Lek Ladki Yojana :‘लेक लाडकी’, ‘सखी’ कागदावरच! ; एकही लाभार्थी अथवा वसतिगृहही नाही

‘लेक लाडकी’ या योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नोव्हेंबर २०२३ मध्ये सुरुवात करून पाच मुलींना प्रातिनिधिक स्वरूपात योजनेत सहभागी करून घेतले गेले, त्यानंतर मात्र ही योजना कागदावरच राहिली आहे.
Lek Ladki Yojana
Lek Ladki Yojanasakal
Updated on

मुंबई : ‘लेक लाडकी’ या योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नोव्हेंबर २०२३ मध्ये सुरुवात करून पाच मुलींना प्रातिनिधिक स्वरूपात योजनेत सहभागी करून घेतले गेले, त्यानंतर मात्र ही योजना कागदावरच राहिली आहे. तब्बल १०० कोटी प्रस्तावित असणाऱ्या या योजनेसाठी दोन दिवसांपूर्वी २० कोटी रुपये मंजूर करून निधी वितरीत करण्यात आले असले तरी या योजनेची एकही लाडकी लाभार्थी प्रत्यक्षात नाही. तसेच नोकरदार महिलांसाठी किमान एक महिला वसतिगृह सुरू करण्याची ‘वन स्टॅाप सेंटर’ सखी योजनाही प्रतिसादच मिळत नसल्याने कागदावरच असून या योजनेंतर्गत एकही महिला वसतिगृह उभे राहिलेले नाही.

वर्षभरापूर्वी उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पातील योजनेमध्ये सर्वात आकर्षक असणाऱ्या योजनेमध्ये लेक लाडकी आणि सखी योजनेला प्रतिसादच मिळत नसल्याचे चित्र आहे. महिला व बालकल्याण विभागातर्फे या दोन्ही योजना राबविण्यात येतात. एप्रिल २०२३ मध्ये जाहीर झालेल्या लेक लाडकी या योजनेची प्रत्यक्षात अंमलबजावणी नोव्हेंबर २०२३ मध्ये झाली, तीही प्रातिनिधीक स्वरुपात. प्रत्यक्षात अद्याप ही योजना अर्ज स्वीकारण्याच्या पातळीपर्यंतच पोहोचली आहे. महिला व बालकल्याण एकात्मिक विभागाच्या उपायुक्त संगीता लोंढे यांनी यापुढच्या काळात या योजनेला गती मिळेल असा दावा केला. अंगणवाडी सेविकांचा संप दीर्घ काळ चालला, त्यामुळे अर्ज स्वीकारले जात नव्हते. लेक लाडकी हे वेबपोर्टलही लवकरच सुरू होईल. मागील एक महिन्यात या योजनेसाठी २० हजार अर्ज आले असल्याचे त्या म्हणाल्या.

एक एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या जन्मलेल्या मुलींना टप्प्याटप्प्याने एक लाख एक हजार रुपये देणारी ही योजना आहे. राज्य सरकारने आधीची ‘सुकन्या’ व नंतरची ‘भाग्यश्री’ या योजना बंद करून ''लेक लाडकी’ ही योजना सुरू केली. सुकन्या योजनेतून २० हजार लाभार्थींना तर भाग्यश्री योजनेतून वर्षाला पाच हजारच्या आसपासच मुलींना लाभ मिळत असे. कारण क्लिष्‍ट अटींमुळे या योजनांसाठी फारसे अर्जच येत नव्हते. या दोन्ही योजनांच्या लाभार्थ्यांना त्यांचे लाभ देऊन एक एप्रिल २०२३ पासून लेक लाडकी योजनेचे लाभ दिले जाणार आहेत.

Lek Ladki Yojana
Byju Trouble : रवींद्रन बायजूंच्याविरुद्ध भागधारकांचे मतदान ; मतदान अवैध असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे

नोकरदार महिलांच्या अडचणी आणि गरजा लक्षात न घेता सुरू करण्यात आलेल्या या योजनेला राज्यात अल्प प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे मुंबईमध्ये नोकरदार महिला मोठ्या प्रमाणात असूनही व वसतिगृहांची गरज असूनही वसतिगृहांसाठी संस्था पुढे येताना दिसत नसल्याने ही योजनाही अद्याप कागदावरच आहे. महिला व बालकल्याण विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी सखी योजनेसाठी पुन्हा जाहिरात काढणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच संस्था चालकांच्या अडचणी काय आहेत? ते समजून घेऊन योजना प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लेक लाडकी योजनेत काय?

लेक लाडकी योजनेत महाराष्ट्रात मुलगी जन्माला आल्यावर तिच्या कुटुंबाला पाच हजार रुपये दिले जातात. एवढेच नाही तर मुलगी पहिल्या वर्गात पोहोचल्यावर कुटुंबाला सहा हजार रुपये दिले जाणार आहेत. यानंतर ती सहाव्या वर्गात पोहोचल्यावर कुटुंबाला सात हजार रुपये मिळतील. यानंतर मुलगी अकरावीत पोहोचल्यावर तिला आठ हजार रुपये मिळतील. मुलगी १८ वर्षांची झाल्यावर ७५ हजार रुपये कुटुंबाला दिले जातील. अशा प्रकारे, मुलीच्या जन्मापासून ती सज्ञान होईपर्यंत कुटुंबाला एक लाख एक हजार रुपये दिले जाणार आहेत.

गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. ज्यांच्याकडे पिवळी किंवा केशरी शिधापत्रिका आहे, ज्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नाही आणि १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींना योजनेचा लाभ मिळेल. कोणाच्या घरी जुळ्या मुलीचा जन्म झाला तर त्याचा फायदा दोन्ही मुलींना होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.