अर्थबोध
किरांग गांधी,अनुभवी आर्थिक मेंटॉर
भारतीय गुंतवणुकदारांमध्ये गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड हा एक लोकप्रिय पर्याय आहे. उच्च परताव्याची शक्यता, वैविध्यीकरण आणि व्यावसायिक व्यवस्थापन यामुळे बहुतांश गुंतवणूकदार म्युच्युअल फंडाला प्राधान्य देतात. मात्र, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक कधी विकायची याबाबत अनेक जण अनभिज्ञ असतात. गुंतवणुकीवरील नफा वाढविण्यासाठी व तोटा कमी करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा असतो.
उच्च ते कमी मूल्यांकन
तुमचा म्युच्युअल फंड कधी विकायचा, हे ठरवण्यासाठी मूल्यांकन हा महत्त्वाचा घटक आहे. ‘प्राइस टू अर्निंग रेशो’चा (P/E) वापर शेअर व म्युच्युअल फंडांचे मूल्यांकन करण्यासाठी केला जातो. ज्या फंडाचे मूल्य जास्त झाले आहे, तो भविष्यात कमी परतावा देणारा आणि जास्त जोखमीचा ठरू शकतो. याउलट, कमी मूल्यांकन असलेले फंड उच्च परतावा देण्याच्या चांगल्या संधी देऊ शकतात. उदा. एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील फंड, जसे की उपभोग क्षेत्र किंवा स्मॉल-कॅप फंडांत लक्षणीय वाढ झाली असेल आणि त्याचे मूल्यांकन उच्च असेल, तर त्याची विक्री करत कमी मूल्यांकन असलेल्या क्षेत्रांमध्ये किंवा फंडाकडे पैसे वळवण्यासाठी ही उत्तम वेळ असू शकते. या धोरणाद्वारे जोखमीचे योग्य व्यवस्थापन करत जास्त परतावा मिळविण्यात मदत होऊ शकते.
व्यवस्थापक वा धोरणबदल
म्युच्युअल फंडाची कामगिरी व्यवस्थापकांच्या कौशल्यावर आणि धोरणावर अवलंबून असते. फंड मॅनेजर किंवा गुंतवणूक धोरणातील बदल त्याच्या कामगिरीवर परिणाम करू शकतात. एखाद्या विशिष्ट व्यवस्थापकाच्या हाताखाली चांगली कामगिरी करणाऱ्या फंडाच्या व्यवस्थापनात बदल झाल्यास, तो पुढे तुमच्या गुंतवणुकीच्या उद्दिष्टांशी जुळवून घेईलच असे नाही. उदा. एखादा फंड कमी जोखमीवरून अधिक आक्रमक धोरणाकडे वळला, तर तो तुम्हाला सोयीस्कर नसलेल्या जोखमीच्या पातळीवर आणू शकतो. अशावेळी त्या फंडाची विक्री करून अनुकूल फंडात गुंतवणूक योग्य ठरते.
पोर्टफोलिओचे संतुलन
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना, आपण सामान्यत: इक्विटी आणि डेट यांच्यातील गुणोत्तर ठरवतो, ज्याला ‘ॲसेट ॲलोकेशन’ म्हणून ओळखले जाते. उदा. तुमच्या पोर्टफोलिओपैकी ६० टक्के इक्विटी फंडात व ४० टक्के गुंतवणूक डेट फंडात करू शकता. शेअर बाजार वाढला व इक्विटी फंड पोर्टफोलिओच्या ८० टक्क्यांपर्यंत वाढले, तर तुमचा मूळ रेशो इक्विटीच्या बाजूने कमी होईल. अशा वेळी गुंतवणूक संतुलित करण्यासाठी, इक्विटी फंडाचा काही भाग (या प्रकरणात २० टक्के) विकून ती रक्कम डेट फंडमध्ये गुंतवा. हे संतुलन तुमच्या पोर्टफोलिओला मूळ ६०:४० या ॲलोकेशनवर परत आणते. म्युच्युअल फंड विकण्यासाठी हे एक योग्य कारण असू शकते.
आर्थिक उद्दिष्टे साध्य होणे
म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचे प्राथमिक कारण म्हणजे विशिष्ट आर्थिक उद्दिष्टे साध्य करणे. उदा. मुलांचे शिक्षण किंवा सेवानिवृत्तीचे नियोजन. जेव्हा तुम्ही ही उद्दिष्टे गाठता, तेव्हा तुमच्या म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीची रक्कम काढून घेण्यासाठी ही योग्य वेळ असते. म्युच्युअल फंड विकून तुम्हाला तुमच्या संपत्तीचा वापर इच्छित हेतूसाठी करता येतो. समजा, तुम्ही मुलाच्या उच्च शिक्षणासाठी २० लाख रुपये व तुमच्या निवृत्तीनंतरच्या काळासाठी तीन कोटी रुपयांची बचत करण्याचे ठरवले आहे आणि तुमच्या म्युच्युअल फंड पोर्टफोलिओने हे उद्दिष्ट गाठले असेल, अशा वेळी फंड विकून, बचत सुरक्षितपणे काढून घेणे विवेकपूर्ण ठरते. पैसे सतत गुंतवणुकीत ठेवल्याने बाजारातील चढ-उतारांमुळे जोखीम निर्माण होऊ शकते आणि तुमची आर्थिक उद्दिष्टे धोक्यात येऊ शकतात.
शेअर बाजाराची स्थिती
सर्वसाधारणपणे दीर्घकाळासाठी गुंतवणूक करण्याचा आणि शेअर बाजाराची वेळ टाळण्याचा सल्ला दिला जात असला, तरी बाजारातील काही परिस्थिती गुंतवणूक काढून घेण्यासाठी प्रवृत्त करू शकतात. उदा. शेअर बाजार उच्चांकावर असेल व मूल्यांकन जास्त असेल, अशा वेळी नफावसुलीसाठी ही चांगली वेळ असू शकते. मात्र, यासाठी बाजारातील कलांचे सखोल आकलन आवश्यक आहे.
तुमची वैयक्तिक आर्थिक परिस्थिती आणि उद्दिष्टांनुसार निर्णय घेण्यासाठी तुमच्या गुंतवणुकीत महत्त्वपूर्ण बदल करण्यापूर्वी अनुभवी आर्थिक तज्ज्ञांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.