अर्थभान : महिला सन्मान बचत प्रमाणपत्र

महिला सन्मान बचतपत्रातदेखील १३,५१२ कोटी रुपयांची विक्रमी गुंतवणूक झाली आहे.
arthbhan
arthbhan sakal
Updated on

डॉ. दिलीप सातभाई

भारत सरकारच्या अल्पबचत गुंतवणूक योजना सरकारी धोरणांमुळे खूप लोकप्रिय झाल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक बचत योजना व महिला सन्मान बचत योजनेत विक्रमी गुंतवणूक झाली आहे. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील ठेवी पहिल्यांदाच ७४,६२५ कोटी रुपयांच्या झाल्या असून, त्यात वार्षिक १६० टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी या योजनेत २८,७१५ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती.

महिला सन्मान बचतपत्रातदेखील १३,५१२ कोटी रुपयांची विक्रमी गुंतवणूक झाली आहे. व्याज व मुद्दलाची सुरक्षितता हे यामागचे प्रमुख कारण आहे. ‘महिला सन्मान बचत प्रमाणपत्र’ योजनेद्वारे महिला व मुलींच्या आर्थिक सक्षमीकरणाला पाठबळ देण्याचा सरकारचा मुख्य हेतू आहे.

कुटुंबातील प्रत्येक सदस्य महिलेने तिचा लाभ घ्यायला हवा इतकी महत्त्वाची व फलदायी अशी योजना असल्याने अतिशय स्वागतार्ह आहे. ही योजना भारत सरकारने हमी दिलेली गुंतवणूक योजना असल्याने, त्यात कोणतीही आर्थिक जोखीम नाही, हे या योजनेचे प्रमुख आकर्षण आहे.

ठळक वैशिष्ट्ये

या योजनेत फक्त महिलाच त्यांच्या नावाने वा अज्ञान असणाऱ्या मुलीच्या नावाने तिचे पालक गुंतवणूक करू शकतात. संयुक्त नावाने गुंतवणूक करण्याची परवानगी नाही. पोस्ट ऑफिसेस व ठराविक बँकामध्ये ही बचतपत्रे उपलब्ध आहेत.

एका महिलेला किमान एक हजार रुपये व त्यानंतर शंभर रुपयांच्या पटीत, तर जास्तीतजास्त दोन लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येईल.

योजनेची मुदत दोन वर्षे असून, ही योजना १ एप्रिल २०२३ पासून ३१ मार्च २०२५ पर्यंत खुली राहणार आहे.

किमान एका वर्षाने मुदत पूर्ण होण्यापूर्वी अंशतः रक्कम परत मागता येते. मुद्दल व जमा झालेल्या व्याजासह शिल्लक असलेल्या रकमेच्या ४० टक्के रक्कम परत मिळत मिळू शकते. उर्वरीत रक्कम मुदतपूर्तीनंतर मिळते.

दोन बचतपत्रे वेगवेगळ्या वेळी घेता येतात, मात्र दोहोंमध्ये तीन महिन्यांपेक्षा कमी अंतर असता कामा नये.

चक्रवाढ व्याज पद्धतीने साडेसात टक्के दराने व्याज मिळणार आहे.

मुदतपूर्ती आधी खाते बंद करण्याची सुविधा

अ. गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास खाते त्वरित बंद करता येते आणि वारसास पैसे परत मिळू शकतात.

ब.गंभीर आजारांसाठी किंवा पालकाचा मृत्यू झाला असेल, अशा परिस्थितीत समाधानकारक कारणे दिल्यास, हे खाते मुदती आधी बंद करण्याची परवानगी दिली जाऊ शकते.

क.सहा महिने पूर्ण झाल्यानंतर मुदतीपूर्वी बंद करता येते.

प्राप्तिकर दायित्व

अ. दोन वर्षांच्या कालावधीनंतर दोन लाख रुपयांची गुंतवणूक २.३२ लाख रुपये होईल. मिळणारे व्याज करपात्र आहे.

ब. मिळणारे व्याज कनिष्ठ महिलेस मिळाले, तर ज्या उत्पन्नाच्या कर गटवारीमध्ये असेल, त्या दराने उत्पन्न करपात्र होईल.

क. ज्येष्ठ महिलेस असे व्याज मिळाले, तर कलम ८० टीटीबी अंतर्गत पन्नास हजार रुपयांपर्यंत उत्पन्नातून वजावट मिळण्यासाठी पात्र आहेत.

सध्या ‘टीडीएस’ मर्यादा सर्वसामान्य महिलेसाठी चाळीस हजार रुपये आहे, तर ज्येष्ठ महिलेसाठी पन्नास हजार रुपये आहे. अर्थात, जोपर्यंत सर्व करपात्र उत्पन्न या रकमेपेक्षा अधिक होत नाही, तोपर्यंत ‘टीडीएस’ कापला जाणार नाही.

या योजनेत ‘इतर काही उत्पन्न’ नसेल, तर दोन वर्षांनंतर जास्तीजास्त बत्तीस हजार रुपये मिळणार असल्याने ‘टीडीएस’च्या तरतुदी लागू होणार नाहीत. इतर उत्पन्न असल्यास या व्याजावरही करकपात होईल, असे अधिसूचित करण्यात आले आहे.

खाते उघडताना पॅन व आधार क्रमांक देणे आवश्यक असल्याने, व्याजाची माहिती ‘एआयएस’मध्ये समाविष्ट केली जाणार आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

(लेखक चार्टर्ड अकाउंटंट-सीए आहेत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.