सुवर्णरोखे खरेदीची संधी

रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबर २०१५ मध्ये सार्वभौम सुवर्णरोखे (सॉव्हरिन गोल्ड बॉंड -एसजीबी) योजना कार्यन्वित केली.
sovereign gold bond investment option rbi finance
sovereign gold bond investment option rbi financesakal
Updated on

रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबर २०१५ मध्ये सार्वभौम सुवर्णरोखे (सॉव्हरिन गोल्ड बॉंड -एसजीबी) योजना कार्यन्वित केली. नोव्हेंबर २०१५ पासून आतापर्यंत वेळोवेळी हे रोखे बाजारात विक्रीसाठी दाखल करण्यात आले आहेत.

नोव्हेंबर २०१५ मध्ये पहिल्यांदा बाजारात आणलेल्या रोख्यांचा आठ वर्षांचा कालावधी ३० नोव्हेंबर २०२३ रोजी संपला असून, गुंतवणूकदारांना यातून १२.९ टक्के इतका परतावा मिळाला आहे. (यात सहामाहीत मिळालेल्या २.७५ टक्के व्याजाचा समावेश आहे.)

विशेष म्हणजे याच कालावधीत ‘निफ्टी ५० इंडेक्स’मधील गुंतवणुकीतून १३.८२ टक्के इतका परतावा मिळाला आहे. थोडक्यात, बँक, पोस्ट, पीपीएफ, सुकन्या समृद्धी, सरकारी कर्जरोखे यातून मिळणाऱ्या परताव्यापेक्षा (७ ते ८.४ टक्के) या रोख्यांचा परतावा चांगला मिळाला आहे.

नवी योजना दाखल

आता १८ ते २२ डिसेंबर २०२३ या काळात नवे सुवर्णरोखे विक्रीसाठी उपलब्ध होत आहेत. पारंपरिक पद्धतीने सराफांकडून सोने खरेदी करण्यापेक्षा ईटीएफ, गोल्ड म्युच्युअल फंड व सुवर्णरोखे योजना असे अन्य सुरक्षित पर्याय आता उपलब्ध आहेत.

योजनेची वैशिष्ट्ये

सॉव्हरिन गोल्ड बॉंड अर्थात सार्वभौम सुवर्णरोखे ही केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेद्वारे इश्यू केलेली सिक्युरिटी असून, एक युनिट म्हणजे एक ग्रॅम सोने असे यात परिमाण वापरले जाते. उदा. सध्या सोन्याचा भाव प्रति ग्रॅम ६,३०० रुपये इतका आहे.

आपण या योजनेत ६३,००० रुपये गुंतविले, तर आपल्या नावावर १० ग्रॅम सोने म्हणजे सोन्याचे १० युनिट जमा केले जातील. या रोख्यांचा कालावधी आठ वर्षे आहे. मुदतीनंतर आपण रोखे घेताना जितके युनिट घेतले आहेत तेवढ्या युनिटची त्यावेळच्या सोन्याच्या बाजारात असलेल्या किमतीनुसार येणारी रक्कम आपल्या खात्यात जमा केली जाते.

याशिवाय आपण सुरवातीला जी रक्कम गुंतविली असेल त्यावर २.५ टक्के दराने (वार्षिक) व्याज दिले जाते. हे व्याज सहामाही पद्धतीने दिले जाते. मुदतीनंतर मिळणाऱ्या रकमेत शेवटच्या सहामाहीचे व्याज जमा केले जाते. पाच वर्षांनंतर गरज असल्यास मुदतीआधी हे रोखे विकता येतात.

हे रोखे आपण भेट म्हणून देता येतात किंवा हस्तांतरही करता येतात. यामध्ये निवासी भारतीय, एचयूएफ, ट्रस्ट गुंतवणूक करू शकतात. अनिवासी भारतीयास गुंतवणूक करता येत नाही. मात्र, गुंतवणूक करताना संबंधित व्यक्ती निवासी भारतीय असेल आणि त्यानंतर अनिवासी झाली असेल, तर मुदतीपर्यंत गुंतवणूक ठेवता येते.

यात वैयक्तिक तसेच एचयूएफ गुंतवणूकदारांना किमान एक ग्रॅम व त्या पटीत व कमाल चार किलो गुंतवणूक करता येते, तर ट्रस्ट किंवा तत्सम गुंतवणूकदारांना किमान एक ग्रॅम व कमाल २० किलो गुंतवणूक करता येते.

संयुक्त नावाने किंवा अज्ञान मुलांच्या नावानेसुद्धा गुंतवणूक करता येते. सरकारी बँका, काही खासगी बँका, पोस्ट ऑफिस, स्टॉक होल्डिंग कार्पोरेशन, एनएसई व बीएसई या दोन्हीही शेअर बाजारांत गुंतवणूक करता येते. या बहुतेक सर्व ठिकाणी ऑनलाइन पद्धतीनेही गुंतवणूक करता येते.

ऑनलाइन पद्धतीने गुंतवणूक केल्यास प्रति ग्रॅम ५० रुपये सूट दिली जाते. फक्त वीस हजार रुपयांपर्यंतची रक्कम रोखीने भरता येते. त्यापुढील रक्कम धनादेश, एनईएफटी, आरटीजीएस, यूपीआय पद्धतीने भरता येते.

गुंतवणूकदारास ‘सर्टिफीफिकेट ऑफ होल्डिंग’ दिले जाते. डी-मॅट पद्धतीनेही यात गुंतवणूक करता येते. डी-मॅट पद्धतीने घेतल्यास व्यवहार करता येतात. या योजनेसाठी नामनिर्देशनाची सुविधा आहे.

नवे रोखे येण्याआधी रिझर्व्ह बँक सोन्याचा भाव जाहीर करते. याच दराने सुरवातीच्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत युनिट दिले जातात. इंडिया बुलियन व ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए) यांनी ठरविलेला ९९९ शुद्धतेचा सोन्याचा भाव यासाठी विचारात घेतला जातो.

यावर मिळणारे व्याज करपात्र असते. मात्र, ‘टीडीएस’ केला जात नाही. तसेच मुदतीनंतर मिळणाऱ्या रकमेवर भांडवली नफा द्यावा लागत नाही. मात्र, एक वर्षानंतर व मुदतीच्या आत रोखे मोडल्यास व इंडेक्सेशननुसार कर भरावा लागतो.

गुंतवणुकीचे फायदे

  • गुंतवणुकीवर व्याज मिळते.

  • चोरीची भीती नाही.

  • लॉकरचे भाडे भरण्याची गरज नाही.

  • सोन्याच्या शुद्धतेबद्दल काळजी नाही.

  • घडणावळ, सोने विक्री करताना होणारी घट असे नुकसान नाही.

  • सोन्याचा वाढत्या भावाचा लाभ

  • कर्ज मिळण्याची सोय

सुवर्णरोखे योजना मालिका तीन

  • रोखे खरेदीचा कालावधी - १८ ते २२ डिसेंबर २०२३

  • प्रति ग्रॅम किंमत - ६,१९९ रुपये

  • ऑनलाइन खरेदी प्रति ग्रॅम किंमत - ६,१४९ रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.