- डॉ. दिलीप सातभाई
अनेक करदात्यांना प्राप्तिकर विभागाकडून मालमत्तेची विक्री आणि खरेदी, परकी गुंतवणूक आणि परदेशात पाठवलेले पैसे, म्युच्युअल फंडात १० लाख रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक आणि शेअरची विक्री व त्यावर झालेला भांडवली नफा यासारख्या उच्च-मूल्याच्या व्यवहारांबद्दल सावध करणारे संदेश प्राप्त झाले आहेत.
त्यात उच्च-मूल्याच्या व्यवहारांची माहिती प्राप्तिकर विवरणपत्रात दिलेल्या उत्पन्नाशी सुसंगत नसल्याचे किंवा विवरणपत्र न भरल्याचे; तसेच अनवधानाने अशी माहिती द्यायची राहून गेली असल्यास सुधारित-प्रकटीकरण करण्याबद्दल सजग करण्याचा प्रयत्न या संदेशाद्वारे करण्यात आला आहे.
प्राप्तिकर विभागाने २६ डिसेंबर रोजी स्पष्ट केले, की या ‘नोटिसा’ नाहीत, तर ‘संदेश’ आहेत, जेणेकरून करदाते अधिकृत रिटर्न-फाइलिंग पोर्टलद्वारे प्रतिसाद देऊ शकतील किंवा विवरणपत्र भरताना खुलासा देणे शक्य नसेल, तर अपडेटेड विवरणपत्र दाखल करु शकतील.
थोडक्यात, करदात्यांना जागरुक करून संधी देण्याचा हा एक प्रयत्न आहे. वर्षअखेर साजरे करण्याच्या तयारीत असलेल्या अनेक करदात्यांना प्राप्तिकर विभागाकडून सावधगिरीचा संदेश आल्याने धक्का बसला आहे.
अल्पवयीन मुलांसह शेकडो करदात्यांना परदेशी सहली, म्युच्युअल फंड, शेअरच्या विक्रीतून मिळालेला भांडवली नफा किंवा देशी-विदेशी केलेल्या गुंतवणुकीच्या आधारावर नोटिसा मिळाल्या आहेत.
तांत्रिकदृष्ट्या, अल्पवयीन मुलांनी प्राप्तिकर विवरणपत्र भरणे अपेक्षित नाही. तथापि, या सामूहिक नोटिसा संगणक प्रणालीने माहिती शोधून काढून पाठविल्या असल्याने ज्या मुलांच्या नावावर परदेशी गुंतवणूक करण्यात आली आहे किंवा ज्यांनी ‘टीसीएस’ गोळा केला आहे किंवा परदेशी सहल, एलआरएस रेमिटन्स आदींसाठी ज्यांचे कायम खाते क्रमांक वापरण्यात आले आहेत, अशा व्यक्तींना या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.
असा संदेश मिळाला असल्यास, उच्च मूल्याचे व्यवहार केले आहेत की नाही? हे सर्वप्रथम तपासा. ज्यांच्या वार्षिक माहितीपत्रकात (एआयएस) अशा उच्च मूल्यांच्या व्यवहारांचे तपशील आहेत, अशा करदात्यांना मोठ्या प्रमाणात प्राप्तिकर विभागाने संदेश पाठवले असल्याचे दिसते. यामुळे घाबरून जाण्याची गरज नसली, तरी या नोटिसांकडे दुर्लक्ष करू नका.
कारण वार्षिक माहितीपत्रकात (एआयएस) मुख्य आर्थिक व्यवहाराची माहिती संकलित केली आहे व त्याचा स्त्रोत खात्रीशीर असल्याने, विवरणपत्रात त्याचा मागोवा घेतला गेला नसल्याचे करविभागाच्या निदर्शनास आल्याने अशा नोटिसा निघाल्या आहेत.
१. करदात्यास अशी सूचना प्राप्त झाली असेल, तर प्रथम अनुपालन पोर्टलद्वारे प्रतिसाद देणे आवश्यक आहे.
२. माहिती दुसऱ्या पॅनशी संबंधित असल्यास, ‘एआयएस’द्वारे अभिप्राय दाखल करणे आवश्यक आहे. कारण बहुतांशवेळा अशी माहिती संयुक्त धारकांशी संबंधित असते.
३. वैकल्पिकरित्या, तुमच्याकडे पूर्वी दाखल केलेल्या विवरणपत्रांमध्ये सुधारणा करण्याचा पर्याय आहे.
४. कोणतेही उत्पन्न टॅक्समधून सुटले असेल, तर अशा उत्पन्नावर ३१ मार्च २०२३ पासून व्याज भरावे लागेल.
एखाद्या करदात्याने वेळेत या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही, तर अंतिम तारखेनंतर प्रतिसाद देण्याची विंडो बंद होण्याची शक्यता आहे. करविभागाकडून ही सावधगिरीची सूचना आहे. हा संदेश गांभीर्याने घेतला नाही, तर नंतर करविभागाची नोटीस मिळण्याची नांदी ठरू शकते.
तेव्हा अपडेटेड विवरणपत्र दाखल करणे हा एकमेव पर्याय शिल्लक राहील. परंतु, एखाद्याने अद्ययावत विवरणपत्र सादर केले, तर १२ महिन्यांच्या आत रिटर्न भरल्यास २५ टक्के आणि २४ महिन्यांनंतर भरल्यास ५० टक्के अतिरिक्त कर भरावा लागेल, असे झाल्यास करदात्याची विवंचना दूर होईल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.