परकी चलन व्यवहाराचे अनधिकृत प्लॅटफॉर्म

परकी चलनाचा व्यापार करणाऱ्या अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या जाहिराती यूट्यूब आणि इतर समाजमाध्यमांवर सतत झळकत असतात.
to find authorized forex dealer trade investment earning making profit
to find authorized forex dealer trade investment earning making profit Sakal
Updated on

- डॉ. अपूर्वा जोशी | अमित रेठरेकर

परकी चलनाचा व्यापार करणाऱ्या अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या जाहिराती यूट्यूब आणि इतर समाजमाध्यमांवर सतत झळकत असतात. आपल्या स्क्रिनवरही अशा अनेक जाहिराती पॉप-अप होताना दिसून येतात.

यातील अनेक प्लॅटफॉर्म अनधिकृत असतात. ते अनेकपट फायदा देण्याचे आमिष दाखवून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात. असे प्लॅटफॉर्म देशात बेकायदा कार्यरत असून, अनेक घोटाळ्यांमध्येदेखील त्यांचा समावेश आहे. अशा बनावट प्लॅटफॉर्मवरील आकर्षक जाहिरातींना भुलून अनेकांचे मोठे आर्थिक

नुकसान झाले आहे. याची दखल घेत सरकारने कठोर पावले उचलली आहेत. अलीकडेच टीपी ग्लोबल एफएक्स परकी चलन व्यापार घोटाळ्यात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारवाई करून संबंधित म्होरक्यांना जेरबंद केले व विविध बँकांमधील त्यांची १२० कोटी रुपयांहून अधिक रक्कम गोठविली आहे.

परकी चलन व्यापार

परकी चलन व्यापार हा देशातील एक नियंत्रित आणि वैध उपक्रम आहे. परकी चलन व्यापार म्हणजे, वेगवेगळ्या चलनांची खरेदी-विक्री. अमेरिकी डॉलर आणि भारतीय रुपया किंवा युरो आणि भारतीय रुपया यांसारख्या चलन जोड्यांच्या किंमतीतील हालचालींवर अंदाज बांधणे आणि फायदा कमावणे अशी या व्यापाराची कार्यपद्धती असते.

त्यासाठी इलेक्ट्रॉनिक प्रणालीवर आधारित ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो. परकी चलन व्यापार भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे नियंत्रित केला जातो. परकी चलन व्यवस्थापन कायद्याअंतर्गत (फेमा-FEMA) या व्यवहारांचे नियंत्रण केले जाते. भारतातील परकी चलन व्यापारात सहभागी होण्यासाठी, या नियमांचे पालन करणाऱ्या अधिकृत परकी चलन दलालांसोबतच (Authorized Forex Dealer) काम करणे आवश्यक आहे. याची यादी रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अनधिकृत ट्रेडिंग प्लॅटफॉर्म

भारत सरकारने बोगस, अनधिकृत परकी चलन प्लॅटफॉर्मचा मागोवा घेऊन सप्टेंबर २०२२ मध्ये अशा बेकायदा प्लॅटफॉर्मची एक ‘ॲलर्ट लिस्ट’ प्रकाशित केली. त्यात ७५ कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्या बेकायदा परकी चलन व्यापार करत असून, त्यांच्याशी व्यवहार करू नका, असा सावधगिरीचा इशारा रिझर्व्ह बँकेने दिलेला आहे.

मात्र, आता वर्ष उलटून गेले, तरी अशा बोगस प्लॅटफॉर्मद्वारे फसवणूक होत असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. यातील काही बोगस प्लॅटफॉर्म, तर केवळ लोकांकडून पैसे उकळण्यासाठी तयार करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

सारांश

परकी चलनाचा व्यापार करणारे व्यावसायिक जागतिक आर्थिक स्थिती, राजकीय परिस्थिती यांसह विविध बाबींची जोखीम पत्करून हा व्यापार करतात; परंतु, बोगस परकी चलन ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचे उद्दिष्ट केवळ लोकांची फसवणूक करून पैसे मिळविण्याचा असतो.

नवखे गुंतवणूकदार अगदी सहजपणे अशा प्लॅटफॉर्मच्या जाळ्यात अडकू शकतात. त्यामुळे अशा धोक्यापासून वाचण्यासाठी जागरूक राहणे अतिशय महत्त्वाचे आहे. अशा अवैध प्लॅटफॉर्ममुळे आपल्या व्यवहारांची गोपनीय माहिती उघड होण्याची शक्यता निर्माण होते. ‘फेमा’ कायद्याचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागते.

त्यामुळे असे प्लॅटफॉर्म अधिकृत आणि नियंत्रित आहेत याची खात्री करूनच व्यवहार करणे योग्य ठरेल. फसवणूक होण्याचे प्रथमदर्शनी चिन्ह म्हणजे अशा प्लॅटफॉर्मनी केलेले अविश्वसनीय परतावा देण्याचे दावे व कोणत्याही कारणासाठी केलेली पैशाची मागणी.

त्यामुळे अशी मागणी होत असल्यास फसवणुकीचा धोका ओळखून वेळीच सावध व्हावे. त्यातूनही फसवणूक झालीच, तर सायबर दोस्त https://cybercrime.gov.in या संकेतस्थळावर किंवा १९३० या टोल-फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी.

प्लॅटफॉर्म शोधण्यासाठी

  • संबंधित प्लॅटफॉर्मला रिझर्व्ह बँकेची परवानगी आहे का?

  • ‘फेमा’, ‘सेबी’सारख्या नियामकांचे पालन प्लॅटफॉर्म करतो का ?

  • प्लॅटफॉर्म ‘एसएसएल’ एन्क्रिप्शन आणि सुरक्षित पेमेंट गेटवे अवलंबतो का?

  • मनी लॉंडरिंग आणि अनधिकृत व्यापार रोखण्यासाठी ग्राहकांची (केवायसी) योग्य पडताळणी होते का?

  • ग्राहकांचे प्रश्न सोडविण्यासाठी योग्य यंत्रणा उपलब्ध आहे का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.