म्युच्युअल फंडांच्या भाषेत ‘एनएफओ’ हा शब्द ‘न्यू फंड ऑफर’चे लघुरूप आहे. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी (एएमसी) म्हणजेच म्युच्यअल फंड कंपनी नव्या योजनेची किंवा फंडाची ऑफर घेऊन येत असते. अशी योजना विशिष्ट परिस्थिती (स्पेशल सिच्युएशन) किंवा विशिष्ट उद्योग क्षेत्रात (मॅन्युफॅक्चरिंग, बँकिंग) गुंतवणूकदारांना पैसे गुंतविण्याची सुविधा देते. गुंतवणूकदारांना अशा नव्या फंडाचे आकर्षण असते. कारण १० रुपये दर्शनी िकमतीचे युनिट १० रुपयाला मिळते. ‘एनएफओ’ कितीही आकर्षक वाटला, तरीही गुंतवणूकदारांनी त्यांचे पैसे गुंतविण्यापूर्वी सावध असायला हवे. ‘एएमसी’साठी व्यवस्थापन शुल्क (अॅसेट मॅनेजमेंट फी) हा उत्पनाचा मोठा स्रोत असतो. मालमत्ता जितकी अधिक तितके उत्पन्न जास्त असते. आजच्या स्पर्धेच्या युगात मालमत्ता गोळा करण्यासाठी म्युच्युअल फंड कंपन्या ‘एनएफओ’ आणत असतात. गुंतवणूकदाराने कष्टाने कमविलेला पैसा गुंतविण्यापूर्वी ‘एनएफओ’चे विश्लेषण कसे करावे, याबद्दल हे विवेचन.
गुंतवणुकीचा उद्देश महत्त्वाचा!
सर्वांत महत्त्वाचा असतो तो गुंतवणुकीचा उद्देश. ‘एनएफओ’मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्या फंडाच्या गुंतवणुकीचा उद्देश, उद्दिष्ट जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. ‘एनएफओ’चा उद्देश तुम्हाला तो फंड कोठे गुंतवणूक करणार, हे समजून घेण्यास मदत करेल; तसेच गुंतवणुकीच्या परिघात येणाऱ्या कंपन्या, रोखे, मार्केट कॅपनुसार त्या कंपन्यांचे प्रमाण, एक्झिट लोड आदी महत्त्वाच्या घटकांचीही माहिती देईल. दुसरा एक महत्त्वाचा घटक म्हणजे फंड मॅनेजरची कामगिरी. फंड मॅनेजरचा अनुभव व फंड व्यवस्थापित करण्याचा इतिहास महत्त्वाचा असतो. यशस्वी फंडांचा इतिहास असलेला अनुभवी फंड व्यवस्थापक ‘एनएफओ’च्या संभाव्य यशाचा सूचक घटक असू शकतो. उदा. एखाद्या फंड व्यवस्थापकाकडील फंड गट सरासरी व निर्देशांकापेक्षा जास्त परतावा देत असेल, तर ‘एनएफओ’मध्ये गुंतवणूक करण्यासाठी ती सकारात्मक गोष्ट असू शकते. ‘एनएफओ’ किती चांगली कामगिरी करू शकेल, हे निर्धारित करण्यासाठी व्यवस्थापन चमू एक महत्त्वपूर्ण घटक आहे. व्यवस्थापन चमूचा अनुभव चांगला परतावा मिळवून देईल. काही ‘एनएफओ’ नावीन्यपूर्ण क्षेत्रात गुंतवणुकीची संधी देतात. उदा. अॅक्सिस म्युच्युअल फंडाने मॅन्युफॅक्चरिंग फंड सर्वांत आधी डिसेंबर २०२३ मध्ये आणला किंवा टाटा म्युच्युअल फंडाचा ‘टाटा निफ्टी इंडिया टुरिझम इंडेक्स फंड’ जो नुकताच बंद झाला. हे दोन्ही फंड येण्यापूर्वी अशा गुंतवणूकसंधी उपलब्ध नव्हत्या.
गुंतवणूक करण्यापूर्वी....
काही वेळा ‘एनएफओ’ उत्तम परताव्याची संधी देऊ शकतात. यातील गुंतवणुकीचा एक प्राथमिक फायदा म्हणजे परतावा मिळण्याची क्षमता. गुंतवणूकदारांना फंडाच्या वाढीच्या सुरुवातीच्या टप्प्याचा फायदा होऊ शकतो. त्यांना पोर्टफोलिओमध्ये वैविध्य आणण्याची संधी ‘एनएफओ’मुळे मिळते. गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी फंड व्यवस्थापकाचे सखोल संशोधन करणे, गुंतवणूकधोरण समजून घेणे, बाजारातील परिस्थितीचे विश्लेषण करणे आणि खर्चाच्या गुणोत्तरांची तुलना करणे आवश्यक आहे. त्यामुळे, सरसकट ‘एनएफओ’मध्ये गुंतवणूक करूच नये, असे टोकाचे विधान करणे योग्य ठरत नाही. ‘एनएफओ’तील गुंतवणुकीचा निर्णय गुंतवणूकदाराची जोखीम क्षमता आणि परिस्थितीसापेक्ष असतो. त्यामुळे ‘एनएफओ’त गुंतवणूक करण्याचा निर्णय त्या त्या व्यक्तीने अभ्यास करून किंवा अनुभवी सल्लागाराच्या मदतीने घेणे हिताचे ठरते.
(डिस्क्लेमरः म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.