गरज मानसिकता बदलाची

म्युच्युअल फंडांनीही चांगला परतावा दिला आहे. आता बाजार उच्चांकावरून खाली येण्याची भीतीही गुंतवणूकदारांना सतावत आहे.
share market mutual fund high returns on investment
share market mutual fund high returns on investment sakal
Updated on

कोविड साथीमुळे शेअर बाजारात आलेल्या पडझडीनंतर आपण सर्वांनी बाजारात एक मोठी तेजी बघितली आणि अजूनही बघत आहोत. गेल्या काही आठवड्यामध्ये भारतीय शेअर बाजाराने नवे उच्चांक गाठले.

म्युच्युअल फंडांनीही चांगला परतावा दिला आहे. आता बाजार उच्चांकावरून खाली येण्याची भीतीही गुंतवणूकदारांना सतावत आहे. त्यामुळे आता शेअरची विक्री करून नफा घ्यावा का, गुंतवणूक अशीच पुढे चालू ठेवावी असा प्रश्‍न त्यांना पडला आहे. या आणि अशा सर्व प्रश्नांची उत्तरे या लेखातून देण्याचा प्रयत्न केला आहे.

उद्दिष्टपूर्तीसाठी गुंतवणूक

आपली म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही काही उद्दिष्टे ठेऊन केलेली असते. सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी निधी तयार करण्यासाठी, मुलांच्या उच्चशिक्षणासाठी आणि अन्य दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी.

ही गुंतवणूक दीर्घावधीसाठी केली असेल, तर अधूनमधून येणाऱ्या शेअर बाजारातील चढ-उतारांकडे बघून ती का विकावी? शेअर बाजार वर गेला, तरी भीती वाटून गुंतवणूक काढून घेतली जाते, तो खाली आला, तरी भीती वाटून गुंतवणूक काढून घेतली जाते.

सतत अशाप्रकारे काही ना काही कारणाने आपण केलेली गुंतवणूक विकत राहिलो, तर त्या गुंतवणुकीवर मिळणारा ‘कंपाउंडिंग इफेक्ट’ (चक्रवाढ परिणाम) कधीच बघायला मिळणार नाही, हे नक्की. दीर्घकालीन गुंतवणुकीवर हा परतावा कसा मिळतो, ते समजून घेऊ या. समजा, एखाद्याने म्युच्युअल फंडात दरमहा ५० हजार रुपयांची गुंतवणूक सुरू केली आणि त्या गुंतवणुकीवर सरासरी १५ टक्के परतावा मिळाला तर

दरमहा केलेली गुंतवणूक (रुपये)-सरासरी वार्षिक परतावा (टक्के)-कालावधी-एकूण

५०,०००- १५ -९ -१,०८,७२,३४८

५०,०००- १५- १२.५ -२,०४,५६,८४०

५०,००० -१५- १५ -३,०८,१८,२८०

५०,०००- १५ -१६.५ -३,९६,१३,३९७

वरील उदाहरणातून असे दिसते, की दरमहा ५०,००० रुपये गुंतवणूक केल्यानंतर एक कोटी रुपये मिळण्यासाठी नऊ वर्षे लागतात; पण त्याच एक कोटी रुपयांचे दोन कोटी रुपये होण्यासाठी पुढे फक्त ३.५ वर्षे लागतात.

दोन कोटी रुपयांचे तीन कोटी होण्यासाठी आणखी २.५ वर्षे आणि तीन कोटींचे चार कोटी रुपये होण्यासाठी आणखी फक्त १.५ वर्ष लागते. म्हणजे सुरवातीची अनेक वर्षे आपल्याला गुंतवणूक खूप वेगाने वाढताना दिसत नाही; पण जशी ही गुंतवणूक दीर्घकालीन होत जाते, तसा त्यावरील ‘कंपाउंडिंग इफेक्ट’ दिसायला लागतो.

आपण सातत्याने या ना त्या कारणाने आपली गुंतवणूक विकत राहिलो, तर असा परिणाम गुंतवणुकीवर कधीच दिसणार नाही, हे नक्की. हे असे मूल्यांकन होण्यासाठी संयम आणि आपल्या अर्थव्यवस्थेवर आपला विश्वास हवा आणि नेमक्या याच दोन गोष्टींचा गुंतवणूकदारांमध्ये अभाव दिसतो.

अर्थव्यवस्था मोठ्या तेजीसाठी सज्ज

आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर आपल्यापेक्षा मॉर्गन स्टॅनली, मूडीज, फीच अशा बाहेरील लोकांचा जास्त विश्वास आहे, असे दिसते. तज्ज्ञांच्या मते ,भारतीय अर्थव्यवस्था एका मोठ्या तेजीसाठी तयार होत आहे.

१९५० ते १९८९ या कालावधीत जपानच्या शेअर बाजारात मोठी तेजी पाहण्यात आली होती. या कालावधीत जपानच्या निर्देशांकाने २१ टक्के सरासरी वार्षिक परतावा दिला होता. म्हणजे पूर्ण कालावधीत १,५७,०१५ टक्के एकूण परतावा दिला होता.

आपल्या शेअर बाजारातही असेच होण्याची दाट शक्यता आहे. तेव्हा मित्रहो, ही वेळ गुंतवणूक वाढवायची आहे, हे मनात पक्के करा. ज्यांनी आपली गुंतवणूक याआधी विकली आहे. त्यांच्यासाठीही अजून वेळ गेलेली नाही.

बाजार अजूनही खूप वर गेलेला नाही. विकलेली गुंतवणूक परत बाजाराच्या या पातळीवर येईल. तेव्हा पुढील सहा महिन्यांकरिता टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करा. आपला भारत अर्थव्यवस्थेमध्ये ‘फिरसे सोने की चिडिया’ होणार हे नक्की.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()