Mahanagar Gas Ltd : महानगर गॅस (एमजीएल) (शुक्रवारचा बंद भाव : रु. १५९७)

Stock Analysis : सरकारने पुढील सहा वर्षांच्या कालावधीमध्ये नैसर्गिक वायू क्षेत्रात सुमारे ६७ अब्ज डॉलर गुंतवणुकीचे नियोजन केले आहे.
Mahanagar Gas Ltd clean fuels share stock analysis investment
Mahanagar Gas Ltd clean fuels share stock analysis investment Sakal
Updated on

चीन आणि अमेरिकेनंतर भारत देश हा जगातील तिसरा सर्वांत मोठा ऊर्जा ग्राहक देश आहे. भारताचा दरडोई ऊर्जेचा वापर हा जागतिक सरासरीच्या एक तृतीयांश एवढाच आहे, जो दीर्घकालीन संभाव्य ऊर्जेची मागणी दर्शवतो. आगामी काळात भारताच्या आर्थिक वृद्धीमध्ये नैसर्गिक वायूसारखे पर्यावरणाच्या दृष्टीने ‘स्वच्छ इंधन’ महत्त्वाची भूमिका निभावणे अपेक्षित आहे.

सरकारने पुढील सहा वर्षांच्या कालावधीमध्ये नैसर्गिक वायू क्षेत्रात सुमारे ६७ अब्ज डॉलर गुंतवणुकीचे नियोजन केले आहे. महानगर गॅस लि. (एमजीएल) ही भारतातील प्रमुख नैसर्गिक वायू वितरण कंपनी आहे. ही कंपनी १९९५ मध्ये स्थापन झाली. कंपनीचे मुख्य कार्यक्षेत्र मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात आहे. कंपनी घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक वापरासाठी पाइपबंद नैसर्गिक वायू (पीएनजी) पुरवते.

ही कंपनी धंद्यात गुंतविलेल्या भांडवलावर सातत्याने दरवर्षी २५ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवत आहे. कंपनी जवळपास कर्जमुक्त आहे. एक फेब्रुवारी २०२४ रोजी कंपनीने युनिसन एन्व्हायरो प्रा. लि. या कंपनीचे संपादन पूर्ण केले.

यामुळे ‘एमजीएल’ला महाराष्ट्र (रत्नागिरी, लातूर आणि उस्मानाबाद) आणि कर्नाटक (चित्रदुर्ग आणि दावणगिरी) मधील नव्या भौगोलिक क्षेत्रांमध्ये व्यवसायविस्तार करण्यास; तसेच दीर्घकालीन वाढीसाठी नवे मार्ग उपलब्ध होत आहेत.

कंपनीने फेब्रुवारी २०२४ मध्ये थ्री-व्हीलर ईव्ही कंपनी ‘३ ईव्ही इंडस्ट्रीज’मध्ये सुमारे ३० टक्के हिस्सा संपादन करण्याचा करार केला आहे. या गुंतवणुकीद्वारे कंपनीने भारतात; तसेच जागतिक स्तरावर सुरू असलेल्या ‘इलेक्ट्रिक वाहन’ या वाढीच्या क्षेत्रात मार्गक्रमण केले आहे.

जाहीर झालेल्या तिमाही निकालानुसार, सध्या निव्वळ नफा २६५ कोटी रुपयांवर पोचला आहे, तर वर्षभरात व्यवसायवृद्धी दर्शवत कंपनीचा एकूण निव्वळ नफा १२८९ कोटी रुपयांवर पोचला आहे. आलेखानुसार, या कंपनीच्या शेअरने नोव्हेंबर २०१७ पासून तब्बल सात वर्षे मर्यादित पातळ्यांमधेच चढ-उतार दर्शविला होता.

गेल्या शुक्रवारी रू. १५८० या पातळीच्या वर या कंपनीच्या शेअरने बंद भाव देऊन मध्यम अवधीसाठी तेजीचे संकेत दिले आहेत. आगामी काळातील व्यवसायवृद्धीची शक्यता आणि क्षमता लक्षात घेता, या कंपनीच्या शेअरमध्ये मर्यादित प्रमाणात दीर्घावधीच्या दृष्टीने गुंतवणूक करण्याचा विचार करावा.

(डिस्क्लेमर : या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.