UPI Transaction: युनिफाइड पेमेंट इंटरफेस अर्थात ‘यूपीआय’द्वारे होणाऱ्या व्यवहारांनी मूल्यात्मक आणि संख्यात्मक अशा दोन्ही पातळींवर नवे उच्चांक नोंदविले आहेत. डिसेंबरमध्ये ‘यूपीआय’द्वारे १२.०२ अब्ज व्यवहार झाले असून, त्यांचे मूल्य १८.२३ लाख कोटी रुपये आहे.
नोव्हेंबरच्या तुलनेत त्यात अनुक्रमे पाच टक्के आणि सात टक्के वाढ झाली आहे. वर्ष २०२२ च्या तुलनेत २०२३ मधील व्यवहारांचे मूल्य १८३ लाख कोटी रुपये असून, त्यात वार्षिक ५९ टक्के वाढ झाली आहे.
व्यवहारांच्या संख्येच्या तुलनेत ४५ टक्के वाढ झाली असून, २०२३ मध्ये एकूण ११७ अब्ज व्यवहार झाले आहेत. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) आज ही आकडेवारी प्रसिद्ध केली.
नोव्हेंबर २०२३ मध्ये १७.४ लाख कोटी रुपयांचे ११.२४ अब्ज व्यवहार झाले होते. २०२२ मधील याच महिन्याच्या तुलनेत डिसेंबरमध्ये ‘यूपीआय’ व्यवहार ५४ टक्के आणि मूल्यात ४२ टक्के वाढले. ऑक्टोबर २०२३ मध्ये ‘यूपीआय’ व्यवहारांनी ११.४१ अब्जांचा उच्चांक गाठला होता.
वर्ष २०२३ मध्ये ऑगस्ट महिन्यात ‘यूपीआय’ व्यवहारांनी १० अब्ज संख्येचा विक्रमी टप्पा गाठला होता, तर जुलैमध्ये १५ लाख कोटी रुपयांचा मूल्यात्मक पातळीवर उच्चांक नोंदविला होता.
डिसेंबरमध्ये ३४.८ कोटी फास्टटॅग व्यवहार झाले. नोव्हेंबरमधील ३२.१ कोटींच्या तुलनेत त्यात आठ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऑक्टोबरमध्ये ही संख्या सुमारे ३२ कोटी होती.
नोव्हेंबरमधील ५३०३ कोटी रुपयांच्या तुलनेत डिसेंबरमधील व्यवहार मूल्याच्या दृष्टीने ११ टक्क्यांनी वाढून ५८६१ कोटी रुपये झाले. २०२२ मधील त्याच महिन्याच्या तुलनेत डिसेंबरमधील संख्या १३ टक्क्यांनी जास्त आणि मूल्यात १९ टक्क्यांनी जास्त होती.
डिसेंबरमध्ये, आधार सक्षम पेमेंट सिस्टीम (एईपीएस) वरील व्यवहार नोव्हेंबरमधील ११ कोटींवरून १४ टक्क्यांनी कमी होऊन ९.५ कोटी झाले. नोव्हेंबरमधील २९,६४० कोटी रुपयांच्या तुलनेत मूल्य १५ टक्क्यांनी घसरून २५१६२ कोटी रुपये झाले. ऑक्टोबरमध्ये, एईपीएस व्यवहारांची संख्या १० कोटी होती, तर मूल्य २५,९७३ कोटी रुपये होते.
‘आयएमपीएस’ व्यवहारात वाढ
तत्काळ पेमेंट सेवा (आयएमपीएस) व्यवहार डिसेंबरमध्ये सहा टक्क्यांनी वाढून ४९.९० कोटी झाला. नोव्हेंबरमध्ये हे प्रमाण ४७.२ कोटी होते. नोव्हेंबरमधील ५.३५ लाख कोटी रुपयांच्या व्यवहारांच्या तुलनेत डिसेंबरमध्ये सात टक्क्यांनी वाढ होऊन तो ५.७ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.