UTI : यूटीआय ॲसेट मॅनेजमेंट कंपनी (शुक्रवारचा बंद भाव : रु. १००१)

‘यूटीआय ॲसेट मॅनेजमेंट कंपनी’ (यूटीआय एएमसी) ही भारतातील दहा प्रमुख म्युच्युअल फंड कंपन्यांपैकी एक कंपनी आहे.
UTI
UTI Sakal
Updated on

भारतीय म्युच्युअल फंड उद्योग गेल्या अनेक वर्षांपासून, विशेषत: कोविडनंतरच्या काळात सर्वोत्तम टप्प्यांपैकी एक टप्पा अनुभवत आहे. इतर उदयोन्मुख आणि प्रगत राष्ट्रांच्या तुलनेत भारतात गुंतवणुकीच्या दृष्टीने शेअर बाजारात म्युच्युअल फंडांमार्फत होणारे बचतीचे प्रमाण अद्यापही कमी आहे.

यामुळे दीर्घावधीमध्ये फंड मॅनेजमेंट हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वृद्धी दर्शवू शकतो. आगामी काळात डिजिटायझेशन, ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे गुंतवणूक सुलभता, संभाव्य उत्पन्नवाढ आणि बचतीचे आर्थिकीकरण आदी घटक ‘फंड मॅनेजमेंट’ व्यवसायवृद्धीला आणखी जोर देऊ शकतात.

या क्षेत्रातील होत असलेल्या उन्नतीच्या लाभार्थ्यांमध्ये भारतातील प्रमुख म्युच्युअल फंड कंपन्यांसाठी ‘रजिस्ट्रार अँड ट्रान्स्फर एजन्सी’ म्हणून कामकाज करणारी ‘कॅम्स’ ही कंपनी; तसेच म्युच्युअल फंड व्यवस्थापन करणाऱ्या मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या असू शकतात.

‘यूटीआय ॲसेट मॅनेजमेंट कंपनी’ (यूटीआय एएमसी) ही भारतातील दहा प्रमुख म्युच्युअल फंड कंपन्यांपैकी एक कंपनी आहे. म्युच्युअल फंडांव्यतिरिक्त, ही कंपनी पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवा व्यवसायदेखील चालवते, ज्यामध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था (ईपीएफओ); तसेच ‘राष्ट्रीय पेन्शन प्रणाली’ (एनपीएस) कामकाज विभागाचादेखील समावेश आहे.

कंपनीच्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता (एयूएम- ॲसेट अंडर मॅनेजमेंट) १८ लाख कोटी रुपये आहे. कंपनी मार्च २०२४ पर्यंत म्युच्युअल फंडांमध्ये सुमारे दोन लाख ९० हजार ८८१ कोटी रुपयांचे व्यवस्थापन करत आहे, ज्याचा बाजारहिस्सा सुमारे ५.३७ टक्के आहे.

कंपनीकडे मोठ्या प्रमाणात ‘ईटीएफ’ आणि इंडेक्स फंड ‘एयूएम-ॲसेट अंडर मॅनेजमेंट’ आहे. ‘यूटीआय रिटायरमेंट सोल्युशन्स’, ही उपकंपनी, पेन्शन फंडाचे व्यवस्थापन करते. मार्च २०२४ पर्यंत हा विभाग सुमारे तीन लाख कोटी रुपये मालमत्तेचे व्यवस्थापन करत आहे.

सरकार (एनपीएस) ‘राष्ट्रीय पेन्शन प्रणाली’ वर भर देत आहे, ते लक्षात घेता, या विभागामध्ये व्यवसायवृद्धीसाठी मोठी संधी आहे. ‘यूटीआय इंटरनॅशनल’, ही दुसरी उपकंपनी, ऑफशोअर फंडांची व्यवस्थापक आहे. या उपकंपनीकडील व्यवस्थापन मालमत्ता सुमारे २७ हजार ६४५ कोटी रुपये आहे, जी सातत्याने वाढत आहे.

जाहीर झालेल्या निकालानुसार, गेल्या तिमाहीत कंपनीचा महसूल ४१६ कोटी रुपये झाला आहे; तसेच कंपनीचा निव्वळ नफा १८१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मार्च २०२४ पर्यंत वर्षभरात कंपनीचा एकूण निव्वळ नफा ८०२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

तांत्रिक आलेखानुसार, ऑगस्ट २०२१ पासून या कंपनीच्या शेअरने मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार दर्शविले आहेत. आगामी काळात १२१७ रुपये या पातळीच्या वर बंद भाव दिल्यास आलेखानुसारदेखील तेजीचे संकेत मिळू शकतील. आगामी काळातील व्यवसायवृद्धीची शक्यता आणि क्षमता लक्षात घेता, या कंपनीच्या शेअरमध्ये मर्यादित प्रमाणात दीर्घावधीच्या दृष्टीने गुंतवणुकीचा गुंतवणूकदारांनी जरूर विचार करावा.

(डिस्क्लेमर ः या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.