मुंबई : टाटा समूहाने २८.६ अब्ज डॉलरच्या ब्रँड मूल्यासह यंदा सलग १५ व्या वर्षी देशातील सर्वांत मौल्यवान ब्रँड ठरण्याचा मान पटकावला आहे. ब्रँड फायनान्सने सर्वाधिक मूल्यांच्या ब्रँडची यादी जाहीर केली आहे. ब्रँड फायनान्सच्या अहवालानुसार, टाटा समूहाच्या ब्रँड मूल्यात यंदा २०२३ च्या तुलनेत नऊ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदा प्रथमच एक भारतीय ब्रँड ३० अब्ज डॉलर ब्रँड मूल्याच्या उच्चांकाजवळ पोहोचला आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.
ब्रँड व्हॅल्यूमध्ये लक्षणीय वाढ दर्शविणाऱ्या इतर भारतीय ब्रँडमध्ये इन्फोसिसचा समावेश आहे. माहिती तंत्रज्ञान सेवा क्षेत्रात जागतिक मंदी असूनही स्थिर नऊ टक्के वाढ दर्शवून १४.२ अब्ज डॉलर मूल्यासह इन्फोसिसने देशातील दुसरा सर्वांत मौल्यवान ब्रँड म्हणून आपले स्थान कायम ठेवले आहे. एचडीएफसी लि.मध्ये विलीन झाल्यानंतर, एचडीएफसी समूहाने १०.४ अब्ज डॉलर ब्रँड मूल्यासह तिसरे स्थान पटकावले आहे.
टाटा समूहाच्या ब्रँडचे महत्त्व वाढले आहे. इंडियन प्रीमियर लीगचे प्रायोजकत्व, विमानक्षेत्रातील ब्रँडची पुनर्बांधणी, वेस्टसाइड आणि टाटा कन्झ्युमर उत्पादनातील भरभराट यामुळे टाटा समूहाच्या पाऊलखुणा विस्तारल्या आहेत. टाटा समूहाच्या ताज हॉटेलचे मुल्यांकन ५४.५ कोटी डॉलर असून प्रभावी ब्रँड इंडेक्समध्ये १०० पैकी ९२.९ गुण व एएए प्लस मानांकनासह टाटा समूहाने भारतातील सर्वांत मजबूत ब्रँड म्हणून स्थान मिळवले आहे, असे ब्रँड फायनान्सचे वरिष्ठ संचालक सॅवियो डिसोझा यांनी सांगितले.
ब्रँड फायनान्सने मार्केटिंगमधील गुंतवणूक, निष्ठा, कर्मचाऱ्यांचे समाधान आणि कॉर्पोरेट प्रतिष्ठा यांसारख्या घटकांवर आधारित मूल्यांकन केले आहे. हे घटक कमाईच्या अंदाजांसह ब्रँड मूल्य निर्धारित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. या अहवालानुसार, भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या ब्रँडच्या यादीत १२२ टक्के मूल्य वाढीसह टाटा समूहाच्याच वेस्टसाइड या ब्रँडने अव्वल स्थान पटकावले आहे. त्यानंतर ८६ टक्के वाढीसह मदरसन आणि ८३ टक्के वाढीसह सोनाटा सॉफ्टवेअरने अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान मिळवले आहे.
उद्योग क्षेत्राच्या क्रमवारीत दूरसंचार क्षेत्राने ब्रँड मूल्यामध्ये ६१ टक्के वाढ प्राप्त केली आहे, तर बँकिंग क्षेत्राने २६ टक्के वाढ नोंदवली आहे. इंडियन बँक, इंडसइंड बँक आणि युनियन बँक या आघाडीवर असलेल्या बँकिंग ब्रँडनी ब्रँड व्हॅल्यूमध्ये दोन अंकी वाढ नोंदवली आहे. महिंद्रा आणि महिंद्रा ३.४ अब्ज डॉलर ब्रँड मूल्यासह वाहनक्षेत्रातील ब्रँडमध्ये आघाडीवर आहे. लार्सन अँड टुब्रो ५.२ अब्ज डॉलर मूल्यासह अभियांत्रिकी क्षेत्रात अव्वल स्थानावर आहे, तर अमूल हा ब्रँड ११ टक्के वाढीसह ३.३ अब्ज डॉलर मूल्यासह भारतीय खाद्यक्षेत्रातील अव्वल ब्रँड ठरला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.