Share Market: शेयर बाजारात दिवस संयमाचे आहेत

share market
share marketesakal
Updated on

एक सप्ताह शेअर बाजार खाली आला म्हणजे बाजार संपला नाही. अगदी तेजी संपली असे जरी वाटले तरी शेअर बाजार सहसा एकाच दिशेने सतत खाली येत नाही. मधून मधून तो वर जातो कारण मंदीवाले मंदी कापतात आणि वरच्या भावात पुन्हा नवी मंदी उभी राहते. आता निवडणूक येईल, गुंतवणुकीतून पूर्ण मोकळे होऊ असा ग्रह करण्यापेक्षा आलेल्या संधीचा अधिकाधिक फायदा करून घेणे हे उद्दिष्ट ठेवले पाहिजे.

भूषण महाजन

जादुगार रघुवीर ह्यांच्या जादूच्या प्रयोगांनी एकेकाळी महाराष्ट्राला वेड लावले होते. तसे ते प्रयोग करीत जगभर - पाचही खंड फिरले होते. त्यांच्या प्रयोगात ‘वॉटर ऑफ गॅन्जेस’ असा एक प्रयोग असे. कार्यक्रमातील प्रत्येक जादूनंतर स्टेजवर ठेवलेल्या चरवीतील पाणी ते एका बादलीत रिकामे करीत आणि काय आश्चर्य पुढच्या जादूच्या वेळी ती चरवी पुन्हा पाण्याने भरलेली असे.

बालपणी हे मोठे विस्मयजनक वाटे. आत बर्फ वगैरे ठेवला असेल हे कळण्याचे ते वय नव्हते. गेल्या सप्ताहात शेअर बाजाराने असेच एक चरवीभर पाणी रिकामे केले. जरी असे होईल याची पूर्वकल्पना देण्याचा आम्ही प्रयत्न केला असला, म्हणजे थोडीफार मंदी तोंडावर आली आहे ही कल्पना देण्याचा प्रयास आम्ही केला असला, तरी नफा खिशात टाकणे किती गुंतवणूकदारांना जमले ते ठाऊक नाही. ज्यां

ना जमले ते आता बाह्या सरसावून स्वतःला हव्या त्या किमतीला खरेदी करू शकतील आणि घागर पुन्हा भरेल! ज्यांना ते जमले नाही त्यांचे वाट पाहणे वाढले, हे मात्र खरे.

दोन आठवड्यापूर्वी आमचा सल्ला होता, देखो, परखो और खेलो -(सकाळ साप्ताहिक –प्रसिद्धीः १६ सप्टेंबर) -कुठल्याही किमतीला शेअर विकत घेण्याची भीती वाटत नाही, त्यांनीच खरेदी करावी. त्यात गर्भित निरोप असा होता, की बाकीच्यांनी बाजूला बसून गंमत बघावी. ‘बिगर फूल थिअरी’ उलगडून सांगितली होती.

त्यानंतरच्या लेखात ‘पोट भरले असेल तर ताटावरून उठा’ (सकाळ साप्ताहिक –प्रसिद्धीः २३ सप्टेंबर) हे सुचवले होते. गेल्या सप्ताहात दिलेला इशारा नेमका खरा ठरला. अर्थात लेख प्रसिद्ध झाला आणि त्याबरोबरच शेअर बाजारही खाली आला. आता काय?

मुख्य म्हणजे एक सप्ताह शेअर बाजार खाली आला म्हणजे बाजार संपला नाही. अगदी तेजी संपली असे जरी वाटले तरी शेअर बाजार सहसा एकाच दिशेने सतत खाली येत नाही. मधून मधून तो वर जातो कारण मंदीवाले मंदी कापतात आणि वरच्या भावात पुन्हा नवी मंदी उभी राहते. आज एचडीएफसी बँक व रिलायन्स हे दोन शेअर खरे तर तेजीत सामील होत नाहीत हे खरे दुखणे आहे.

एचडीएफसीच्या वारसाहक्काने एचडीएफसी बँकेकडे बिल्डर लोन किंवा मालमत्तेच्या तारणावरील कर्जाचा मोठा वाटा आला आहे. तो प्राधान्य कर्जे या व्याख्येत बसत नाही. स्वाभाविकच विलीनीकरणानंतरच्या महाकंपनीच्या नफ्यातील वृद्धी पूर्वीसारखी दिमाखदार असणार नाही हे व्यवस्थापनाने स्पष्ट केले. किमान डिसेंबर अखेरच्या निकालापर्यंत या शेअरकडून मोठ्या अपेक्षा नाहीत.

तसेच रिलायन्सदेखील खनिज तेलाच्या वाढत्या किमतीचा फायदा उठवू शकलेला नाही. कारण सरकारने नुकताच लादलेला ‘विंड फॉल गेन टॅक्स’ बोकांडी बसला आहे. निर्देशांकाच्या २५ टक्के असलेले हे दोन्ही शेअर आपापल्या विवंचनेत आहेत, व त्यात कदाचित लागलीच सुधारणा झाली नाही तर या दोन्ही शेअरचे सावट शेअर बाजारावर पडलेले असेल. खनिज तेलाच्या भावांकडे मागील लेखात लक्ष वेधले होते. ते ९४ डॉलरवरून अधिक वाढले तर हा त्रास चिघळेल.

share market
Share Market: इस्राइल-पॅलेस्टाईन युद्धामुळे 'या' कंपन्यांच्या शेअर्सवर होणार परिणाम

याखेरीज वाढती प्राथमिक समभाग विक्री व बाजाराचे वाढते मूल्यांकन, चार वर्षांतील सर्वाधिक पातळीवर पोहोचलेले स्मॉल व मिड कॅप निर्देशांक, तसेच प्रवर्तकांची वारेमाप विक्री याकडे मागील लेखात लक्ष वेधले होतेच.

अमेरिकेत ‘फेड’ने व्याजदर जैसे थे ठेवले खरे, पण त्याबरोबर सज्जड दमही भरला. व्याजदरवाढ संपली नाही, या कॅलेंडर वर्षात महागाई कमी झाली नाही तर पुन्हा दरवाढ होऊ शकते. ह्या इशाऱ्यामुळे अमेरिकेतील तेजीवाले थंडावले. पुढे सेंटीमेंट निरुत्साही करणारी भर त्यात पडली कॅनडाने उभ्या केलेल्या वादामुळे. पण पाश्‍चात्त्य देशांना भारतीय बाजारपेठ व वाढत्या अर्थव्यवस्थेचे आकर्षण असल्यामुळे हे वादळ पेल्यातच शमेल, असे दिसते.

अशा वेळी नफा खिशात टाकला असेल तर काहीच न करणे फायद्याचे. पुढे सप्टेंबर तिमाहीचे निकाल आहेत. आयटी क्षेत्र अपेक्षेने वर जात आहे. संपूर्ण बाजारात आजतरी तो एक आशेचा किरण आहे. सप्टेंबरचे निकाल अपेक्षेपेक्षा अधिक चांगले आल्यास त्यातील तेजी टिकून राहावी. औषध उद्योगातदेखील माफक विक्री झाली आहे. ती पचवून पुन्हा नव्याने खरेदीची तयारी करता येईल. ऑरो फार्मा, ग्लेनमार्क, लुपिन, डॉ. रेड्डी आपल्या रडारवर हवेत.

तसेच सार्वजनिक बँकांनी गेल्या सप्ताहातील मंदीतून स्वतःला वेगळे ठेवले आहे. त्यातील बडोदा बँक, बँक ऑफ इंडिया, युनियन बँकसारख्या शेअरमध्ये अजूनही ‘जान’ आहे. उधळलेल्या लहान बँकांना निरोप दिलेला बरा. मात्र खासगी छोट्या बँका अजूनही नजरेसमोर ठेवता येतील. त्यात करुर वैश्य बँक, सिएसबी, फेडरल बँक समाविष्ट करता येतील.

त्याचबरोबर सणासुदीचे दिवस असल्यामुळे वाहन उद्योगाच्या कामगिरीकडे बाजाराचे लक्ष असेल. आपले लाडके सर्वच समभाग यात येतील. त्यात प्रामुख्याने नजर ठेवावी मारुतीकडे. आजचा वाढलेला भाव जरी नाउमेद करत असला तरी दहा हजार रुपयांच्या जवळ हा शेअर नक्की निवेशनीय आहे.

तसाच सहाशे रुपयांच्या आसपास टाटा मोटर आकर्षक वाटतो. धातू उद्योगातील टाटा स्टील, जे एस डब्ल्यू व जिंदाल स्टेनलेस उच्चांकापासून नरमले आहेत. स्टील उद्योगात असलेला पण बांधकाम क्षेत्र ग्राहक वर्गात असलेला एपीएल अपोलो ट्यूब ₹ १८००च्या उच्चांकानंतर एका प्रवर्तकाने केलेल्या विक्रीमुळे ₹ १५४० पर्यंत खाली आला आहे. दबा धरून तीही शिकार करता येईल.

साखर उद्योग तेजीत आहेच. बलरामपुर चीनी, धामपूर शुगर व इतरही शेअर थोडासा विसावा घेत आपली चाल पुढे नेत आहेत. जोखीम क्षमता असलेल्या गुंतवणूकदारांनी त्यातील डार्क हॉर्स म्हणून गणले गेलेले रेणुका शुगर व बजाज हिंद स्टॉप लॉस ठेवून जवळ बाळगायला हरकत नाही.

share market
Share Market Today: शेअर बाजारात कमाईची सुवर्णसंधी! 'या' शेअर्समधील गुंतवणूक ठरेल फायदेशीर

मागील सप्ताहातील महत्त्वाची घटना म्हणजे जे पी मॉर्गनच्या विकसनशील देशातील सरकारी बॉण्डच्या इंडेक्समध्ये भारताचा समावेश. ह्यासाठी गेले दहा वर्ष केलेला मुत्सद्दीपणा व अट्टाहास कमी आला. आज आपले पत निर्धारण कमी आहे.

‘ट्रिपल बी’वरून जर ‘ए’ रेटिंगकडे झेप मारता आली तर प्रचंड मोठा जागतिक भांडवल ओघ भारतात येईल. त्यातून आपले चलन सुधारेल. अनेकदा पुनरुक्ती केलेली स्थिती येऊ शकते. ती म्हणजे गुंतवणूक करताना रुपया नीचतम स्थरावर असणे व गुंतवणुकीनंतर तो मजबूत होत जाणे. हे परदेशी संस्थांना आवडते.

तात्पर्य असे की काही दिवस संयमाचे आहेत. आता निवडणूक येईल, गुंतवणुकीतून पूर्ण मोकळे होऊ असा ग्रह करण्यापेक्षा आलेल्या संधीचा अधिकाधिक फायदा करून घेणे हे उद्दिष्ट ठेवले पाहिजे. जादूगार रघुवीर यांच्या प्रयोगांतल्या घागरीसारखी आपल्या शेअर बाजाराची घागरही पुन्हा पुन्हा भरत राहील, हे ध्यानी असू द्यावे!

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही, हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

share market
Penny Stocks : जादा नफ्याच्या मृगजळामागं धावणं नकोच!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.