बाजारात घसरण, गुंतवणूकदारांमध्ये चिंता

स्मॉल कॅप आणि मिड कॅप कंपन्यांच्या अतर्क्य वाढीमुळे ‘सेबी’च्या अध्यक्षा माधुरी पुरी बूच यांनी नुकतीच चिंता व्यक्त केली.
Share Market
Share Marketsakal
Updated on

- विक्रम अवसरीकर, फायनान्शियल प्लॅनर

स्मॉल कॅप आणि मिड कॅप कंपन्यांच्या अतर्क्य वाढीमुळे ‘सेबी’च्या अध्यक्षा माधुरी पुरी बूच यांनी नुकतीच चिंता व्यक्त केली. ‘ॲम्फी’च्या आकडेवारीनुसार, मिड कॅप फंडांमध्ये २०२३ मध्ये २३ हजार कोटी आणि स्मॉल कॅप फंडांमध्ये ४१ हजार कोटी रुपयांची नवी गुंतवणूक आली. त्या तुलनेत लार्ज कॅप फंडांमधून ३ हजार कोटी रुपये गुंतवणूकदारांनी काढून घेतले.

आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये म्युच्युअल फंडांमध्ये एसआयपीद्वारे जवळजवळ १ लाख २४ हजार कोटी, आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये १ लाख ५६ हजार कोटी आणि आता तर या वर्षी फेब्रुवारीपर्यंत १ लाख ८० हजार कोटी रुपये लोकांनी गुंतवले आहेत.

याचबरोबर आपण जर २०१९-२० मध्ये उघडली गेलेली डी-मॅट खाती बघितली तर ती होती चार कोटी, २०२०-२१ मध्ये साडेपाच कोटी, २०२१-२२ मध्ये नऊ कोटी, २०२२-२३ मध्ये साडेअकरा कोटी आण चालू आर्थिक वर्षात जवळपास १४ कोटी अशी वाढलेली दिसतात.

या सर्व आकडेवारीचा आपण अर्थ काढला, तर आपल्या असे लक्षात येईल, की कोविड महासाथीच्या काळात आणि त्यानंतर भांडवली बाजारात येणारे पैसे प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. लोकांनी मोठ्या संख्येने डी-मॅट खाती उघडली; तसेच ‘एसआयपी’द्वारे प्रत्येक महिन्यात पैसे गुंतवणाऱ्यांची संख्या आणि पैसे हे दोन्ही वाढताना दिसतात.

स्मॉल कॅप, मिड कॅप कंपन्यांमध्ये, त्यांच्या महसुलात फारशी भर पडलेली नसली किंवा त्याचा वाढीचा दर हा आधीच्या दरांच्या तुलनेत सम प्रमाणात वाढत असला, तरी शेअरचे भाव प्रचंड प्रमाणात वाढलेले दिसतात. स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्ये आलेले पैसे हे इतक्या मोठ्या प्रमाणात आले, की या शेअरचे भाव हे सरासरी ६६ टक्क्यांनी वाढले आहेत. यामुळेच चिंता व्यक्त केली गेली.

धीर धरणे आवश्यक

गेल्या काही दिवसांत नफेखोरीमुळे निर्देशांक वर-खाली होताना दिसत आहेत. कोविड महासाथीच्या काळात भांडवली बाजारात आलेल्या गुंतवणूकदारांनी केवळ एकतर्फी वर जाणारे मार्केट बघितले आहे. या गुंतवणूकदारांनी धीर धरणे आवश्यक आहे. आगामी काळात अनपेक्षित घटनांनी निर्देशांक पडले तरीसुद्धा पुढील गोष्टी लक्षात घेतल्या, तर दीर्घ पल्ल्यामध्ये अडचण येणार नाही, असे दिसते.

1) भारतातील भांडवली बाजारात पैसे गुंतवणारे वाढत आहेत.

2) अधिकाधिक पैसे ‘एसआयपी’द्वारे गुंतवले जात आहेत, त्याचप्रकारे सरकारी संस्था उदा. ईपीएफओ भांडवली बाजारात नव्या नियमांद्वारे गुंतवणूक करत आहेत.

3) सरकारचा मूलभूत सुविधा वाढविण्याकडे कल आहे. भारताला जगात उत्पन्न झालेल्या भू-राजकीय परिस्थितीचा फायदा होताना दिसत आहे. नवी क्षेत्रे उद्योगासाठी निर्माण होत आहेत.

4) गुंतवणूक होणारे पैसे वाढले तर वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअरना मागणी वाढेल; पण पुरवठा कमी किंवा मर्यादित असल्याने भांडवली बाजार वर जात राहील. अशा परिस्थितीत केवळ हा नंबर गेम होऊन बाजार वर जात राहील; मग भारताची आर्थिक स्थिती कशीही असेना. काही प्रमाणात याचे प्रतिंबिंब सध्या दिसत आहे.

म्हणजेच युद्ध, सरकारी धोरणात बदल, कृत्रिम बुद्धिमत्तेचे आक्रमण, प्रमाणाबाहेर नफेखोरी आदी अनपेक्षित गोष्टी घडल्या नाहीत, तर जे लोक धीर धरून चांगल्या कंपन्यांमध्ये अथवा एसआयपीद्वारे गुंतवणूक करत राहतील, त्यांना फायदा होण्याची शक्यता वाटत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.