- प्रसाद घारे
गुंतवणूक हा सध्याच्या जमान्यातील एक ‘बझ वर्ड’ आहे. प्रत्येकजण गुंतवणूक करताना विचारपूर्वक गुंतवणूक करतोच असे नाही. कोणीतरी सांगितले म्हणून, कोठेतरी वाचले म्हणून गुंतवणूक करणाऱ्यांची संख्याही खूप आहे. म्हणूनच हे सांगायला हवे, की कोणताही गुंतवणूक पर्याय हा चुकीचा नसतो.(Financial Instruments are never wrong)
विविध गुंतवणूक पर्याय
प्रामुख्याने बँका, खासगी कंपन्या किंवा पोस्टातील मुदत ठेव योजना, सोने चांदी, प्लॅट, जागा किंवा बांधलेली दुकाने, घरे, शोरूम, शेअर, म्युच्युअल फंडाचे विविध प्रकार, पीपीएफ, पोस्टाच्या विविध योजना, ‘एलआयसी’च्या वेगवेगळ्या योजना इत्यादी.
(यात आणखी काहींची भर नक्कीच घालता येईल.) या प्रत्येक पर्यायाची काही वैशिष्ट्ये असतात. मुख्यतः आर्थिक निकषांचा विचार करून, एखादा व्यक्तीसमूह डोळ्यासमोर ठेवून या योजनांची आखणी केलेली असते. उदाहरणार्थ, सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ- पब्लिक प्रॉव्हिडंड फंड) ही दीर्घ मुदतीची योजना आहे.
यामध्ये जास्तीत जास्त किती रक्कम भरता येईल, हे सरकारने ठरवून दिलेले असते. याचा व्याजदर सरकार दरवर्षी जाहीर करते. मुदतठेव अगदी आठ, पंधरा दिवस, तीन, सहा महिने, एक वर्ष, पाच, सात वर्षापर्यंत याची मुदत असते. यात किती रक्कम ठेवायची याला शक्यतो मर्यादा नसते. ठेवीच्या कालमर्यादेनुसार; तसेच प्रत्येक बँक, कंपनीनुसार त्याचा व्याजदर ठरतो.
आता कोणताही गुंतवणूक पर्याय हा चुकीचा नसतो, म्हणजे काय? हे एका वेगळ्या उदाहरणाने पाहू या . टेबल टेनिस, लॉन टेनिस, क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, बेसबॉल या प्रत्येक खेळासाठी विशिष्ट पद्धतीचा बॉल वापरला जातो.
हे आपल्याला माहिती आहे. टेबल टेनिसच्या बॉलने क्रिकेट खेळता येईल का? किंवा फुटबॉलच्या बॉलने बेसबॉल खेळता येईल का? तर याचे उत्तर अर्थातच नाही, असेच येईल. या प्रत्येक खेळात बॉलचा वापर केला जात असला, तरी बॉलचा प्रकार वेगळा असतो; तसेच काहीसे गुंतवणुकीच्या विविध पर्यायांचे असते.
आपल्याला दीर्घमुदतीसाठी (मुलांचे उच्च शिक्षण, मुलीचे लग्न किंवा निवृत्ती नियोजन आदी कारणांसाठी) गुंतवणूक करायची असेल, तर त्यासाठी दीर्घमुदतीसाठी उपयुक्त असणाऱ्या गुंतवणूक पर्यायांचा विचार करूनच गुंतवणूक करायला हवी. ( उदाहरणार्थ, पीपीएफ, शेअर, म्युच्युअल फंड आदी) अन्यथा, आपले ठराविक उद्दिष्ट साध्य होणार नाही.
कधीकधी तीन, सहा महिने किंवा एक, दोन वर्षांनी आपल्याला ठराविक रक्कम लागणार असते. (शाळेची, क्लासची फी, निवासी कर, दुचाकी, चारचाकी वाहन खरेदी आदीसाठी) अशावेळी अल्पमुदतीच्या ठेवी, आवर्ती ठेव (रिकरिंग डिपॉझिट), लिक्विंड फंड इत्यादी गुंतवणूक प्रकारातच गुंतवणूक करावी लागते.
नाहीतर आपल्याला आवश्यकता असेल तेव्हा पैसे हाताशी येणार नाहीत. याचाच अर्थ असा, की टेबल टेनिसच्या बॉलने आपल्याला क्रिकेट खेळता येणार नाही किंवा फुटबॉलच्या बॉलने बेसबॉल खेळता येणार नाही.
आपली बॉलची निवड चुकली, की आपल्याला अपेक्षित खेळ खेळता येणार नाही. तसेच गुंतवणूक पर्याय चुकला, की अपेक्षित उद्दिष्ट पूर्ण होऊ शकणार नाही. म्हणूनच कोणताही गुंतवणूक पर्याय हा चुकीचा नसतो, तर आपली निवड चुकीची असते. मात्र, दोष गुंतवणूक पर्यायाला दिला जातो. त्यामुळे नेहमी टेबल टेनिसच्या बॉलनेच टेबल टेनिस खेळायचे आणि फुटबॉलच्या बॉलने फुटबॉलचे खेळायचा आणि त्या खेळाचा मनमुराद आनंद लटुायचा.
कोणताही गुंतवणूक पर्याय हा चुकीचा नसतो, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आपली निवड चुकू नये यासाठी आपल्या अल्प, दीर्घमुदतीच्या उद्दिष्टांसाठी गुंतवणूक करताना आर्थिक सल्लागाराची मदत घेऊन योग्य गुंतवणूक पर्यायाची निवड करणे महत्त्वाचे आहे. तेव्हा, उघडा डोळे गुंतवा नीट!
(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.