गुंतवणुकीवर ‘कंपाउंडिंग इफेक्ट’ कसा मिळतो याबाबत मी मागच्या लेखात लिहीले होते. अनेकादा असे दिसते, की वेळप्रसंगी दीर्घकालीन गुंतवणूकही गुंतवणूकदार अंशतः किंवा पूर्णतः मोडतात. त्यामुळे त्या गुंतवणुकीवर मिळालेला ‘कंपाउंडिंग इफेक्ट’चा लाभ ते गमावतात.
योग्य आर्थिक नियोजन करून गुंतवणूक केली असेल, तर अशावेळी ती गुंतवणूक मोडण्याची गरज भासायला नको, तरीही काहीवेळा गुंतवणूकदार असा निर्णय घेतात आणि त्यांचे नुकसान होते. अशावेळी गुंतवणूक तारण ठेवून कर्ज घेण्याचा पर्याय वापरल्यास गुंतवणूकही कायम राहते आणि गरजही भागते.
गुंतवणूक काढून घेण्याचे तोटे
ठराविक कालांतराने थोडी थोडी गुंतवणूक काढून घेतली गेली, तर ‘फर्स्ट इन फर्स्ट आऊट’ या नियमानुसार तुमचे आधी घेतलेले युनिट्स विकले जातात. त्यामुळे त्यावर मार्केट वर जाईल, तसा तसा मिळणाऱ्या परताव्याचा लाभ मिळत नाही.
नंतर तुम्ही दीर्घावधीसाठी गुंतवणूक करत राहिलात, तरी केवळ एक नियमित गुंतवणूकदार राहता. त्यामुळे वेळोवेळी दीर्घकालीन म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ विकायला लागू नये, असे वाटत असेल, तर काही गोष्टी काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे.
योग्य आर्थिक नियोजन
सर्व प्रथम आपल्याला आपली दीर्घकालीन उद्दिष्टे माहित असणे गरजेचे आहे. प्रत्येक गुंतवणूकदाराने म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही प्रामुख्याने आपल्या निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षिततेकरता करावी.
हे नियोजन करताना, आपल्या निवृत्तीनंतर नेमक्या किती रकमेची गरज आहे, त्यानुसार किती आणि कोठे गुंतवणूक केली पाहिजे याबाबत योग्य आर्थिक सल्लागाराकडून सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. ही गुंतवणूक करताना आपली कुठेही आर्थिक ओढाताण होणार नाही याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण आर्थिक ओढाताण करून केलेली गुंतवणूक कधीही दीर्घकालीन राहत नाही.
गुंतवणूकतारण कर्जाची सुविधा
आर्थिक नियोजन करताना त्यात आपत्कालीन निधीची (इमर्जन्सी फंड) व्यवस्था करणे गरजेचे आहे. त्यामुळे अचानक आर्थिक अडचणी येतात, तेव्हा आपल्याला दीर्घकालीन गुंतवणूक विकावी लागत नाही. परिणामी ‘कंपाउंडिंग इफेक्ट’ मिळण्यास मदत होते.
अर्थात, एखाद्या गुंतवणूकदाराने वरील दोन्ही गोष्टी केल्या असल्या, तरीही त्याला काहीवेळा आपत्कालीन निधीशिवाय अधिक पैशांची गरज भासू शकते. अशावेळी दीर्घकालीन गुंतवणूक विकण्याशिवाय पर्याय नसतो. मात्र, त्यावर एक चांगला उपाय उपलब्ध आहे; तो म्हणजे ‘लोन अगेन्स्ट सिक्युरिटी’ म्हणजेच गुंतवणूकतारण कर्ज.
हे कर्ज शेअर; तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूकतारण ठेऊनदेखील मिळते. ते बँकेतून अथवा म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटरकडून मिळू शकते. तुमच्या म्युच्युअल फंडांचे जितके मूल्यांकन आहे, त्याच्या ५० टक्के अथवा एका ठराविक रकमेपर्यंत (ही मर्यादा बँक व डिस्ट्रिब्युटरनुसार बदलू शकते.) हे कर्ज मिळू शकते.
या पर्यायाचा वापर केल्याने तत्काळ आपत्कालीन पैशांची व्यवस्था होऊ शकते आणि आपली दीर्घकालीन गुंतवणूकही वाचते. हा पर्यायामुळे काही काळाकरिता अधिक आर्थिक भार येतो. तरीही मी या पर्यायाचा आधार घेण्याचा आग्रह धरेन.
कारण या कर्जाच्या परतफेडीमध्ये जेवढे व्याज आपण भरतो, त्यापेक्षा जास्त फायदा दीर्घकालीन गुंतवणुकीतून मिळतो. त्यामुळे योग्य सल्लागाराकडून आर्थिक नियोजन करून घ्या. त्यात आपत्कालीन पैशाची व्यवस्था करा आणि वेळप्रसंगी गरज पडली, तर दीर्घकालीन गुंतवणूक न विकता गुंतवणूकतारण कर्जाचा पर्याय निवडा.
(लेखक हे म्युच्युअल फंड तज्ज्ञ असून, किरण जाधव अँड असोसिएट्स येथे कार्यरत आहेत.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.