मत खेलो! इंडिया मत खेलो!

शेअर बाजारामध्ये थेट गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या नुकतीच (ऑगस्ट महिनाअखेर) दहा कोटींच्या वर गेली आहे. कोविड महासाथीनंतर त्यात सातत्याने वाढ होताना दिसत आहे.
share market investment derivatives sebi guidelines
share market investment derivatives sebi guidelinessakal
Updated on

- सुहास राजदेरकर

शेअर बाजारामध्ये थेट गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या नुकतीच (ऑगस्ट महिनाअखेर) दहा कोटींच्या वर गेली आहे. कोविड महासाथीनंतर त्यात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. मात्र, अलीकडेच शेअर बाजारातील डेरिव्हेटिव्ह अर्थात ‘फ्युचर्स आणि ऑप्शन्स’ विभागावरील ‘सेबी’ने नुकताच प्रसिद्ध केलेला अहवाल अतिशय धक्कादायक असून, विशेषतः तरुण पिढीने त्याची अतिशय गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.

कोविड महासाथीनंतर शेअर बाजार फारसा खाली गेला नाही आणि गेला तरीही लगेच वर आला. कोविडच्या लॉकडाउनमध्ये तरुणांना घरी बसावे लागले, शेअर बाजार सुरू होता, बाकी करण्यासारखे फारसे नव्हते,

त्यामुळे डी-मॅट खाती वाढली आणि तरुणाई शेअर बाजाराकडे वळली. पण...एका रात्रीत श्रीमंत होण्याच्या लालसेने अल्पावधीतच बहुतेकांनी डेरिव्हेटिव्ह अर्थात ‘फ्युचर्स आणि ऑप्शन्स’मध्ये खेळायला सुरुवात केली. आणि काय घडले ते सोबत दिलेल्या चौकटीतील आकड्यांवरूनच लक्षात येईल.

मागील तीन आर्थिक वर्षांतील आकडे

(२०२२ ते २०२४)

(हे आकडे डेरिव्हेटिव्ह विभागामधील असून, त्याचा कॅश विभागाशी संबंध नाही. सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी शेअर बाजार वाईट नसून, ‘डेरिव्हेटिव्ह’ विभाग धोकादायक आहे.)

  • ९३ टक्के गुंतवणूकदारांचे (खरेतर - ट्रेडरचे) पैसे बुडाले.

  • १.१३ कोटी ट्रेडरना तोटा होऊन त्यांचे मुद्दल बुडाले.

  • एकूण १,८०,००० कोटी रुपये बुडाले.

  • चार लाख ट्रेडरचा प्रत्येकी सरासरी तोटा. २८ लाख रुपये. अर्थात ९ लाख रुपये वर्षाला आणि ७५,००० रुपये महिन्याचा तोटा.

  • फक्त २०२४ मध्येच ७५,००० कोटी रुपये बुडाले.

  • एका ट्रेडरचा सरासरी तोटा २,००,००० रुपये

  • ७५ टक्के ट्रेडरचे वार्षिक सरासरी एकूण उत्पन्न फक्त ५,००,००० रुपये अर्थात, ४०,००० रुपये महिना आहे.

  • ४० टक्के, अर्थात ४२ लाख ट्रेडर हे बाजारामध्ये पहिल्यांदा व्यवहार करणारे आहेत.

  • ५० टक्के ट्रेडर हे पहिल्या फक्त चार राज्यांतील आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि राजस्थान आहेत.

  • ज्यांना २०२२ आणि २०२३ मध्ये तोटा झाला, त्यापैकी तब्बल ७५ टक्के ट्रेडरनी २०२४ मध्येही व्यवहार केले आणि सुरूच ठेवले.

  • ४३ टक्के ट्रेडर हे ३० वर्षांच्या आतील तरुण सदस्य आहेत.

  • फक्त एकच गोष्ट चांगली होत आहे, की महिला ट्रेडरचे प्रमाण १४.९ टक्क्यांवरून घसरून १३.७ टक्क्यांवर आले आहे.

गुंतवणूकदारांचे पैसे कोठे गेले?

  • वर्ष २०२४ मध्ये तब्बल ६१,००० कोटी रुपये, परकी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (एफपीआय) आणि अति श्रीमंत गुंतवणूकदार (एचएनआय) यांच्या खिशात गेले.

  • ब्रोकर, स्टॉक एक्स्चेंज आणि सरकारने (एसटीटी) मिळून ५०,००० कोटी रुपये कमावले.

  • फक्त १ टक्का ट्रेडरनी १ लाख रुपयांच्या वर नफा कमावला.

  • ९६ टक्के ‘एफपीआय’ आणि ‘एचएनआय’ यांनी अल्गोरिदमचा वापर केला.

निष्कर्ष

  • शेअर बाजार (सेन्सेक्स) खरेतर मागील तीन वर्षांमध्ये ५७,००० अंशांवरून ८५,००० अंशांवर गेला. अर्थात १५ टक्के वार्षिक परतावा. हेच १,८०,००० कोटी रुपये सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी ‘एफ अँड ओ’ अर्थात डेरिव्हेटिव्हमध्ये न टाकता कॅश बाजारात गुंतविले असते, तरीसुद्धा ते आज २,७४,००० कोटी रुपये झाले असते. (ॲपॉर्च्युनिटी लॉस)

  • महिला जशा चुका सुधारण्याचे धैर्य दाखून ट्रेडिंग बंद करीत आहेत, तसे पुरुष करताना दिसत नाहीत आणि पैसे बुडूनसुद्धा हे ट्रेडर परत ‘डेरिव्हेटिव्ह’मध्ये पैसे लावत आहेत. याचाच अर्थ त्यांना त्याचे व्यसन किंवा चटक लागली आहे.

  • वरच्या चार राज्यांत ब्रोकरची संख्या जास्त असून, बहुतेक ब्रोकर मोठ्या प्रमाणामध्ये अशा ट्रेडरना फसवत आहेत किंवा भुलवत आहेत. (मिस-सेलिंग).

  • ज्यांचे पैसे बुडाले ते श्रीमंत नसून, सर्वसामान्य गुंतवणूकदार आहेत, ज्यामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना हा मोठा फटका आहे.

  • तरुण मुले करिअरच्या सुरुवातीच्या काळात चुकीच्या दिशेने भरकटत आहेत. शेअर बाजारामध्ये किंवा म्युच्युअल फंड इक्विटी योजनांमध्ये ‘एसआयपी’द्वारे दीर्घकाळासाठी गुंतवणूक केल्याने मिळणाऱ्या फायद्यापासून वंचित होऊन त्यांचे पुढील आयुष्य कठीण होणार आहे. ‘मार्जिन फंडिंग’ची आकडेवारी यामध्ये नाही. ती विचारात घेतली, तर अशी मुले कर्जाच्या विळख्यात अडकण्याची शक्यता वाढते आहे.

  • योग्य मार्गाने शेअर बाजारातील गुंतवणुकीचे प्रशिक्षण शाळा-कॉलेज आणि प्रसारमाध्यमांनी देणे आवश्यक वाटते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.