संसदेत नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, बँकांकडे रु. ४२,२७० हजार कोटी इतक्या ठेवी विनादावा (अनक्लेम्ड) स्वरुपात आहेत व मागील वर्षीपेक्षा यात २८ टक्के वाढ झाली आहे. यातील सुमारे ८५ टक्के ठेवी राष्ट्रीयीकृत बँकांत असून, उर्वरित १५ टक्के अन्य बँकांत आहेत. यासाठी आधी आपण विनादावा (अनक्लेम्ड) ठेवी म्हणजे काय, हे समजून घेऊ.
रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, जेव्हा खातेदाराच्या बचत खात्यात (सेव्हिंग अकाउंट) अथवा चालू खात्यात (करंट अकाउंट) सलग १० वर्षे व्यवहार झाला नसेल; तसेच मुदत ठेवीची मुदत संपल्याच्या तारखेपासून १० वर्षे त्या मुदत ठेवीची रक्कम बँकेत पडून असेल, तर अशी ठेवखाती ‘अनक्लेम्ड’ समजली जातात. अशा अनक्लेम्ड ठेवी डीपॉझिटर एज्युकेशन अँड अवेअरनेस फंडाकडे संबंधित बँकेकडून वर्ग (ट्रान्स्फर) केल्या जातात.
ठेवखाते ‘अनक्लेम्ड’ राहण्याचे प्रमुख कारण म्हणजे ठेवीदाराने अशा खात्यांची माहिती आपल्या पती-पत्नी/मुले किंवा जवळचे नातेवाईक यांना दिलेली नसते किंवा आपल्या पश्चात ती सहजगत्या उपलब्ध होईल असी तजवीज केलेली नसते.
परिणामी, अशा ठेवीदाराच्या मृत्यूनंतर अशा ठेवींची माहिती कोणासही नसल्याने या ठेवींवर वारसांकडून दावा केला जात नाही व अशा ठेवी ‘अनक्लेम्ड’ होऊन जातात. मात्र, या समस्येवर मात करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने पुढाकार घेऊन उद्गगम पोर्टल सुरू केले आहे.
यामुळे ‘अनक्लेम्ड’ ठेवींबाबतची माहिती वारसास मिळू शकेल; जेणेकरून खाते तबदिलीची (अकाउंट ट्रान्समिशन) आवश्यक ती पूर्तता करून वारस अशा ठेवीचा क्लेम मिळवू शकेल. उद्गगम पोर्टल म्हणजे ‘अनक्लेम्ड डीपॉझिट गेटवे तू अॅक्सेस इन्फर्मेशन’ (UDGAM).
सध्या सर्व राष्ट्रीयीकृत बँका व अन्य मोठ्या खासगी बँका अशा एकूण ३० बँकांमधील अनक्लेम्ड ठेवींचा तपशील या पोर्टलवर मिळू शकतो. थोडक्यात जर आपल्याला आपल्या कोण्या नातेवाइकाच्या
अनक्लेम्ड ठेवी आहेत, असा कयास असेल, तर या उद्गगम पोर्टलचा वापर करून अशा ठेवींचा तपशील मिळविता येईल. हे तपशील मिळाल्यावर, आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून ठेवीचा क्लेम मिळविता येईल. या दृष्टिकोनातून रिझर्व्ह बँकेचे हे निश्चितच स्वागतार्ह पाऊल आहे.
https://udgam.rbi.org.in/unclaimed-deposits/#/login या वेबसाईटवर जाऊन आपला मोबाईल नंबर, नाव टाकून रजिस्ट्रेशन करावे.
पासवर्ड सेट करून स्क्रीनवर असेला कॅपचा टाकावा.
चेक बॉक्सवर टिक करून नेक्स्टवर क्लिक करावे व मोबाईलवर आलेला ओटीपी टाकावा.
यानंतर ज्याच्या अनक्लेम्ड डिपॉझिटबाबतची माहिती हवी असेल, त्याचे नाव व त्याचा पॅन/आधार/व्होटर आयडी/पासपोर्ट नंबर यापैकी कोणताही एक तपशील भरावा व बँकेचे नाव टाकावे.
सर्च ऑप्शनवर क्लिक केले असता, जर त्या बँकेत अनक्लेम्ड ठेवी असतील, तर स्क्रीनवर त्यांचा तपशील दिसेल. अशाच पद्धतीने अन्य बँकांकडेसुद्धा शोध घेता येतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.