पुणे - देशाच्या आर्थिक क्षेत्रातील आतापर्यंतचे सर्वांत मोठे विलिनीकरण शनिवारपासून (ता. १) प्रत्यक्षात आले. देशातील गृहवित्त क्षेत्रातील सर्वांत मोठी कंपनी एचडीएफसी लिमिटेड ही एचडीएफसी बँकेमध्ये विलीन झाली. या विलिनीकरणातून १७२ अब्ज डॉलर अर्थात १४ लाख कोटी रुपये बाजारमूल्य असलेली जगातील चौथी सर्वांत मोठी बँक उदयास आली असून ही देशातील दुसरी मोठी बँक आहे. शुक्रवारी (ता. ३०) संध्याकाळी या विलीनीकरणाची औपचारिक घोषणा करण्यात आली.
‘आयसीआयसीआय’च्या दुप्पट
एचडीएफसी-एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणानंतर ही बँक देशातील सर्वांत मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेनंतर दुसरी सर्वांत मोठी बँक असेल, तर खासगी क्षेत्रातील सध्या सर्वांत मोठी बँक असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या दुप्पट तिचे आकारमान असेल.
भागधारक, ग्राहकांना लाभदायी
- या विलीनीकरणानंतर एचडीएफसी बँक ही १०० टक्के सार्वजनिक भागधारकांची मालकी असणारी कंपनी बनेल,
- एचडीएफसी लिमिटेडच्या सध्याच्या भागधारकांची एचडीएफसी बँकेत ४१ टक्के मालकी राहील.
- दोन्ही दिग्गज कंपन्या एकत्र आल्याने झालेल्या मूल्यात्मक वाढीने आर्थिक प्रगती निश्चित.
- व्यवसायातील सुलभता, वाढीव योजना, महसूल संधी अशा विविध पातळ्यांवरही लाभ.
- एचडीएफसी लिमिटेडच्या भागधारकांना त्यांच्याकडील २५ शेअरमागे, एचडीएफसी बँकेचे ४२ शेअर मिळणार आहेत.
- २५ पेक्षा कमी शेअर असणाऱ्यांना विलीनीकरण प्रत्यक्षात आलेल्या दिवशीच्या भावानुसार पैसे मिळतील.
कामकाजावर परिणाम नाही
एचडीएफसीची सर्व कार्यालये एचडीएफसी बँकेची कार्यालये म्हणून कार्यरत राहतील. सध्याच्या ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच सेवा मिळत राहील. एचडीएफसी व एचडीएफसी बँक या दोन्हींच्या सध्याच्या कर्जधारकांच्या व्याजदरात बदल होणार नाहीत, मात्र, नव्या गृहकर्जांना एचडीएफसी बँकेचे नियम लागू असतील.
एचडीएफसीला एचडीएफसी बँकेकडे सोपवताना, माझी एकच इच्छा आहे, की निष्पक्षता, कार्यक्षमता व परिणामकारकता ही मूल्ये एचडीएफसी समूहाच्या कार्यसंस्कृतीत खोलवर रुजावीत.
- दीपक पारेख, एचडीएफसीचे माजी अध्यक्ष
दर चार वर्षांनी एक नवी एचडीएफसी बँक उभी करू शकू अशा गतीने प्रगती करण्याचे उद्दिष्ट आहे. बँक आगामी काही वर्षे दरवर्षी किमान १५०० नव्या शाखा सुरू करेल.
- शशिधर जगदीशन, एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी
अर्थक्षेत्राचे फायदे
एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेचे हे विलीनीकरण दोन्ही कंपन्यांसाठी परस्परपूरक आहे.
एचडीएफसी बँकेला गृहकर्ज व्यवसायाचा विस्तार आणि ग्राहकांच्या संख्येत वाढ साधता येणार.
एचडीएफसी बँकेच्या एकूण कर्ज पुस्तकातील गृहकर्जाचा हिस्सा आता ११ टक्क्यांवरून ३३ टक्क्यांवर जाईल.
एचडीएफसी बँकेत परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांना अधिक संधी मिळेल. याचा फायदा भारतीय अर्थव्यवस्थेला होईल.
‘एस अँड पी’च्या मते, विलीनीकरणामुळे एचडीएफसी बँकेचा कर्ज व्यवसाय ४२ टक्क्यांनी वाढेल
बाजारहिस्सा सध्याच्या ११ टक्क्यांवरून सुमारे १५ टक्क्यांपर्यंत वाढेल.
बलाढ्य वित्तसंस्था
१४ लाख कोटी रुपये - विलीनीकरणानंतर जगातील चौथ्या क्रमांकाची आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाची बॅंक तसेच दुसऱ्या क्रमांकाचे बाजारमूल्य असलेली कंपनी
१७.२५ लाख कोटी रुपये - रिलायन्स इंडस्ट्रीज सर्वाधिक बाजारमूल्य असलेली कंपनी
४१६.५ अब्ज डॉलर - जगातील सर्वांत मोठी बॅंक जे. पी. मॉर्गन बॅंकेचे मूल्य
१२ कोटी - नव्या एचडीएफसी बॅंकेचे ग्राहक
१०० टक्के - सार्वजनिक भागधारकांची मालकी असणारी कंपनी
१.७७ लाख - बॅंकेच्या कर्मचाऱ्यांची संख्या
८३०० - बॅंकेच्या शाखांची संख्या
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.