‘आयपीओ’तील शेअर मिळण्यासाठी...

या ‘आयपीओ’साठी माझ्या एका ग्राहकाने त्याच्या कुटुंबातील तिघांच्या नावावर प्रत्येकी सहा असे एकूण १८ लॉटकरिता अर्ज केले आणि ते शेअर मिळणारच या आत्मविश्‍वासाने, संभाव्य शेअरवरील फायद्यातून दिवाळीसाठी खरेदीचे नियोजनही केले;
ipo share investment share market know details
how to apply ipo share investment share market know details sakal
Updated on

- प्रसाद भागवत

सध्याचा काळ ‘आयपीओं’च्या धमाकेदार लिस्टिंगचा आहे. ‘खुश है जमाना आज पहली तारीख है’ याऐवजी ‘खुश है जमाना आयपीओ की ॲलोटमेंट से’ असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ‘बजाज हाउसिंग फायनान्स’च्या ‘आयपीओ’तील शेअर ज्यांना मिळाले, त्यांनी दिवाळी साजरी केली. काहीजणांना मात्र, शेअर न मिळाल्याने ते नाराज झाले.

या ‘आयपीओ’साठी माझ्या एका ग्राहकाने त्याच्या कुटुंबातील तिघांच्या नावावर प्रत्येकी सहा असे एकूण १८ लॉटकरिता अर्ज केले आणि ते शेअर मिळणारच या आत्मविश्‍वासाने, संभाव्य शेअरवरील फायद्यातून दिवाळीसाठी खरेदीचे नियोजनही केले;

पण तिघांच्याही हाती भोपळा आला. त्यात एकाच लॉटसाठी अर्ज केलेल्या एका मित्राला शेअर मिळाल्याने यांच्या दुःखात भर पडली, त्यामुळे ‘आयपीओमधून शेअर ॲलॉटमेंट मिळविण्याचा तोडगा’ या विषयावर या गृहस्थांनी माझ्याशी तासभर चर्चा केली. तेव्हा त्यांना ‘आयपीओ’मधून शेअर मिळण्याचे काही मुद्दे समजून सांगितले.

जास्त लॉटसाठी किंवा अधिक रकमेचा अर्ज केल्यावर शेअर मिळतातच, असा अनेकांचा समज असतो, तो तितकासा बरोबर नाही. कारण शेअर वाटपाबाबत भांडवल बाजार नियामक ‘सेबी’ने काही मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली आहेत. त्यात शेअरचे वाटप न्याय्य व समान प्रमाणात व्हावे, असे म्हटले आहे व त्याचबरोबर वाटपाचे सूत्र हे लीड मॅनेजर, रजिस्ट्रार आणि स्टॉक एक्स्चेंज यांच्या सहमतीने निश्चित करावे, असेही म्हटले आहे. त्यामुळे प्रत्येक ‘आयपीओ’मध्ये शेअर वाटपाचे निकष हे या तीन घटकांच्या धोरणांनुरुप थोडेफार बदलताना दिसतात.

कमी लॉटसाठी अर्ज

यात आढळलेले एक निरीक्षण असे, की जास्तीत जास्त अर्जदारांना कंपनीचे भागधारक बनण्याची संधी मिळावी असा उदारमतवादी दृष्टिकोन बाळगून अनेकदा छोटे (रिटेल) गुंतवणूकदार गटातून अर्ज केलेल्यांना वाटप होण्याची शक्यता तुलनेने जास्त असते.

या गटातून शेअर द्यायचे झाले, तर एक वा दोन लॉटसाठी अर्ज केलेल्यांना शेअर वाटपात प्राधान्य मिळत असल्याचे दिसून येते. त्यामुळे कोणत्याही ‘आयपीओ’करिता एकच मोठा अर्ज करण्यापेक्षा वेगवेगळ्या नावाने; पण छोटे एक वा दोन लॉटसाठी अर्ज करणे उत्तम. त्यासाठी वेगवेगळ्या नावाने डी-मॅट खाती असणे आवश्‍यक आहे.

एका व्यक्ती एक अर्ज

धोक्याची सूचना म्हणजे आलेल्या सर्व अर्जांची छाननी ही पॅन क्रमांकावरुन होते व एकाच पॅन क्रमांकाचे अनेक अर्ज आल्यास आलेले सर्व अर्ज बाद होतात. त्यामुळे एका व्यक्तीने फक्त एकच अर्ज करणेच आवश्‍यक आहे.

शेअरधारक कोट्यातून अर्ज

शेअरधारक कोट्यातून अर्ज करणे हे फायदेशीर ठरते. प्रत्येक ‘आयपीओ’मध्ये असा राखीव कोटा नसतो. त्यामुळे आयपीओपूर्वी असा कोटा असणार आहे का? याबाबत थोडी आधी माहिती घेऊन, त्या कंपनीचा एक शेअर जरी आपल्या खात्यात जमा केला किंवा आधीपासून असेल, तर शेअरधारकाचा (शेअरहोल्डर) दर्जा मिळतो व शेअर मिळण्याची शक्यता वाढते. उदा. लवकरच ‘एनटीपीसी ग्रीन एनर्जी’ (NTPC Green Energy) ‘आयपीओ’ बाजारात आणणार आहे. यात ‘एनटीपीसी’च्या शेअरधारकांसाठी राखीव कोटा असू शकतो.

‘कट ऑफ’ किमतीचा पर्याय

‘आयपीओ’साठी अर्ज करताना शेअर खरेदी किंमत व ‘कट ऑफ’ असे दोन पर्याय दिलेले असतात. त्यापैकी ‘कट ऑफ’चा पर्याय निवडल्यास शेअर मिळण्याची शक्यता वाढते.

‘नेट बँकिंग’ उपयुक्त

‘यूपीआय’द्वारे केलेल्या अर्जात अनेकदा त्रुटी आढळतात. त्यामुळे शक्यतो ‘नेट बँकिंग’चा पर्याय वापरावा. यात बॅंकेच्या संकेतस्थळावर एकदाच डी-मॅटचे तपशील नोंदवून ठेवावे लागतात.

अर्थात, ‘आयपीओ’साठी अर्ज करताना हे सर्व मार्ग वापरले, तरीही शेअर मिळतीलच याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. अशी खात्री कोणीही मध्यस्थ वा एखादे ॲप देत असेल, तर अशा अपप्रचारास बळी पडू नये आणि शेअर मिळाले नाहीत, तर निराशही होऊ नये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.