मुंबई - सणासुदीच्या हंगाम आणि नवनवी वाहने दाखल झाल्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत वाहनांची मागणी वाढली असून, सप्टेंबर महिन्यात वाहनविक्रीने विक्रमी उच्चांक नोंदवला आहे. आगामी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांमध्ये दसरा, दिवाळी आदी सण असल्याने विक्री अधिक वाढेल, असा विश्वास वाहनउद्योगाने व्यक्त केला आहे.
होंडा एलिव्हेट, सिट्रोन सी-थ्री एअरक्रॉस, टाटा नेक्सॉन आदी नव्या स्पोर्टस युटिलिटी व्हेईकल (एसयूव्ही) दाखल झाल्यामुळे सप्टेंबरमध्ये प्रवासी वाहनविक्रीला चांगली चालना मिळाली. देशांतर्गत बाजारपेठेत सुमारे तीन लाख ६३ हजार ७३३ वाहनांची विक्री झाली. ही आतापर्यंतची सर्वाधिक मासिक प्रवासी वाहनविक्री आहे. ऑगस्टमध्ये तीन लाख ६० हजार ७०० वाहनांची विक्री झाली होती, तर सप्टेंबर २०२२ मध्ये तीन लाख ५५ हजार ३५३ वाहनांची विक्री झाली होती. वार्षिक पातळीवर विक्रीत २.४ टक्के वाढ झाली आहे.
जुलै-सप्टेंबर दरम्यान, १० लाख ७६ हजार वाहनांची विक्री झाली असून, हा सार्वकालीन उच्चांक आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत २० लाख ७२ हजारांहून अधिक वाहनांची विक्री करत, वाहनविक्रीने प्रथमच २० लाखांचा टप्पा ओलांडला. जानेवारी-सप्टेंबर दरम्यान, प्रवासी वाहन उद्योगाने प्रथमच तीस लाख वाहनविक्रीचा टप्पा ओलांडला आहे.
देशातील सर्वांत मोठी मोटार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने एकूण एक लाख ८१ हजार ३४३ वाहनांची विक्री केली असून, एसयूव्ही विक्रीचा त्यात सर्वाधिक हिस्सा आहे. महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीने सप्टेंबरमध्ये एकूण ७५ हजार ६०४ वाहनांची विक्री केली असून, विक्रीत वार्षिक १७ टक्के वाढ नोंदवली आहे. टाटा मोटर्सने एकूण ८० हजार ६३३ वाहनांची विक्री केली असून, ‘ईव्ही’ विक्रीत वार्षिक ५७ टक्के वाढ नोंदवली आहे.
ह्युंदाईने एका महिन्यातील आतापर्यंतची सर्वोच्च ७१ हजार ६४१ वाहनांची विक्री सप्टेंबरमध्ये केली असून, वार्षिक १३ टक्के वाढ नोंदवली आहे. एसयूव्ही विक्रीचा वाटा वाढत असल्याचे कंपनीचे सीओओ तरुण गर्ग यांनी म्हटले आहे.
देशांतर्गत प्रवासी वाहनविक्री
एकूण विक्री - ३,६३,६७७
मारुती सुझुकी - १,५३,१०६
महिंद्रा - ४१,२६७
टाटा मोटर्स - ३८,७५९
टाटा ईव्ही - ६,०५०
ह्युंदाई - ५४,२४१
टोयोटा किर्लोस्कर - २३,५९०
एमजी मोटर इंडिया - ५,००३
इतर - ४१,७९८
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.