स्मार्ट माहिती
सुधाकर कुलकर्णी , सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर-सीएफपी
अनेकदा आपत्कालीन परिस्थितीत नोकरदार व्यक्तीला भविष्यनिर्वाह निधीतून (पीएफ) अंशत: रक्कम काढण्याची मुभा असते. ‘पीएफ’मधून अशी अंशत: रक्कम (पार्शल विड्रॉवल) काढण्याच्या नियमांमध्ये एक एप्रिल २०२४ पासून काही महत्त्वाचे बदल झाले आहेत.
तातडीच्या वैद्यकीय खर्चासाठी
कर्मचारी स्वत:, पत्नी, मुले, भावंडे किंवा आई-वडील यांच्यासाठी तातडीच्या वैद्यकीय उपचाराकरिता (मेडिकल इमर्जन्सी) ‘पीएफ’मधून अंशतः रक्कम काढता येते. आपले ‘पीएफ’ कॉन्ट्रिब्युशन (योगदान) व त्यावरील व्याज किंवा सहा महिन्यांचा पगार यापैकी सर्वांत कमी असणारी रक्कम काढता येते. यासाठी नोकरीच्या कालावधीची अट नाही.
विवाह खर्चासाठी
स्वत:च्या, भावंडांच्या किंवा मुलांच्या विवाहासाठी ‘पीएफ’मधून रक्कम काढता येते. ‘पीएफ’ कॉन्ट्रिब्युशन (योगदान) व त्यावरील व्याज या दोन्हीच्या एकत्रित शिल्लक असलेल्या रकमेच्या जास्तीजास्त ५० टक्के रक्कम या कारणासाठी काढता येते. मात्र, यासाठी संबंधित कर्मचाऱ्याची किमान सात वर्षे नोकरी झालेली असणे आवश्यक असते.
नवे घर बांधणे, विकत घेणे
नवे घर बांधण्यासाठी किंवा विकत घेण्यासाठी ‘पीएफ’मधून काही रक्कम काढण्यासाठी कर्मचाऱ्याची किमान पाच वर्षे नोकरी झालेली असणे आवश्यक असते. संबंधित घराची नोंदणी स्वत:च्या किंवा पती-पत्नीच्या संयुक्त नावाने असणे आवश्यक असते. कर्मचाऱ्याचा ३६ महिन्यांचा पगार (मूळ पगार + महागाई भत्ता) किंवा घराची किंमत यातील कमी असेल, ती रक्कम ‘पीएफ’मधून काढता येते.
घरदुरुस्ती किंवा नूतनीकरण
घराची दुरुस्ती किंवा नूतनीकरणासाठी किमान पाच वर्षे नोकरी झालेली असल्यास व संबंधित घराची नोंदणी स्वत:च्या किंवा पती-पत्नीच्या संयुक्त नावाने असल्यास, कर्मचाऱ्याच्या १२ महिन्यांच्या पगाराइतकी रक्कम काढता येते.
गृहकर्ज परतफेड
किमान तीन वर्षे नोकरी झालेली असल्यास आणि संबंधित घराची नोंदणी स्वत:च्या किंवा पती-पत्नीच्या संयुक्त नावाने असल्यास ‘पीएफ’मधील शिल्लक रकमेच्या ९० टक्के रक्कम गृहकर्जाच्या परतफेडीसाठी काढता येते.
शैक्षणिक खर्चासाठी
‘पीएफ’मधील योगदानाच्या ५० टक्क्यांपर्यंत रक्कम शैक्षणिक खर्चासाठी काढता येते. मात्र, हा खर्च दहावीनंतरच्या शिक्षणासाठीचा (महाविद्यालयीन/उच्च शिक्षणासाठी) असावा लागतो. यासाठी संबंधित कर्मचाऱ्याची किमान सात वर्षे नोकरी झालेली असणे आवश्यक असते.
अशा विविध कारणांसाठी ‘पीएफ’मधून काही रक्कम काढता येते. मात्र, ‘पीएफ’ची तरतूद प्रामुख्याने सेवानिवृत्तीनंतरच्या खर्चासाठी असल्याने शक्यतो यातील रक्कम काढू नये. अन्य पर्याय नसेल, तरच यातून रक्कम काढावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.