- मकरंद विपट
गेल्या सहा महिन्यांत आपल्या देशात जवळपास एक कोटी २५ लाख नवी डी-मॅट खाती उघडली गेली. हा गेल्या १३ महिन्यांतील उच्चांक आहे. असेच चित्र २०२० मध्ये कोविड काळातही दिसून आले होते. त्यानंतर वर्ष २०२१-२०२२ मध्ये शेअर बाजारात एक करेक्शन आले, तेव्हा बऱ्याच गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक नुकसान होत असतानादेखील काढून घेतली. त्या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये, या उद्देशाने गुंतवणूकदारांना गोष्टी युक्तीच्या चार सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
गुंतवणूकदारांमध्ये गैरसमज
गेल्या काही वर्षात गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीकडे कल वाढला आहे. आणि त्यांना बाकीच्या गुंतवणुकीपेक्षा चांगला परतावाही मिळाला आहे. गेल्या तीन ते चार वर्षांतकाही म्युच्युअल फंड योजनांनी २५ ते २७ टक्के सरासरी वार्षिक परतावा दिला आहे.
त्यामुळे सर्व गुंतवणूकदार खुश आहेत. मात्र, म्युच्युअल फंड गुंतवणुकीबाबत बऱ्याच गुंतवणूकदारांचे गैरसमजही आहेत. अनेक गुंतवणूकदारांशी बोलताना असे लक्षात येते, की ही गुंतवणूक शेअर बाजाराशी निगडित असते, हे त्यांना माहीतच नाही.
आता शेअर बाजारात तेजीचे वातावरण आहे म्हणून एवढा मोठा परतावा बघायला मिळत आहे, याची त्यांना कल्पनाच नाही. एखाद्या आर्थिक माहिती देणाऱ्या संकेतस्थळावर जायचे आणि तेथे टॉप रेटेड म्युच्युअल फंडांची यादी असते, त्यातील दोन, तीन आणि पाच वर्षांतील परतावा पाहायचा आणि गुंतवणूक करायची. बस्स इतके सोपे आहे, असाही कल गुंतवणूकदारांमध्ये दिसून येत आहे.
विकेंद्रीत पोर्टफोलिओ
सध्या अनेक गुंतवणूकदारांचा कल स्मॉल कॅप, मिड कॅप फंडाकडे वाढत आहे. कारण मार्च २०२२ पासून सप्टेंबर २०२३ पर्यंत स्मॉल कॅप इंडेक्स हा जवळपास ४२ टक्के वाढला आणि मिड कॅप इंडेक्स हा जवळपास ३९ टक्के वाढला.
म्हणून आता आपल्याला या दोन्ही सेक्टरशी निगडित असलेल्या योजनेत सर्वांत जास्त परतावा दिसत आहे. म्हणून काय सगळी गुंतवणूक आपण याच सेक्टरमध्ये करायची का? माझे सांगणे असेल नक्कीच नाही.
आपला म्युच्युअल फंडाचा पोर्टफोलिओ हा वेगवेगळ्या योजनेत विखुरलेला असावा. यातील काही योजना या लार्ज कॅपशी संबंधित असाव्यात, काही मिड कॅपशी, तर काही स्मॉल कॅपशी निगडित असाव्यात.
आपला पोर्टफोलिओ विकेंद्रीत असावा. त्यामुळे गुंतवणुकीतील जोखीमही कमी होते आणि शेअर बाजारातील प्रत्येक सेक्टरचा आपल्याला फायदा मिळतो. गेली दीड वर्षे मिड आणि स्मॉल कॅप फंडात तेजी बघत आहोत.
आता जेव्हा ही तेजी थांबेल तेव्हा दुसऱ्या सेक्टरमध्ये तेजी चालू होईल, तेव्हा स्मॉल आणि मिड कॅप फंडातून बाहेर पडायचे का? तर अजिबात नाही. कारण एवढ्या मोठ्या तेजीनंतर एखादे छोटे करेक्शन येणे स्वाभाविक आहे. म्हणजे हे सेक्टर खराब झाले असे नाही. त्यामुळे आपली सगळी गुंतवणूक फक्त काही काळाचा परतावा बघून एका ठराविक सेक्टरमध्ये करून नये.
गुंतवणुकीचे उद्दिष्ट निश्चित असावे
अनेक गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना त्या गुंतवणुकीचे उद्दिष्टच माहित नसते. एखाद्या संकेतस्थळावर मोठा परतावा बघून माहिती न घेता चुकीच्या योजनेत गुंतवणूक केली जाते आणि नंतर नुकसान होतेय असे दिसून आल्यास ती गुंतवणूक नुकसान सोसून काढून घेतली जाते.
गुंतवणुकीचे उद्दिष्ट म्हणजे ती गुंतवणूक आपण कशाकरिता करत आहोत? हे निश्चित झालेले असणे महत्त्वाचे आहे. गुंतवणुकीतून नियमित उत्पन्नाची गरज पूर्ण करायची असेल किंवा पुढील सहा महिने ते एक वर्षांत पैसे परत हवे आहेत, असे उद्दिष्ट निश्चित असेल, तर त्यानुसार योग्य म्युच्युअल फंड योजनेची निवड करता येते.
सहा महिने ते एक वर्षांच्या कालावधीनंतर लागणारे पैसे शेअर बाजाराशी निगडित असलेल्या योजनेत टाकले, तर तिथे जोखीम वाढते आणि दीर्घ कालावधीसाठी लागणारे पैसे डेट फंडात टाकले, तर मोठ्या परताव्याला मुकावे लागण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य सल्लागाराचा सल्ला घेऊनच आपला म्युच्युअल फंडाचा पोर्टफोलिओ तयार करावा आणि योग्य वेळ आल्यावरच ती गुंतवणूक विकावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.