डॉ. वीरेंद्र ताटके
नवरात्र म्हणजे आदिशक्तीच्या उपासनेचे नऊ दिवस! या नऊ दिवसांत वेगवेगळी व्रते आणि परंपरा यांचा मिलाफ साधला जातो. वाईट आणि निरर्थक गोष्टींवर ‘अर्थ’पूर्ण विजय मिळविण्यासाठी या व्रतांचा आणि परंपरांचा उपयोग होतो. या उत्सवाचा थोड्या वेगळ्या दृष्टीकोनातून विचार करू या.
रज आणि सत्व गुणांचा विकास
जोपर्यंत आपण तामस गुणावर रज आणि सत्व गुणांनी विजय मिळवत नाही, तोपर्यंत आपली खरी प्रगती होत नाही. तामस गुण हा जडत्व, निष्क्रियता, मंदपणा किंवा आळस दर्शवतो, तर रज आणि सत्व गुण हे क्रियाशीलता, कार्यतत्परता, प्रगती, प्रामाणिकता आणि शांतता दर्शवतात.
रज आणि सत्व गुणांच्या माध्यमातून मिळवलेली संपत्ती आणि वैभव मनुष्याला सुख आणि शांती मिळवून देते. त्यामुळेच पैसे कमविण्यासाठी आपण कायम कार्यतत्पर राहून आणि प्रामाणिक प्रयत्न करून योग्य मार्गांचा अवलंब करायला हवा, तरच आयुष्यात आपल्याला शांती आणि समाधान लाभू शकते. त्या दिशेने वाटचाल करण्याची सुरुवात आपण या नऊ दिवसांत करू या.
अर्थपूर्ण रंग
नवरात्रीच्या नऊ दिवसांत विशिष्ट रंगांचा आपल्या जीवनात समावेश करणे खूप शुभ मानले जाते. हे रंग आपल्याला बचतीचे आणि गुंतवणुकीचे कानमंत्रदेखील देतात. उदा. पांढरा रंग आपल्याला आयुष्यात शांतता हवी असेल, तर आपण आपल्या पैशांचे योग्य नियोजन करायला हवे, असा संदेश देतो. लाल रंग हा उत्साहाचे आणि शक्तीचे प्रतीक आहे.
आपल्या पैशाचे योग्य नियोजन करून गुंतवणूक केल्यास आपल्याला ‘आर्थिक’ शक्ती आणि चैतन्य मिळू शकते. निळा रंग आपल्याला आर्थिक नियोजनाच्या मदतीने आयुष्यात समृद्धी आणि शांतता आणण्याचा सल्ला देतो. पिवळा रंग यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी आपले मन आशावादी आणि आनंदी असणे आवश्यक असते, असे सांगतो.
हिरवा रंग हा आयुष्यातील स्थिरता दर्शवितो. राखाडी रंग कोणत्याही गोष्टींचा सर्व बाजूंनी साधकबाधक विचार करून निर्णय घेण्याचा सल्ला देतो. केशरी रंग आपले उत्पन्न आणि खर्च यांचे योग्य नियोजन करून कायम आनंदी आणि उत्साही राहण्यास शिकवितो. मोरपंखी रंग नावीन्यता दर्शवितो, तर गुलाबी रंग आर्थिक नियोजनाच्या मदतीने आपले व्यक्तिमत्व आकर्षक करण्याचा सल्ला देतो.
उपवास
नवरात्रौत्सवात शरीर शुद्ध करण्यासाठी उपवासाचे व्रत केले जाते. यामुळे मनाला एक प्रकारची शांतता मिळते. उपवास म्हणजे शरीर शुद्ध करण्यासाठी योग्य प्रमाणात आणि विशिष्ट प्रकारचे अन्न ग्रहण करणे होय.
अर्थात, हा उपवास वेगळ्या प्रकारेदेखील करता येतो. आर्थिक प्रगतीसाठी केवळ शुद्ध मार्गांचा अवलंब करणे आणि केवळ हितकारक गोष्टी ऐकणे हादेखील एक प्रकारचा उपवास ठरू शकतो; तसेच अफवा पसरविणाऱ्या गोष्टींपासून दूर राहणे,
पैसे मिळविण्यासाठी गैरमार्गांचा उपयोग न करणे हेदेखील एक व्रत ठरू शकते. या सर्वांची सुरुवात आपण या नवरात्रात करू शकतो. थोडक्यात, वाईट गोष्टींवर ‘अर्थ’पूर्ण विजय मिळविण्याच्या दिशेने वाटचाल सुरू करून आपण हा उत्सव साजरा करू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.