग्राह्य धरले जाते.

तपशील काय असावेत?

  • इच्छापत्र करणाऱ्याने स्वतःचे पूर्ण नाव, जन्मतारीख, पत्ता, वारसांची नावे, वारसांशी असलेले नाते, अथवा कोणाला संपत्ती द्यावयाची त्या व्यक्तीचा पूर्ण तपशील; तसेच, स्थावर व जंगम मालमत्ता कशी निर्माण केली, याबाबतचा पूर्ण तपशील लिहावा.

संपत्तीची यादी महत्त्वाची

  • स्थावर संपत्तीसाठी मालमत्तापत्रक, खरेदीखत आदी दस्तऐवज काळजीपूर्वक बघून, मालमत्तेचे नीट वर्णन करणे गरजेचे असते.

  • जंगम संपत्तीची यादी करताना, ती यादी इच्छापत्राच्या तारखेची आहे, त्यात बदल होऊ शकतो, हेही लिहावे. जंगम संपत्तीवर नामांकन करणे गरजेचे आहे; परंतु नामांकन केलेली व्यक्ती विश्वस्त असते; संपत्तीची वाटणी मात्र इच्छापत्रानुसार होते, याची नोंद घ्यावी.

दोन साक्षीदार असणे गरजेचे

  • १८ वर्षांवरील दोन सक्षम साक्षीदार घेणे आवश्यक आहे. साक्षीदारांना इच्छापत्रातील मजकूर माहीत असण्याची गरज नाही. फक्त त्यांच्यादेखत इच्छापत्र बनविणाऱ्याने इच्छापत्रावर सही करणे आवश्यक असते.

  • इच्छापत्र करणाऱ्या व्यक्तीचे व साक्षीदारांचे फोटो या दस्तावर लावणे गरजेचे आहे. नोंदणी कचेरीत इच्छापत्र नोंदविताना इच्छापत्र करणारी व्यक्ती व साक्षीदार असे सर्वजण उपस्थित असणे गरजेचे असते.

वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक

  • इच्छापत्र करणारी व्यक्ती मानसिकदृष्ट्या सक्षम आहे, असे वैद्यकीय प्रमाणपत्र इच्छापत्रासोबत जोडणे आवश्यक असते.

इच्छापत्रात दुरुस्ती व बदल शक्य

  • इच्छापत्र केल्यानंतर त्यात काही किरकोळ बदल करायचे असतील, तर ‘कोडिसिल’ म्हणजेच ‘पुरवणी इच्छापत्र’ करता येते.

  • मोठे बदल असतील तर पुन्हा नव्याने इच्छापत्र करता येते. इच्छापत्र कितीही वेळा बदलता येते. सर्वांत शेवटच्या तारखेचे नोंदणी केलेले इच्छापत्र ग्राह्य धरले जाते.

अनिवासी भारतीय असल्यास?

  • अनिवासी भारतीयांना भारतातील संपत्तीसाठी स्वतंत्र इच्छापत्र करावे लागते.

  • वारस अनिवासी भारतीय असतील, तर ‘फेमा’च्या (FEMA) नियमाप्रमाणे संपत्ती हस्तांतरित होते.

गोपनीयता

  • आपण इच्छापत्र केले आहे, हे वारसांना सांगावे की न सांगावे हा पूर्ण वैयक्तिक प्रश्न असतो; परंतु शक्यतो इच्छापत्राबाबत गोपनीयता राखावी.

  • इच्छापत्र कोठे ठेवावे, हाही प्रश्न वैयक्तिक असतो; तथापि, इच्छापत्र सहजी कोणाच्या हाती लागू देऊ नये. अर्थात, आपल्या मृत्यूपश्चात वारसांना हे इच्छापत्र सापडेल अशा ठिकाणी ठेवावे किंवा एखाद्या विश्वासू व्यक्तीला सांगून ठेवावे.

इच्छापत्र केलेच नाही तर?

वारसांना वकिलांच्या साह्या वारसपत्र मिळवावे लागेल. त्यासाठी त्यांना अनेक प्रकारची कागदपत्रे गोळा करणे भाग पडते, तसेच विविध सरकारी कचेऱ्यांमध्ये अनेक हेलपाटे घालावे लागतात. यासाठी वेळ, तर लागतोच, शिवाय भरपूर पैसे खर्च होतात व मनःस्ताप होतो. आपल्या हयातीत, हव्या त्या व्यक्तीला संपत्ती देण्यासाठी बक्षीसपत्र केले, तर संपत्तीच्या मूल्याप्रमाणे खर्च करावा लागतो व आपल्या हयातीत संपत्तीची मालकी आपल्याकडे राहात नाही. त्यामुळे परावलंबित्व येते. म्हणूनच, वेळ, श्रम, पैशाचा अपव्यय टाळण्यासाठी आणि आपल्या इच्छेप्रमाणे योग्य त्या वारसाला/व्यक्तीला आपल्यापश्चात आपली संपत्ती देण्यासाठी इच्छापत्र केलेच पाहिजे!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.