Income Tax Returns : सूचनापत्रक महत्त्वाचे

प्राप्तिकर विभागाने विवरणपत्र भरणे, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने अधिक सुलभ केले आहे.
Income Tax Returns Instruction Sheet Important E-Assessment
Income Tax Returns Instruction Sheet Important E-Assessmentsakal
Updated on

आपल्या देशात गेल्या तीन वर्षांपासून प्राप्तिकर विवरणपत्रे भरणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे, याचे श्रेय प्राप्तिकर विभागाला जाते. प्राप्तिकर विभागाने विवरणपत्र भरणे, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने अधिक सुलभ केले आहे.

कर विभागाने ‘फेसलेस ॲसेसमेंट’ या योजनेअंतर्गत ‘ई-ॲसेसमेंट’ ही एक उपयुक्त प्रणाली आणली असून, त्याद्वारे ई-फाइलिंग, ई-अपील, दुरुस्ती अर्ज आदी गोष्टी ऑनलाइन करता येतात. ऑनलाइन पद्धतीने विवरणपत्र दाखल केल्यानंतर त्याची ई-पडताळणी (ई-व्हेरिफिकेशन) किंवा विवरणपत्राच्या पोचपावतीवर स्वाक्षरी करून ती बंगळूर येथील केंद्रात पोस्टाने (स्पीड पोस्ट) पाठवावी लागते,

ही प्रक्रिया ३० दिवसांच्या आत पूर्ण करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही, तर विवरणपत्र दाखल झालेच नाही, असे समजण्यात येईल. त्यामुळे परतावा मिळण्यात अडचणी येऊ शकतात, हे करदात्यांनी लक्षात ठेवले पाहिजे.

सूचनापत्रकाचे महत्त्व

प्राप्तिकर विवरणपत्र दाखल केल्यावर आणि ई-पडताळणी, स्वाक्षरी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, कलम १४३(१)नुसार करदात्याला त्याच्या अधिकृत ई-मेलवर सूचनापत्रक (इंटिमेशन) येते. त्याचबरोबर त्याच्या अधिकृत मोबाईल नंबरवर ‘एसएमएस’ देखील येतो. हे सूचनापत्रक आले आहे, की नाही ते तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

ठळक मुद्दे

करदात्याचा प्राप्तिकर परतावा प्राप्तिकर देय रकमेशी समायोजित करायचा असेल, तर त्यासंबंधित सूचनापत्रक कलम १४३(१अ) नुसार प्राप्तिकरदात्याला लेखी स्वरूपात किंवा ऑनलाइन पद्धतीने पाठविणे गरजेचे आहे, आणि असे करण्यापूर्वी करदात्याला मागणीच्या नोटिशीला प्रतिसाद देण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. या कालावधीत प्रतिसाद आला नाही, तर प्राप्तिकर विभाग ही प्राप्तिकर देय रक्कम समायोजित करेल.

करदात्याला परतावा येत असल्यास, त्यातून प्रथम देय कर ‘सेट ऑफ’ केला जाईल आणि उर्वरित परतावा दिला जाईल आणि अधिक प्राप्तिकर देय असल्यास मागणी नोटीस पाठवली जाईल.

करदात्याला कलम १५६ अंतर्गत येणाऱ्या मागणी नोटिशीनुसार, नोटीस तारखेपासून ३० दिवसांत प्राप्तिकर देय रक्कम भरली नाही, तर करदात्याला ही मुदत संपल्यापासून ते प्रत्यक्षात कर भरण्याच्या तारखेपर्यंत एक टक्का दर महिना किंवा महिन्याच्या भागासाठी, या दराने व्याज भरावे लागेल. कलम २२० (२) अंतर्गत येत असलेल्या (इंटिमेशन) सूचनापत्रकानुसार, हे व्याज करदात्याच्या परताव्याशी समायोजित केले जाऊ शकते, हे लक्षात घेणेही महत्त्वाचे आहे.

करदात्यांनी विवरणपत्रामध्ये नमूद केलेली सर्व माहिती सूचनापत्रकाशी (इंटिमेशन) पडताळून घेणे आवश्‍यक आहे. करपरतावा देय असेल, तर दिलेला बँक खात्याचा क्रमांक बरोबर आहे ना, ते तपासणे गरजेचे आहे. म्हणजे त्याच बँक खात्यामध्ये परतावा जमा होईल. खातेक्रमांक चुकला आणि परतावा जमा झालाच नाही, तर खातेक्रमांक दुरुस्त करून परतावा पुन्हा पाठविण्याची विनंती करदाता करू शकतो.

प्राप्तिकर विभागाने करदात्याला पाठवलेले सूचनापत्रक (इंटिमेशन), दाखल केलेले विवरणपत्र, प्राप्तिकर विभागाच्या पोर्टलवरची करदात्याची सर्व माहिती आदी सर्व गोष्टींची खातरजमा करदात्यांनी व करसल्लागारांनी करणे आवश्यक आहे.

(लेखक करसल्लागार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.