national productivity day 2024 and financial planning
आपल्या देशात १२ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय उत्पादकता दिवस म्हणून साजरा केला जातो. अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रांमध्ये उत्पादकता, नवकल्पना आणि कार्यक्षमतेचे महत्त्व वाढविण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
‘आर्थिक विकास साधण्यासाठी नावीन्यपूर्ण विचारांचा अवलंब करा,’ अशी या वर्षीच्या राष्ट्रीय उत्पादकता दिनाची मुख्य संकल्पना आहे. उत्पादकता हा विषय औद्योगिक क्षेत्राइतकाच प्रत्येक व्यक्तीच्या आर्थिक नियोजनालादेखील लागू पडतो. आपल्या पैशाची उत्पादकता वाढवून आपण आपले जीवन अधिक सुखकर करू शकतो.
सर्वप्रथम आपल्या खर्चांकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहायला शिका. आपल्या उत्पन्नातून आधी बचतीची रक्कम बाजूला काढा आणि उरलेल्या पैशामध्ये खर्च भागवायची सवय लावून घ्या. सुरुवातीला हे अवघड वाटेल; पण कालांतराने त्याची सवय होईल.
काही कारणाने खर्चात कपात करणे अजिबात शक्य नसेल, तर उत्पन्न वाढविण्याचे नवनवीन मार्ग शोधा. मात्र कोणत्याही परिस्थितीत आपल्या बचतीची रक्कम कमी करू नका. कारण आपल्या पैशांची उत्पादकता ही बचतीवर अवलंबून असते,खर्चांवर नाही.
आपल्या पैशाची उत्पादकता वाढविण्यासाठी त्याला योग्य वळण आणि शिस्त लावणे महत्त्वाचे आहे. योग्य वळण आणि शिस्तीअभावी पैसा वाईट मार्गाला लागू शकतो. आपण मिळवत असलेल्या प्रत्येक रुपयाचा विनियोग योग्यप्रकारे होईल, याची काळजी घ्या.
बँक खात्यावर किंवा आपल्या खिशात गरजेपेक्षा अधिक पैसे पडून राहिले, तर ते नको त्या मार्गाला जाण्याची शक्यता असते. असे वाया गेलेले पैसे आपल्या पैशांची उत्पादकता कमी करतात. म्हणून असे अतिरिक्त पैसे योग्य ठिकाणी गुंतवा.
आपल्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या परताव्याचा एक मापदंड ठरवा आणि त्या दिशेने प्रयत्न करा. यासाठी आपण दीर्घकाळातील महागाईदराचा आधार घेऊ शकतो. आपल्या गुंतवणुकीवर मिळणारा सरासरी परतावा हा महागाईदरापेक्षा अधिक असेल, तर आपल्या पैशांची उत्पादकता चांगली आहे,
असा ठोकताळा मांडावा. गुंतवणुकीवरील परतावा महागाईदरापेक्षा कमी असेल, तर आपल्या गुंतवणुकीची व्यूहरचना सुधारण्याची आवश्यकता आहे, हे लक्षात घेऊन त्या दिशेने वाटचाल करा.
आपल्या पैशांची उत्पादकता वाढविण्यासाठी नावीन्यपूर्ण कल्पना राबवा. छोट्याछोट्या क्लृप्त्या वापरून आपण हे करू शकतो. त्यासाठी आपले पैसे कोणत्या गोष्टीत विनाकारण अडकून पडतात, याचा शोध घ्या आणि असे मार्ग बंद करा.
त्यातून पैसे किती वाचतात याचा विचार करू नका कारण अल्पकाळात अशी रक्कम खूप छोटी वाटत असली, तरी दीर्घकाळात ती रक्कम खूप मोठी होते. अशा छोट्या गोष्टींतून आपल्याला बचतीची सवय लागते.
आपले उत्पन्न वाढवित राहण्याबरोबरच आपल्या उत्पन्नातून योग्य तेवढी बचत करून उर्वरित पैशात खर्च भागवणे, हे आपले अंतिम ध्येय ठेवा. याचा अर्थ आपले उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करू नका, असा होत नाही. उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करायलाच हवे, मात्र तेवढेच महत्त्व कमावलेल्या पैशाचे योग्य नियोजन करण्याला देणेही आवश्यक आहे. राष्ट्रीय उत्पादकता दिनाच्या निमित्ताने या मुद्द्यांवर विचार करून त्याची अंमलबजावणी करू या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.