मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने पेमेंट अॅग्रिगेटरसाठी कठोर नियम आणण्याच्या दिशेने पुढचे पाऊल उचलले असून, नव्या मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा जारी केला आहे. यावर या क्षेत्राशी संबंधित भागधारकांकडून सूचना मागविण्यात आल्या असून, त्या आल्यानंतरच त्यांची अंमलबजावणी केली जाईल, असे रिझर्व्ह बँकेने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे.
सध्याच्या ज्या बिगरबँकिंग पेमेंट अॅग्रिगेटर कंपन्या अधिकृत परवानगीसाठी अर्ज करणार नाहीत किंवा अर्ज करताना किमान संपत्तीच्या १५ कोटी रुपयांची संपत्ती असण्याच्या अटीचे पालन करण्यास सक्षम नसतील, त्यांना ३१ जुलै २०२५ पर्यंत त्यांचा व्यवसाय बंद करावा लागेल, असे आरबीआयने म्हटले आहे.
पेमेंट अॅग्रिगेटर कंपन्यांना एक ऑगस्ट २०२५ पासून डेबिट आणि क्रेडिट कार्ड ग्राहकांची माहिती संग्रहित करण्याची परवानगी दिली जाणार नाही. ही माहिती साठवण्याची परवानगी फक्त कार्ड जारी आणि कार्ड नेटवर्क सुविधा देणाऱ्या व्हिसा, मास्टरकार्ड आणि बँका यांनाच असेल.
एक ऑगस्ट २०२५ पासून कार्ड वापरून केलेल्या समोरासमोर किंवा प्रॉक्सिमिटी पेमेंट व्यवहारांसाठी, कार्ड जारीकर्त्या कंपन्या किंवा कार्ड नेटवर्क कंपन्यांव्यतिरिक्त या व्यवहार साखळीतील अन्य कोणतीही संस्था ग्राहकांची माहिती संग्रहित करणार नाही. तसेच आधी साठवलेली माहितीही नष्ट करावी लागेल.
केवळ व्यवहारांचा मागोवा घेण्यासाठी कंपन्यांना कार्ड क्रमांकाचे शेवटचे चार अंक आणि कार्ड जारी करणाऱ्याचे नाव एवढीच मर्यादित माहिती ठेवण्याची परवानगी दिली जाईल, असे आरबीआयच्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
ज्या अधिकृत बिगरबँकिंग पेमेंट अॅग्रिगेटरना प्रत्यक्षात अॅग्रिगेटर सेवा द्यायची आहे, त्यांना असा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी डिपार्टमेंट ऑफ पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम आणि रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय कार्यालयाकडून मंजुरी घ्यावी लागेल.
अर्ज दाखल करताना या संस्थांकडे १५ कोटी रुपयांची निव्वळ संपत्ती असणे आवश्यक आहे. अधिकृत परवाना मिळाल्यानंतर तिसऱ्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस त्यांच्याकडे किमान २५ कोटी रुपयांची निव्वळ संपत्ती असणे आवश्यक आहे.
सर्व विद्यमान बिगरबँकिंग पेमेंट अॅग्रिगेटर जे किमान संपत्तीच्या अटीचे पालन करण्यास सक्षम नाहीत किंवा अधिकृत परवानगीसाठी अर्ज करणार नाहीत, त्यांना ३१ जुलै २०२५ पर्यंत त्यांचा व्यवसाय बंद करावा लागेल. त्यानंतर त्यांना ही नेटवर्थ पातळी कायम राखावी लागेल.
पेमेंट अॅग्रिगेटर हा तृतीय पक्ष सेवा प्रदाता आहे, जो ग्राहकांना व्यापाऱ्यांना पेमेंट करण्यास सक्षम करतो. पेमेंट अॅग्रिगेटरच्या माध्यमातूनच ग्राहक डेबिट आणि क्रेडिट कार्ड, यूपीआय, बँक ट्रान्स्फरद्वारे पेमेंट करू शकतात. या पेमेंट अॅग्रिगेटरमध्ये अॅमेझॉन पे, रेझर पे, पेटीएम, कॅशफ्री, फोनपे आणि गुगल पे यांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.