Public Provident Fund: सर्वसामान्य व मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांमध्ये गुंतवणुकीचा सर्वांत आवडता पर्याय म्हणजे ‘पीपीएफ’ (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड) अर्थात सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी.
- अॅड. प्रतिभा सुभाषचंद्र देवी
चालू आर्थिक वर्ष २०२२-२३ येत्या ३१ मार्चला संपत आहे. त्यामुळे यासाठी करसवलत मिळवण्याकरिता ३१ मार्चपूर्वी पीपीएफ अर्थात सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी खात्यात पैसे भरणे लाभदायी ठरेल.
‘पीपीएफ’ म्हणजे नेमके काय?
सर्वसामान्य व मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांमध्ये गुंतवणुकीचा सर्वांत आवडता पर्याय म्हणजे ‘पीपीएफ’ (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड) अर्थात सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी. या योजनेत दरवर्षी भरलेल्या रकमेवर करसवलत मिळते; तसेच याचा स्थिर व्याजदर, चक्रवाढ पद्धतीने व्याज व मुदतीअंती मिळणारी करमुक्त रक्कम ही वैशिष्ट्ये आहेत.
त्यामुळे या योजनेत गुंतवणूक करण्याकडे सर्वाधिक कल असतो. मात्र ‘पीपीएफ’संबंधी महत्त्वाच्या नियमांची बहुतांश गुंतवणूकदारांना माहिती नसते. अनावधानाने वा सहेतूकपणे हे नियम डावलले गेल्यास ‘पीपीएफ’ खाते अडचणीत येऊ शकते. अपवादात्मक स्थितीत, तर हे खाते बंदही होऊ शकते. त्यामुळे या नियमांची माहिती घेऊन गुंतवणूक केल्यास ती अधिक लाभदायी ठरेल.
एकापेक्षा अधिक खात्यांना परवानगी नाही
एका व्यक्तीच्या नावे केवळ एकच ‘पीपीएफ’ खाते उघडता येते. हे खाते बँक व टपाल खात्यात उघडता येत असल्याने बँकेत व टपाल कार्यालयात प्रत्येकी एक खाते उघडण्याचीही परवानगी नसते, हे ध्यानात घ्यावे. ‘पीपीएफ’ खाते सुरू करण्यासाठीच्या अर्जात, ‘माझे अन्य कोठेही पीपीएफ खाते नाही’, असे हमीपत्र द्यावे लागते.
त्यामुळे ही हमी खोटी ठरली, तर खातेदारावर कारवाई होऊ शकते. एखाद्या खातेदाराची दोन ‘पीपीएफ’ खाती असल्याचे उघड झाल्यानंतर त्यातील दुसरे खाते हे अवैध मानले जाते. त्यातील रकमेवर व्याज मिळत नाही. हे दुसरे खाते पहिल्या खात्यात विलीन करण्याची मुभा आहे. मात्र, त्यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालयाची परवानगी घ्यावी लागते. परवानगी मिळाल्यानंतर व्याज चालू होते.
अज्ञान मुलांच्या नावाने खाते
अज्ञान मुलांच्या नावे पालकांना ‘पीपीएफ’ खाते सुरू करता येते. पालकांपैकी कोणाचे वैयक्तिक ‘पीपीएफ’ खाते असले, तरीही मुलाच्या नावे दुसरे खाते सुरू करता येते. मात्र एका अल्पवयीन मुलाच्या नावे एकच खाते उघडता येते. त्यामुळे एका मुलाच्या नावे आई वा वडिलांपैकी एकालाच खाते सुरू करता येते.
संयुक्त खात्यास मनाई
बँकेच्या बचत खात्याप्रमाणे ‘पीपीएफ’मध्ये संयुक्त खाते उघडण्याची सुविधा नाही. अनावधानाने असे संयुक्त खाते उघडले गेल्यास, ही बाब लक्षात आल्यानंतर बँक वा टपाल कार्यालयास ते रद्द करण्याचा अधिकार असतो. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने ‘पीपीएफ’ खात्यावर नॉमिनी नेमता येतो.
वार्षिक मर्यादा
‘पीपीएफ’ खात्यामध्ये दरवर्षी जास्तीत जास्त दीड लाख रुपये भरण्याचीच परवानगी आहे. दीड लाखापेक्षा अधिक रक्कम भरल्यास त्या रकमेवर व्याज मिळणार नाही. तसेच, त्या रकमेवर करसवलतही लागू होणार नाही हे खातेदारांनी लक्षात घ्यावे. तसेच, या खात्यात दरवर्षी किमान पाचशे रुपयांचा भरणा होणे आवश्यक आहे. वर्षभरात किमान पाचशे रुपये न भरल्यास हे खाते बंद होऊ शकते.
मुदतवाढीची सुविधा
‘पीपीएफ’ खात्याचा मूळ कालावधी हा १५ वर्षांचा असतो. या खात्यास पाच-पाच वर्षांची मुदतवाढ देता येते. मात्र बँक वा टपाल कार्यालयाला या मुदतवाढीची सूचना मूळ मुदत संपण्याच्या एक वर्ष आधी करणे आवश्यक असते. ही सूचना लेखी करावी लागते. सूचना न केल्यास १५ वर्षांनंतर जमा होणाऱ्या रकमेवर व्याज मिळत नाही; तसेच अतिरिक्त रक्कम करसवलतीसही पात्र ठरत नाही.
‘पीपीएफ’ खात्याचा लॉक-इन कालावधी १५ वर्षे आहे. म्हणजेच आपण कायद्यानुसार त्यापूर्वी पैसे काढू शकत नाही. परंतु, दोन वर्षांनंतर जमा रकमेपैकी २५ टक्क्यांपर्यंत कर्ज घेतले जाऊ शकते. दोन वर्ष पूर्ण होईपर्यंत (तिसऱ्या वर्षाच्या सुरुवातीस) आणि सहा वर्षांपूर्वी कर्ज घेतले जाऊ शकते. कर्ज ३६ महिन्यांत परत करावे लागते. कर्जाच्या रकमेवर ‘पीपीएफ’वर मिळणाऱ्या व्याजापेक्षा दोन टक्के अधिक व्याज असते. सात वर्षे पूर्ण झाल्यानंतर यातून काही प्रमाणाता पैसे काढता येतात.
पुनर्गुंतवणुकीचा पर्याय
‘पीपीएफ’ खात्याचा कालावधी १५ वर्षे आहे. या कालावधीनंतर खाते परिपक्व होते. मॅच्युरिटीचे पैसे एकतर ग्राहक घेऊ शकतात किंवा पुन्हा गुंतवूही शकतात. ग्राहकास १५ वर्षांनंतर आणि पाच वर्षांनंतर गुंतवणुकीची सुविधा मिळते. आता या खात्यात जे काही पैसे जमा होतील त्यावर व्याज मिळेल, मुदतपूर्तीची रक्कमही या लाभामध्ये जोडली जाईल.अशा प्रकारे काही हजारांची गुंतवणूक अनेक लाख रुपयांमध्ये रूपांतरित होऊ शकते.(लेखिका ज्येष्ठ करसल्लागार आहेत.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.