मुंबई : म्युच्युअल फंडांमध्ये सप्टेंबरमध्ये एसआयपीद्वारे आतापर्यंतची सर्वोच्च गुंतवणूक झाली आहे. त्याचबरोबर गुंतवणूकदारांच्या संख्येनेही चार कोटींचा आकडा ओलांडला आहे. यावरून म्युच्युअल फंड आणि एसआयपीलाच सर्वसामान्य गुंतवणूकदारांची सर्वाधिक पसंती असल्याचे स्पष्ट झाले आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाने (अॅम्फी) आज जाहीर केलेल्या अहवालावरून ही बाब समोर आली आहे.
या अहवालानुसार, सप्टेंबरमध्ये एसआयपीद्वारे १६,०४२ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून, ही आतापर्यंतची सर्वोच्च गुंतवणूक आहे. तर म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांची संख्या चार कोटींवरून अधिक झाली असून, गेल्या २१ महिन्यांत एक कोटी नवे ग्राहक जोडले गेले आहेत. गुंतवणूकदारांची संख्या या वर्षीच्या एकूण प्राप्तिकरदात्यांच्या संख्येच्या सुमारे ५७ टक्के आहे. तसेच फंडांच्या व्यवस्थापनाअंतर्गत असलेल्या मालमत्ता ४६.५८ लाख कोटी रुपयांवर गेली आहे.
इक्विटी म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीत मात्र ऑगस्टच्या तुलनेत या महिन्यात ३०.४ टक्के घसरण झाली आहे. या महिन्यात १४,०९१ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. ऑगस्टमध्ये हे प्रमाण २०,२४५ कोटी रुपये होती.
सहा नव्या फंड योजनांमुळे गुंतवणूक येण्यास मदत झाली. लार्ज-कॅप आणि डेट फंडातून या महिन्यातही गुंतवणूक काढून घेण्यात आली. मजबूत परताव्याच्या आशेने गुंतवणूकदारांनी लार्ज-कॅपपेक्षा स्मॉल आणि मिड-कॅप फंडांना प्राधान्य दिले.
स्मॉल कॅप फंडामध्ये २,६७८ कोटी रुपये आणि मिड कॅप फंडामध्ये २,००१ कोटी रुपयांची भर पडली असल्याचे या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. थीमॅटिक फंडांमध्ये सर्वाधिक ३१४६ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. हायब्रीड फंडांमध्येही वाढ दिसून आली आहे. यावरून गुंतवणूकदार भांडवल संरक्षणावर लक्ष केंद्रित करून त्यांच्या गुंतवणुकीत विविधता आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
गुंतवणुकीची आकडेवारी...
मल्टी कॅप फंड : २,२३४ कोटी रुपयांची आवक
लार्ज व मिड कॅप फंड : १,३३४ कोटींची आवक
मिड-कॅप फंड : २,००८ कोटींची आवक
स्मॉल कॅप फंड : २६७८ कोटींची आवक
फोकस्ड फंड : ४८.९४ कोटींची आवक
ईएलएसएस : १४१ कोटींची आवक
फ्लेक्सी कॅप फंड : १,३५३ कोटींची आवक
लार्ज-कॅप फंड : ११० कोटी रुपयांची गुंतवणूक बाहेर
म्युच्युअल फंड उद्योगाने चार कोटी गुंतवणूकदारांचा आकडा ओलांडला आहे, हा भारतीय गुंतवणूकदारांच्या म्युच्युअल फंडाच्या मार्गाने शेअर बाजारातील सहभागाचा पुरावा आहे. विक्रमी ‘एसआयपी’ योगदानाद्वारेही त्यांनी म्युच्युअल फंडांवरील विश्वास दाखवून दिला आहे.
- एन. एस. वेंकटेश, मुख्य कार्यकारी अधिकारी, अॅम्फी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.