LIC : ‘एलआयसी’ लवकरच आरोग्य विमा क्षेत्रात; संमिश्र विमा परवानगीचा विचार

या क्षेत्रातील संमिश्र विमा कंपन्यांना परवानगी देण्याच्या प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
LIC soon enter in health insurance sector consideration of composite Insurance Permits
LIC soon enter in health insurance sector consideration of composite Insurance PermitsSakal
Updated on

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठी विमा कंपनी असलेली भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात ‘एलआयसी’ आरोग्य विमा क्षेत्रात पाऊल टाकण्याचा विचार करत आहे. यासाठी आरोग्य विमा क्षेत्रातील एखाद्या कंपनीचे अधिग्रहण करण्याची शक्यता पडताळत आहे, असे ‘एलआयसी’ने म्हटले आहे.

या क्षेत्रातील संमिश्र विमा कंपन्यांना परवानगी देण्याच्या प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. नवे सरकार विमा कायद्यात सुधारणा करून संमिश्र परवाना देण्याची शक्यता आहे.

या शक्यतेचा विचार करून आम्ही प्राथमिक स्वरुपाची तयारी करत आहोत. सर्वसाधारण विमा क्षेत्रातील व्यवसायात आमच्याकडे आवश्यक कौशल्य नाही. आम्हाला आरोग्य विमा क्षेत्रात उतरण्याची इच्छा आहे. आम्ही व्यावसायिक वाढीच्या संधीची संभाव्यताही तपासत आहोत, असे ‘एलआयसी’चे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती यांनी सांगितले.

विमा कायदा, १९३८ आणि भारतीय विमा नियामक विकास प्राधिकरणाच्या (इर्डा) नियमांनुसार, सध्या एकाच कंपनीला आयुर्विमा, सर्वसाधारण किंवा आरोग्य विम्यासाठी संमिश्र परवाना देण्याची परवानगी नाही. फेब्रुवारी २०२४ मध्ये, संसदीय समितीने विमा प्रदात्या कंपन्यांचे खर्च आणि नियामक ओझे कमी करण्यासाठी संमिश्र विमा परवाने देण्याची शिफारस केली होती.

आयुर्विमा कंपन्यांना हॉस्पिटलायझेशन आणि नुकसानभरपाई देण्यासाठी सक्षम करण्याकरिता विमा कायद्यात सुधारणा करणे आवश्यक आहे, असे या समितीने म्हटले आहे. त्यावर आता निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

‘इर्डा’च्या म्हणण्यानुसार, ‘एलआयसी’ने आर्थिक वर्षात २०२३ मध्ये २.९ लाख नव्या पॉलिसी जारी केल्या असून, जवळपास तीन लाख लोकांचे आयुष्य सुरक्षित केले आहे. विमा क्षेत्रात संमिश्र परवान्यास परवानगी दिल्याने त्याच्या विविध फायद्यांमुळे विमा क्षेत्राला आणखी चालना मिळू शकते;

तसेच विमा कंपन्यांसाठी खर्च आणि नियम पालनाच्या अडचणी कमी होऊ शकतात, कारण ते एकाच छताखाली वेगवेगळ्या प्रकारचे विमा देऊ शकतात. यामुळे देशातील विम्याचा प्रसार आणि जागरूकताही वाढण्यास मदत होऊ शकते. ग्राहक एकाच विमा प्रदात्यांकडून कमी प्रीमियम आणि सुलभ दावा प्रक्रियेसह विविध प्रकारचे विमा एका पॉलिसीत घेऊ शकतात.

देशातील आरोग्य विम्याचे प्रमाण कमी

देशात वर्ष २०२२-२३ च्या अखेरीस २.३ कोटीपेक्षा कमी आरोग्य विमा पॉलिसी जारी करण्यात आल्या. याद्वारे अंदाजे ५५ कोटी लोकांना सुरक्षा कवच देण्यात आले. यापैकी ३० कोटी व्यक्तींना या सरकारी कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या विमा योजनेमुळे संरक्षण मिळाले आहे, तर २० कोटी लोकांना समूह विम्याअंतर्गत संरक्षण मिळाले आहे. सरकार आणि विमा नियामक दोघेही आरोग्य विमा पॉलिसी जारी करण्याचा सल्ला देत आहेत. ‘एलआयसी’च्या प्रवेशामुळे या क्षेत्रातील वाढीला चालना मिळेल.

गेल्या वर्षभरात आम्ही आमच्या उत्पादनांमध्ये दिशात्मक बदल करण्यावर आणि व्यवसायात मार्जिन वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले. वैयक्तिक विमा व्यवसायात आमचा हिस्सा दुप्पट झाला असून, आता सर्व विमा श्रेणींमध्ये आमचा हिस्सा वाढावा, यासाठी धोरणात्मक बदलावर लक्ष केंद्रित करण्याचा मानस आहे.

-सिद्धार्थ मोहंती,अध्यक्ष, एलआयसी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.