2000 Note : दोन हजाराच्या नोटांचे आता काय?

नोटाबंदीचा ‘ट्रीपल डोस’ आपण सर्वांनी गेल्या ४५ वर्षांत पचवला. प्रथम १९७८ मध्ये एक हजार, पाच हजार आणि दहा हजार रुपयांच्या नोटांवर बंदी
2000 Note
2000 Note sakal
Updated on

नोटाबंदीचा ‘ट्रीपल डोस’ आपण सर्वांनी गेल्या ४५ वर्षांत पचवला. प्रथम १९७८ मध्ये एक हजार, पाच हजार आणि दहा हजार रुपयांच्या नोटांवर बंदी आली होती. त्यानंतर आठ नोव्हेंबर २०१६ रोजी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटांवर बंदी आली. त्यावेळी दोन हजार रुपयांच्या नोटा बाजारात आणल्या, तेव्हा सर्व जण बुचकळ्यात पडले होते.

२०१६ मध्ये अचानक नोटाबंदी आणल्याने व्यवहारात अडचण येऊ नये म्हणून हे पाऊल उचलले होते. नंतर इतर मूल्यांच्या नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई २०१८-१९ मध्ये थांबविण्यात आली. दोन हजार रुपयांच्या बहुसंख्य नोटा मार्च २०१७ पूर्वी जारी करण्यात आल्या होत्या; तसेच दैनंदिन व्यवहारांसाठी त्यांचा वापर होत नसल्याचेही निदर्शनास आले होते.

आता या नोटेचे भवितव्य काय?

वरील बाबी लक्षात घेऊन आणि रिझर्व्ह बँकेच्या ‘क्लीन नोट पॉलिसी’नुसार, दोन हजार रुपये मूल्याच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय १९ मे २०२३ रोजी जाहीर करण्यात आला. हे करत असतानाच या नोटेची कायदेशीर चलन मान्यता कायम आहे, असे वारंवार सांगितले जात होते.

त्यामुळे बॅंकेत या नोटा जमा करण्याची मुदत सात ऑक्टोबर २०२३ ला संपल्यानंतर आता या नोटांचे भवितव्य काय? हा यक्षप्रश्न सर्वांना भेडसावत आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या म्हणण्यानुसार, अद्याप अंदाजे १२ हजार कोटी रुपये मूल्याच्या दोन हजारांच्या नोटा चलनात आहेत.

नोटा बदलण्याची संधी अजूनही आहे...

नागरिकांना त्यांच्याकडील या नोटा बदलण्याची किंवा त्यांच्या मूल्याची रक्कम बँक खात्यात जमा करून घेण्याची संधी आहे. रिझर्व्ह बँकेच्या १९ कार्यालयांत तशी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या कार्यालयांचा पत्ता रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावरून प्राप्त करता येईल. महाराष्ट्रात नवी मुंबई व नागपूर येथे ही कार्यालये आहेत.

नवी मुंबई कार्यालय पत्ता

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी जनरल मॅनेजर, प्लॉट क्रमांक ३, एचएच निर्मला देवी मार्ग, सेक्टर १०, बेलापूर, नवी मुंबई, ४००६१४.

नागपूर कार्यालय पत्ता

भारतीय रिझर्व्ह बँक महाव्यवस्थापक, इश्यू डिपार्टमेंट मेन ऑफिस बिल्डिंग, पोस्ट बॉक्स नंबर १५, सिव्हिल लाइन्स, नागपूर, ४४०००१.

खालील गोष्टींची आवश्यकता

१. एक वैध ओळखपत्र

२. दिलेल्या मुदतीत नोटा का जमा करू शकला नाहीत? याचे सबळ पुरावे असणारे योग्य दस्तऐवज

सादर केलेल्या कागदपत्रांची छाननी करून योग्य खातरजमा करून नोटा बदलून मिळतील. या नोटा जमा करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी रिझर्व्ह बँकेला प्रत्यक्ष भेट देणे आवश्यक आहे असे नाही. व्यक्ती किंवा संस्था पोस्ट विभागाने ठरवून दिलेल्या प्रक्रियेनुसार,पोस्टाद्वारे दोन हजार रुपयांच्या नोटा या १९ कार्यालयांकडे पाठवू शकतात. ही सुविधा पुढील निर्णय येईपर्यंत सुरू राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.