Reliance Industries : ‘रिलायन्स’ला १९ हजार कोटींचा नफा; वार्षिक ११ टक्के वाढ

‘रिलायन्स जिओ’नेही या तिमाहीत चांगली कामगिरी केली असून, कंपनीला ५,४४५ कोटी रुपये निव्वळ नफा झाला आहे.
reliance q3 update reliance industries 19641 cr profit average high 11 percent in year
reliance q3 update reliance industries 19641 cr profit average high 11 percent in yearSakal
Updated on

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीज लि. ला डिसेंबर तिमाहीत १९,६४१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला असून, त्यात वार्षिक ११ टक्के वाढ झाली आहे. कंपनीच्या वतीने आज येथे डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले. त्यावेळी ही माहिती देण्यात आली.

कंपनीने १७,२६५ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा कमावला असून, गेल्या आर्थिक वर्षातील याच तिमाहीतील १५,७९२ कोटी रुपयांच्या तुलनेत त्यात नऊ टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीला ऑपरेशन्समधून मिळणारा महसूल २.४८ लाख कोटी रुपये असून, त्यात वार्षिक ३.२ टक्के वाढ झाली आहे. तेल आणि वायू उद्योग विभागाच्या महसुलात ५० टक्के वाढ झाली असून तो ६,७१९ कोटी रुपये आहे, असे कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी यावेळी सांगितले.

‘जिओ’ची उत्तम कामगिरी

‘रिलायन्स जिओ’नेही या तिमाहीत चांगली कामगिरी केली असून, कंपनीला ५,४४५ कोटी रुपये निव्वळ नफा झाला आहे. त्यात वार्षिक सहा टक्के वाढ नोंदवली गेली आहे. ‘जिओ’च्या महसुलात वार्षिक ११ टक्के वाढ झाली असून, तो ३२,५१० कोटी रुपये आहे.

जिओची ग्राहकसंख्या डिसेंबरअखेर ४७ कोटींहून अधिक झाली असून, सप्टेंबरअखेरच्या तिमाहीत ती ४५ कोटी होती. प्रति ग्राहक उत्पन्नातही वाढ झाली असून, उच्च महसुलामुळे कंपनीचा नफा वाढला आहे. जिओने देशात सर्वाधिक वेगाने फाइव्ह-जी सेवा सुरू केली आहे, त्याचा मला अतिशय आनंद आहे, असे मुकेश अंबानी यांनी यावेळी सांगितले.

‘रिटेल’च्या नफ्यात वाढ

रिलायन्स रिटेलचा नफा ४० टक्क्यांनी वाढून ३१६५ कोटींवर पोहोचला, तर रिटेलने या तिमाहीत आतापर्यंतचा सर्वोच्च ८३,०६३ कोटी रुपये महसुलाची कमाई केली आहे. किराणा, फॅशन आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात चांगला व्यवसाय झाल्याने महसुलात वाढ झाल्याचे कंपनीने म्हटले आहे.

कंपनीने नवी २५२ नवी दालने सुरू केली असून, यामुळे एकूण दालनांची संख्या १८,७७४ झाली आहे. या दालनांना २८ कोटी लोकांनी भेट दिली असून, त्यात वार्षिक ४०.३ टक्के वाढ झाली आहे.

या तिमाहीत कंपनीच्या तेल शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल्स या मुख्य व्यवसायाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. या विभागाचा महसूल वार्षिक २.४ टक्क्यांनी घसरून १.४१ लाख कोटींवर आला आहे.

खर्चातील वाढ, पुरवठ्यातील अडथळे तसेच नियोजित देखभाल आणि तपासणी यामुळे प्रकल्प बंद असल्यामुळे उत्पन्न आणि नफ्यावर परिणाम झाला, असे कंपनीने म्हटले आहे. डिसेंबर तिमाहीत कंपनीचे थकित कर्ज सप्टेंबर तिमाहीतील २.९५ लाख कोटी रुपयांवरून ३.११ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.